वर्धा : भारतीय रेल्वे ही जगातील मोठी प्रवासी सेवा समजली जाते. तसेच पर्यटक व अन्य विविध ठिकाणी प्रवास करण्यासाठी रेल सेवेस प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सर्वच मार्ग व्यस्त असतात. पण गरजेनुसार नव्या गाड्या पण सोडाव्या लागतात. आता अमृत भारत या गाडीची सेवा वर्धेकर प्रवाशांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. इरोड जोगबनी इरोड अमृत भारत साप्ताहिक एक्सप्रेस दर गुरुवारी सकाळी ७ वाजता इरोडहून सुटेल आणि शनिवारी संध्याकाळी १९ वाजता जोगबनीला पोहोचेल.

परतीच्या प्रवासात अमृत भारत एक्सप्रेस दर रविवारी दुपारी १५ वाजून १५ मिनिटांनी जोगबनीहून सुटेल आणि बुधवारी सकाळी ७:३० वाजता इरोडला पोहोचेल. या गाडीत ८ स्लीपर, ११ द्वितीय साधारण, ०१ पेंट्रीकार, ०२ एसएलआर/जनरेटर कार असे एकूण २२ एलएचबी अमृत भारत डबे राहणार आहेत. तर थांबे इरोड, सालेम, जोलारपेट्टी, काटपाडी, आरक्कोणम, पेरंबूर, नायडुपेटा, गुडूर, ओंगल, विजयवाडा, खम्मम, वरंगल, मंचरियाल, बल्हारशाह, चंद्रपूर, सेवाग्राम, नागपूर, बैतूल, घोडाडोंगरी, इटारसी, पिपरिया, गाडरवाडा, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, मानिकपूर, डभौरा, जसरा, प्रयागराज छिवकी, विंध्याचल, चुनार, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, रघुनाथपूर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र, सोनपूर, हाजीपूर, शाहपूर पिटोरी, बरौनी, बेगुसराय, खगडिया, मानसी, नौगछिया, कटिहार, पूर्णिया, अररिया कोर्ट, फारबिसगंज, जोगबनी असे राहतील.

या नवीन रेल्वे गाडीमुळे तामिळनाडू, तेलंगणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार या राज्यातील अनेक रेल्वे स्थानके सेवाग्राम वर्धा सोबत जोडली जाणार आहे.

अमृत भारत एक्सप्रेस

लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आधुनिक सुविधा

ही भारतीय रेल्वेद्वारे चालवली जाणारी एक नॉन-एसी, सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेन सेवा आहे.ही ट्रेन कमी खर्चात लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आधुनिक सुविधा देते, ज्यामुळे सर्वसामान्यांसाठी ‘वंदे भारत’चा स्वस्त पर्याय उपलब्ध झाला आहे. यामध्ये स्लीपर आणि जनरल कोच असतात, ज्यामुळे कमी दरात आरामदायी प्रवास करता येतो. याबाबतचा आदेश रेल्वे मंत्रालयाने निर्गमित केला आहे. ही रेल्वे सेवा लवकरच सुरू होईल अशी माहिती मध्य रेल्वे क्षत्रिय रेल्वे सेवा उपयोगकर्ता सल्लागार समितीचे सदस्य तथा वर्धा जिल्हा भारतीय जनता पार्टीचे सचिव प्रणव जोशी यांनी दिली.

ही नवीन रेल्वे सेवा नागरिकांना उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वर्धा व भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर तसेच वर्धा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रामदासजी तडस यांच्या प्रती प्रणव जोशी यांनी विशेष आभार व्यक्त केले.