केनियाची राजधानी नैरोबी येथे गेल्या आठवड्यात वाढत्या स्त्री हत्यांचा निषेध करण्यासाठी दहा हजारांहून अधिक स्त्री-पुरुषांनी निषेध मोर्चा काढत निदर्शने केली. नैरोबीशिवायही इतर शहरांमध्ये अशाच प्रकारची निदर्शने करण्यात आली. त्याला ‘डार्क व्हॅलेंटाइन’ असे म्हटले गेले. केनियाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या बिगर-राजकीय निषेधांपैकी ही निदर्शने होती. ही निदर्शने करण्यामागची आणि केनियासह एकूणच आफ्रिकेत महिलांच्या वाढत्या हत्यांमागच्या कारणांचा हा मागोवा…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केनियातील निदर्शनांमागची कारणे काय?

जानेवारी महिन्यात केनियातील नैरोबी येथे ग्रेस वांगारी थुईया या ब्युटीशियन तरुणीची हत्या झाली होती. तिच्या प्रियकराने तिच्यावर निष्ठूरपणे वार करत तिची हत्या केली होती. तर एकूणच केनियामध्ये जानेवारी महिन्यात ३१ महिलांचे मारहाण, गळा दाबून किंवा शिरच्छेद करून जीव घेण्यात आल्याची नोंद पोलिसांत करण्यात आली आहे. या प्रकाराने व्यतिथ झालेल्या आणि भयावह परिस्थितीला तोंड देणाऱ्या तेथील महिलांनी संतापून अखेर निदर्शने केली.

हेही वाचा – विश्लेषण: भारतात लवकरच सर्वाधिक कर्करोग रुग्ण? कारणे काय? 

स्त्री हत्या किंवा फेमिसाईड म्हणजे काय?

स्त्री हत्या किंवा फेमिसाईड म्हणजे स्त्रिया किंवा मुलींची केवळ त्या स्त्रिया आहेत म्हणून जाणीवपूर्वक हत्या करणे. तसेच अशा हत्या करण्यापूर्वी स्त्रियांवर मानसिक, शारीरिक आणि लैंगिक अत्याचार केले जातात. हा एक लिंग-आधारित गुन्हा आहे ज्याचे मूळ खोलवर रुजलेल्या सामाजिक वृत्ती, परंपरा आणि महिलांबाबत केला जाणारा भेदभाव यात आहे. स्त्रियांना केवळ त्यांच्या लिंगाच्या आधारे लक्ष्य केले जात असल्याने स्त्रीहत्या या इतर मानवी हत्यांपेक्षा वेगळ्या ठरतात. बहुतेक वेळी महिलांचा त्यांच्या जोडीदार, कुटुंबातील सदस्य किंवा जवळच्या व्यक्तींकडून छळ केला जातो, किंवा हत्या केली जाते. त्यामागे लिंग-आधारित हिंसाचार किंवा स्त्रियांचे अवमूल्यन करणाऱ्या सांस्कृतिक समजुती यासारखी कारणेही आहेत. 

संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात काय म्हटले आहे? 

संयुक्त राष्ट्रांनी प्रसिद्ध केलेल्या २०२२ च्या आकडेवारीनुसार ‘आफ्रिकेत जोडीदाराकडून किंवा कुटुंबाशी संबंधित हत्यांची सर्वाधिक संख्या नोंदवली गेली आहे. २०२२ मध्ये आफ्रिकेत अंदाजे २० हजार बळी गेले आहेत. यानंतर आशियामध्ये १८,४०० हत्यांची, अमेरिकेत ७,९००, युरोपमध्ये २,३०० महिलांची हत्या झाली होती. सर्वाधिक कमी हत्या म्हणजे २०० हत्या या ओशिनिया क्षेत्रात नोंदवल्या गेल्या आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या तज्ज्ञांनुसार, ही आकडेवारी प्रत्यक्षात जास्तच आहे. करोना काळानंतर आर्थिक चणचणीच्या काळात अशा हत्यांचे प्रमाण वाढलेले आढळून येत आहे. 

हेही वाचा – विश्लेषण : कल्याण ते लातूर प्रवास चार तासांत? काय आहे नवा प्रकल्प?

केनियातील परिस्थितीबाबत आंदोलक, सामाजिक कार्यकर्त्यांचे काय म्हणणे आहे?

केनियन समाजातून विखारी पुरुषत्व कमी होण्यास बराच वेळ लागेल. पुरुषप्रधान मानसिकता आणि तिचा पुरुषांवर किती परिणाम होतो हे त्यांना कळतही नाही, आणि लोकांना वाटते, ‘ही माझी लढाई नाही.’ ही विचारसरणी बदलण्याची गरज आहे, असे केनियन डीजे, पॉडकास्टर आणि टीव्ही होस्ट मोसेस माथेंगेने म्हटले आहे. दोन आठवड्यांपूर्वी, स्त्रीहत्येचा निषेध करणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये त्याचा समावेश आहे. सामाजिक कार्यकर्ते म्हणतात की त्यांना राजकीय, जातीय किंवा धार्मिक नेते याबाबत मत मांडताना दिसत नाही. अनेक आफ्रिकन नेते, तसेच पोलीस, या समस्येकडे दुर्लक्ष करतात किंवा पीडित महिलांनाच दोष देतात. हत्यांच्या घटनांमध्ये अधिक अन्वेषकांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. न्यायाधीशांनी खटल्यांचा जलदगतीने निर्णय घेणे आवश्यक आहे आणि कायदेमंडळांनी गुन्हेगारांना अधिक कठोर शिक्षा देण्यासाठी कायदे केले पाहिजेत, असे येथील सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. 

केनियातील पुरुषांची विचारसरणी कशी आहे?

स्त्रियांमुळे पुरुषांना त्रास सहन करावा लागतो. स्त्रिया फक्त त्यांच्या पैशासाठी पुरुषांचा वापर करतात, असे पुरुषप्रधान संस्कृती जोपासणाऱ्या इथल्या अनेक पुरुषांची विचारसरणी आहे. हिंसाचार रोखण्यासाठी येथील लोक हस्तक्षेप करत नाहीत किंवा पोलिसांकडेही जात नाहीत. कारण स्त्रियांवरील अत्याचार येथे सामान्य आणि खासगी बाब मानली जाते. मात्र, अनेक पुरुषांना त्यांनी अनेक महिला (पत्नी, माता, मुली, बहिणी, मैत्रिणी, मुली) या हिंसेच्या भयंकर घटनांनी गमावल्या आहेत, याची जाणीव होत आहे. त्यातूनच अत्याचार रोखण्यासाठी आवाहन करणे, जनजागृती करणे अशा माध्यमातून केनियातील अनेक पुरुष आता या विरोधात व्यक्त होत आहेत.

pradnya.talegaonkar@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why are so many women murdered in kenya what is the dark valentine movement print exp ssb
First published on: 22-02-2024 at 08:39 IST