मेष : योग्य मुद्दे मांडा
दिनांक ९, १०, ११ असे तीन दिवस जपून पाऊल टाकावे लागेल. दिवस अनुकूल नाहीत. म्हणून काम करायचे नाही असे नाही. काम तर करावेच लागेल. मात्र नियोजन करून काम केल्यास त्रास होणार नाही. इतरांवर अवलंबून राहू नका. स्वत:चे काम स्वत: करा. आपले मत इतरांवर लादू नका. तुमचे मत बरोबर असले तरी ते इतरांना पटेलच असे नाही. त्यामुळे योग्य मुद्दे मांडा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला राहील. व्यवसायात कष्ट वाढतील तसे त्याचे फळही मिळेल. नोकरदार वर्गाला कामात गुंतून राहावे लागेल. आर्थिक बाबतीत अनपेक्षित लाभ होईल. राजकीय क्षेत्रात रुबाब वाढेल. कुटुंबासाठी वेळ देताना होऊन गेलेल्या गोष्टींवर चर्चा करत बसू नका. जोडीदार आनंदी असेल. धार्मिक कार्यासाठी खर्च कराल.
आहाराचे पथ्य पाणी सांभाळा.
शुभ दिनांक : १२, १३
महिलांसाठी : सणासुदीच्या आनंदात विरजण पडणार नाही याची काळजी घ्या.