Mouse Jiggler Sacks People Job: वेल्स फार्गोने गेल्या महिन्यात डझनभर कर्मचाऱ्यांना ‘माउस जिगलर’ चा वापर केल्याप्रकरणी नोकरीवरून काढून टाकल्याचे समजतेय. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, हे कर्मचारी कंपनीच्या गुंतवणूक व्यवस्थापन विभागात कार्यरत होते. त्यांनी घरून काम करताना आपण ऑनलाईन आहोत हे भासवून देण्यासाठी माउस जिगलरचा वापर केला होता असे कंपनीने फायनान्शियल इंडस्ट्री रेग्युलेटरी ऑथारिटीकडे दाखल केलेल्या अहवालात नमूद केले आहे. कंपनीच्या प्रवक्त्याने ब्लूमबर्गला असेही सांगितले की, “वेल्स फार्गो कर्मचाऱ्यांसाठी सर्वोच्च मानांक असणे आवश्यक आहे. असे अनैतिक वर्तन कंपनीच्या धोरणांच्या विरुद्ध आहे.” या चर्चेतून अधोरेखित झालेला एक मुद्दा म्हणजे हा माउस जिगलर प्रकार नेमका आहे तरी काय? चला तर मग आपणही याचं उत्तर जाणून घेऊया..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शांतीत सुट्टी म्हणजे काय?

हॅरिस पोलच्या मे महिन्याच्या सर्वेक्षणात एक बाब समोर आली ती म्हणजे आपण कामावर आहोत हे भासवून काही कर्मचारी विशेषतः मिलेनियल्स (नव्वदीच्या दशकात जन्मलेले) हे ‘शांत सुट्टी’ ची मजा लुटत असतात. तब्बल ४० टक्के कर्मचाऱ्यांनी कबुली दिली होती की ते औपचारिकपणे आपल्या वरिष्ठांची परवानगी न घेता किंबहुना त्यांना न कळवताच फक्त आपण कामावर आहोत हे भासवतात पण मुळात ते काम करतच नसतात. यासाठी त्यांना माउस जिगलर सारख्या उपकरणाची मदत होत असल्याचे सुद्धा कर्मचाऱ्यांनी कबूल केले आहे.

माउस जिगलर: नोकरी घालवणारं काम!

माउस जिगलरचं काम सोप्या भाषेत सांगायचं तर, जिगलिंग म्हणजे हालचाल करत राहणे. माउस जिगलरवर माउस ठेवल्याने माउसची हालाचाल होईल हे सुनिश्चित केले जाते. यामुळे पहिला फायदा असा होतो की कंपनी मॉनिटरिंग करत असलेला तुमचा लॅपटॉप स्लीप मोड वर जात नाही. म्हणजेच तुम्ही स्वतः तिथे बसून काम करत नसाल तरी लॅपटॉपची स्क्रीन चालूच राहते.

दुसरा फायदा म्हणजे या जिगलरचा वापर करून आपण काही हालचाली शेड्युल करू शकता, जसे की समजा तुमची कामाची वेळ आहे ९ ते ६. आता तुम्हाला वरिष्ठांना आपण ओव्हर टाइम करतोय हे दाखवण्यासाठी ७ वाजता एखादा मेल करायचा असेल तर तो तुम्ही या उपकरणाच्या मदतीने शेड्युल करून ठेवून त्या वेळात मूळ कुठेतरी बाहेरच असू शकता. ही कामे तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा भाग म्हणून अत्यंत आकर्षक वाटत असली तरी मुळात एक कर्मचारी म्हणून नैतिकतेच्या कक्षात बसत नाहीत.

कंपनीचा ऍक्टिव्ह मोड; कर्मचाऱ्यांवर पाळत

दरम्यान, करोना काळात वर्क फ्रॉम होमच्या सुविधा मिळाल्या असताना हे गैरप्रकार वाढल्याचे कंपन्यांच्या आता लक्षात आले आहे. परिणामी अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांना पुन्हा ऑफिसमधून काम करणे बंधनकारक करण्यात आले आहे. काही ठिकाणी हायब्रीड मॉडेलमध्ये काम करण्याची मुभा देण्यात आली असली तरी निदान तीन दिवस ऑफिसला असण्याची सक्ती करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या या हुशारीमुळे आता कंपन्या सुद्धा ऍक्टिव्ह मोडमध्ये आलेल्या आहेत.

कर्मचाऱ्यांच्या कीस्ट्रोक (की बोर्डचा वापर), माउसच्या हालचाली आणि ऍप्सच्या वापरावर लक्ष ठेवण्यासाठी काही कंपन्यांनी स्वतः वेगळे डिव्हाइस बनवायला सुरुवात केली आहे. काही ठिकाणी दुरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर नजर ठेवण्यासाठी वेबकॅमचा वापरही केला जातो. तसेच, नेटवर्कवर काम करण्याशी संबंधित नसलेल्या काही वेबसाइट्सवर प्रवेश प्रतिबंधित केला जातो. काही ठिकाणी कर्मचाऱ्यांचे इमेल सुद्धा कंपनीकडून तपासले जाऊ शकतात तसेच ते किती वेळा लॉग इन लॉग आउट करतात याचेही ट्रॅकिंग केले जाते.

हे ही वाचा<< Earworms songs : ‘आय हाय ओय होय, बदो बदी’, ‘गुलाबी साडी’ अशी गाणी डोक्यात का अडकतात? जाणून घ्या

कर्मचारी व कंपनीने काय लक्षात ठेवावं?

दरम्यान, कंपनीचा लक्ष ठेवण्याचा अधिकार सुद्धा वादाचा मुद्दा ठरत आहे. माहिती आयुक्त कार्यालय, युनायटेड किंगडम वॉचडॉग, जे डेटा गोपनीयता आणि संरक्षणाशी संबंधित आहे. यामुळे कर्मचाऱ्याच्या गोपनियतचा भंग होतो असे दावे कर्मचारी वर्गाकडून केले जात आहेत. आयसीओच्या प्रवक्त्याने सुचवल्याप्रमाणे, यावर उपाय म्हणून कंपन्यांनी उद्दिष्ट व हेतूबाबत नीट संभाषण करणे गरजेचे आहे तसेच कर्मचाऱ्यांना माहिती न देता थेट देखरेख करणे सुद्धा कंपन्यांनी टाळायला हवे.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is mouse jiggler that sacked thousand of jobs how bad practice of employees caused company to be alert on work ethics svs