कोल्हापूर : गेली पाच दिवस मुसळधार पाऊस सुरू असल्याने पंचगंगा नदीने आज दुपारी बारा वाजता धोका पातळी ओलांडली. पंचगंगा नदी आता ४३ फूट ३ इंच या धोका पातळीवरून वाहत आहे. नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागल्याने महापुराची शक्यता दिसत आहे. तथापि, अलमट्टी धरणाचा विसर्ग वाढला असल्याने पुराची तीव्रता येणार नाही अशी शक्यता प्रशासनाकडून वर्तवली जात आहे. या आठवड्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. मुसळधार पावसामुळे राधानगरी, काळम्मावाडी, वारणा, चांदोली या मोठ्या धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. राधानगरी धरण पूर्णपणे भरले आहे त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने भोगावती, पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढत चालली आहे .

गेले तीन-चार दिवस नदीची पाणी पातळी रोज पाच ते सहा फूट वाढत होती. मात्र काल रात्री ७ तासात ती केवळ एक इंच वाढली होती. तर आज सकाळपासून अत्यंत संथ गतीने वाढ होत आहे. दुपारी बारा वाजता पाणीपातळी ४३ फूट १ इंच इतकी झाली. ४३ फूट ही धोका पातळी आहे. तर दुपारी दोन वाजता पाणीपातळी ४३ फूट ३ इंच होती. यामुळे पुराची शक्यता वाढू लागल्याने नदीकाठच्या ठिकाणी स्थलांतर केले जात आहे. कोल्हापूर शहरातील पाणी आले आहे . रमण मळा १०० फुटी भागात पाणी आले आहे त्यातून लोकांची ये-जा सुरू आहे .

हेही वाचा : राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा उघडला; कोल्हापुरातील पुराची तीव्रता वाढण्याची चिन्हे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान पुराचा मोठा फटका बसणाऱ्या प्रयोग चिखली या गावांमध्ये स्थलांतराला गती आली आहे. ९०० पैकी ६०० कुटुंबे स्थलांतरित झाले आहेत. ८० टक्के जनावरही हलवले आहेत, असे सरपंच रोहित पाटील यांनी सांगितले. गावामध्ये पोलीस गाडी फिरत असून त्यांनी गाव रिकामे करण्याची सूचना केली आहे. शासकीय आदेशाकडे दुर्लक्ष केल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शिरोळ येथे बोलताना कोल्हापुरी जिल्ह्यातील पूर परिस्थितीवर प्रशासनाचे लक्ष आहे. प्रशासन योग्य त्या उपाययोजना करत असल्याचे त्यांनी सांगितले.