Maharashtra News Updates : राज्यातील विविध भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून मुंबई पुण्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. पुणे शहर आणि जिल्ह्याच्या परिसरात पावसाचा जोर वाढला असल्याने जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पुणे शहर आणि जिल्ह्यातील शाळांना सुटी जाहीर केली आहे. हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने (रेड अलर्ट) या भागातील शाळा २५ जुलै रोजी बंद ठेवव्यात, आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.सुहास दिवसे यांनी दिले आहेत. तर, आता सायंकाळी पाच वाजता मुळशी धरणातून ५ ते ७ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली आहे.
पुण्यातील पूरस्थिती अटोक्यात आली नसल्याने उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एकता नगर परिसरात आढावा घेतला. यावेळी नागरिकांनी येथील अडणचणींचा पाढा त्यांच्यासमोर वाचून दाखवला.
तर, दुसरीकडे मुंबईतही पावसाने चांगलाच जोर धरला असून मुंबई लोकल विस्कळीत झाली आहे. परिणामी कामाशिवाय बाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे रायगड आणि ठाणे जिल्ह्यातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाणी पातळीत गुरुवारी मोठी वाढ झाली. गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास बदलापुरातून उल्हास नदी इशारा पातळीवरून वाहत होती. बदलापुरात १६.५० मीटर ही इशारा पातळी आहे. तर १७.५० मीटर ही धोका पातळी आहे.
हेही वाचा >> मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज, वाऱ्यांचा वेगही वाढणार
केंद्रीय यंत्रणांकडून अटक टाळायची असेल तर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अनिल परब आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित यांच्यावरील आरोपांच्या शपथपत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकल्याचा सनसनाटी आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. तसंच, या शपथपत्रांसाठी देशमुखांवर दबाव टाकल्याचा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संयोजक प्रा. श्याम मानव यांनी केला होता. यामुळे राज्यातील वातावरण तापलं आहे. यासह राज्यातील इतर घडामोडी पाहूयात.
Marathi News Live Updates : महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या बातम्या जाणून घेऊयात.
पुणे : खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे सायंकाळ होईपर्यंत जास्तीत जास्त पाणी धरणांमधून नदीत सोडण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी जलसंपदा विभागाला दिले.
हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला असल्याने मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालये उद्या बंद राहणार आहेत.
जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने खेड बाजारपेठेत पाणी शिरुन पुन्हा पूरस्थिती निर्माण झाली आहे.
मुंबई : भारतीय हवामान खात्याने मुंबईला अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळा व सर्व महाविद्यालयांना सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अनुषंगाने दुपारच्या सत्रातील शाळा सोडताना शिक्षकांनी संबंधित पालक प्रतिनिधी यांना कळवून आणि आवश्यक ती खबरदारी घेत शाळांच्या स्तरावर योग्य तो समन्वय साधावा, असेही आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
? महत्त्वाची सूचना ?#मुळशी धरणातून सायंकाळी ५ वाजता ५ ते ७ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. नदीपात्रात कोणीही उतरू नये. नागरिकांनी खबरदारी घ्यावी-बसवराज मुन्नोळी, मुळशी धरण प्रमुख#Punerain
— DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) July 25, 2024
कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी आज कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार व नामदार एच. के. पाटील यांची भेट घेतली. महापुराची परिस्थिती उदभवू नये अशा पद्धतीने अलमट्टी धरणातून होणाऱ्या पाणी विसर्गाचे आवश्यक ते नियोजन करण्याची सूचना संबंधित अधिकारी व विभागांना करावी, अशी मागणी केली.
सामाजिक आरोग्य बिघडवून समाजात वाद निर्माण करण्यासाठी महाविकास आघाडीने वेगवेगळे केंद्र निर्माण केले आहे, असा आरोप बावनकुळेंनी केला आहे.
कोल्हापूर : संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाचे थैमान सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नद्या धोका पातळीवरून वाहत आहेत. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना महापुराचा फटका बसण्याची भीती आहे. अशावेळी महापुराची तीव्रता कमी करण्यासाठी, कर्नाटकातील अलमट्टी धरणातून किमान तीन लाख क्युसेकने पाणी विसर्ग सुरू करणे आवश्यक आहे. तसेच संभाव्य पूर परिस्थितीच्या अनुषंगाने तातडीने एक उच्चस्तरीय समिती नेमावी आणि महाराष्ट्र कर्नाटक मधील जलसंपदा खात्यांच्या अधिकाऱ्यांत समन्वय ठेवावा, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी आज केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांच्याकडे केली.
खडकवासला धरण व धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. दरम्यान, सरकारच्या या निर्णयामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. अचानक परिसरात पाण्याची वाढ झाल्याने महिला, रुग्ण आणि नवजात बालकांचे हाल झाले आहेत. काहींनी पुणे महानगर पालिकेच्या आयुक्तांवरच टीका केली आहे.
जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मदतीसाठी भारतीय सैन्यदल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान तैनात. नागरिकांनी घाबरुन जावू नये, प्रशासनास सहकार्य करावे- उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांचे नागरिकांना आवाहन.@MahaDGIPR@NDRFHQ@5Ndrf#PuneRains pic.twitter.com/Utu9ttHrqK
— DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) July 25, 2024
कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यात आपत्ती निवारणार्थ पाऊल उचलणं, हे पालकमंत्री म्हणून माझं कर्तव्य आहे.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) July 25, 2024
पहाटेपासून राज्यभरातील पुरजन्य परिस्थितीचा आढावा मंत्रालयातील आपत्ती निवारण कक्षातून घेतल्यानंतर पुण्यात येऊन पुणे महानगरपालिकेतील आपत्कालीन नियंत्रण… pic.twitter.com/94bgW7HZYV
Heavy Rain Alert Pune : मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आल्याने भिडे पूल, जयंतराव टिळक पूल, होळकर पुलासह शहरातील प्रमुख भुयारी मार्ग वाहतुकीस बंद करण्याचे आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राेहिदास पवार यांनी दिले.
वाघाचे नाव ऐकताच ग्रामस्थांचा थरकाप उडतो आणि तो अचानक समोर आला तर भीतीने बोलणेही बंद होते. असाच प्रकार नागभीड तालुक्यात उघडकीस आला.
पावसामुळे जे विद्यार्थी दहावी, बारावीची परीक्षा देऊ शकले नाही त्यांची स्वतंत्र परीक्षा घेण्यात येईल-उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks @MahaDGIPR #PuneRains pic.twitter.com/2OCPdjHssW
— DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) July 25, 2024
नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागल्याने महापुराची शक्यता दिसत आहे.
राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
मुंबई : मुंबई, तसेच उपनगरांत गुरुवारी पहाटेपासून पावसाचे धारानृत्य सुरू असून मुंबईतील ठिकठिकाणचे सखल भाग जलमय झाले आहेत. त्याचबरोबर रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला फटका बसला आहे. दरम्यान, हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांना शुक्रवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
कृष्णा- कोयना, पंचगंगा नद्यांच्या जलपातळीत लक्षणीय वाढ होऊन या नद्यांना महापूर येण्याची भीती व्यक्त होत आहे.
पुण्याच्या खडकवासला धरणातून गुरुवारी पहाटे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे पुणे शहर व आसपासच्या अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे. काही ठिकाणी साचलेल्या पाण्याची पातळी २ ते ३ फूट इतकी आहे. खडकवासला धरण व धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात ही परिस्थिती उद्भवली असताना प्रशासन व सरकारच्या पातळीवर नेमकी काय हालचाल चालू आहे, यासंदर्भात खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली आहे.
पुणे शहर आणि जिल्ह्याच्या परिसरात पावसाचा जोर वाढला असल्याने जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पुणे शहर आणि जिल्ह्यातील शाळांना सुटी जाहीर केली आहे. पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असून नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन करण्यात आले. दरम्यान, सिंहगडमधील निंबजनगर येथी दुकानांमध्ये पाणी शिरलं असून दुकानदारांचं लाखोंचं नुकसान झालं आहे. यातील काही महिलांनी टीव्ही ९ शी संवाद साधला असून त्यांनी प्रशासनाकडे मदतीचं आवाहन केलं आहे.
संबंधित प्रकल्पग्रस्तांना स्थानिक किंवा लगतच्या क्षेत्रात पदस्थापना देण्याविषयी किंबहुना जिल्ह्यात नोकरी देण्याचे नियोजन केले जाईल असे आश्वासन कोल इंडिया अध्यक्षांनी दिले.
“पावसाच्या पाण्यासंदर्भात प्रशासन सगळीकडे लक्ष ठेऊन आहे. मुंबई, ठाणे, कोल्हापूर, रायगड, पुणे, सातारा, सांगली या ठिकाणी जास्त पाऊस पडत आहे. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. कोल्हापूरमधील राधानगरी धरणही पूर्ण भरलं आहे. जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. पुण्यातील एकता नगर परिसरात लष्कराचे जवान तैनात करण्यात आले आहेत. या भागात जवळपास १०० लष्कराचे जवान तैनात करण्यात आले आहेत. तसेच पुण्यात अनेक ठिकाणी NDRF दाखल आहेत. तसेच लवासामध्ये दरड कोसळली असून मदत कार्य सुरु आहे”, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
विशेष म्हणजे, या परिसरात बिबट्याने धुमाकूळ घालत सहा नागरिकांना जखमी केले तर, एका बिबट्याने चक्क शेळीवर ताव मारत घरातच ठाण मांडले होते.
कल्याण : मुसळधार पावसामुळे उल्हास नदी दुथडी भरून वाहत आहे. या नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे या नदी काठच्या अंबरनाथ, कल्याण, भिवंडी तालुक्यातील २२ गावांना महसूल प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
मी पुराव्याशिवाय बोलत नाही. फडणवीस यांच्याकडे अशा कोणत्याही क्लिप्स नाहीत, असे देशमुख यांनी म्हटले आहे.
नाशिक : वीज कंपनीच्या कार्यालयात या, घरी बसून अडचणी सांगू नका, अशी दरडावणी, तसेच दुरुस्तीसाठी आलेल्या वीज कर्मचाऱ्याकडून दुरुस्तीकामी लागणारी सामग्री मागून उद्योजकाला भंडावून सोडणे, अशी विविध उदाहरणे मांडत निमा कार्यालयात महावितरणच्या अधिकाऱ्यांसमोर उद्योजकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
पुण्यातील भारतीय लष्कराच्या स्थानिक पथकाने एक बचाव आणि मदत पथक तयार केले आहे, यात जवान, एक अभियंता टास्क फोर्स आणि एक वैद्यकीय पथक आहे. स्थानिक प्रशासनाकडून विनंती केल्यानंतर एकता नगरमध्ये मदतकार्यासाठी टीम तयार करण्यात आले आहे, असे लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
पनवेल : पेण तालुक्यात पडणाऱ्या सततच्या मुसळधार पावसामुळे हेटवणे धरणपात्र ९० टक्के भरण्याच्या वाटेवर असल्याने धरणाचे सहा दरवाजे गुरुवारी सकाळी उघडण्यात आले. त्यामुळे आता तरी खारघर, उलवे आणि द्रोणागिरी वसाहतींमध्ये लागू केलेली २० टक्के पाणी कपात रद्द करण्याची मागणी रहिवाशांकडून होत आहे.
मुंबई : मुंबईत बुधवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाने गुरुवारी पहाटे जोर धरला आणि मुंबईकरांची त्रेधा उडाली. मुसळधार पावसामुळे दृश्यमानता कमी झाली. परिणामी, मोटरमनला लोकलचा वेग कमी करण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्यामुळे लोकल सेवा मंदावली. अनेक लोकल एका मागे एक संथगतीने धावत आहेत.
कल्याण : कल्याण, डोंबिवली शहरांच्या वेशीवरील सर्वाधिक वर्दळीचे शिळफाटा आणि मलंगरोड हे दोन्ही रस्ते जलमय झाले आहेत. या रस्त्यावर जागोजागी वाहने अडकून पडली आहेत. या रस्त्यांच्या दुतर्फाची दुकाने पाण्याखाली गेली आहेत. मलंगरोड बुधवारपासून पाण्याखाली गेला आहे.
Marathi News Live Updates : महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या बातम्या जाणून घेऊयात.