Foods Avoid After Meat: चिकन, मटण म्हटलं की, अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. मांसाहार करणाऱ्यांसाठी चिकन, मटण हे अतिशय आवडते पदार्थ आहेत. घर किंवा हॉटेलमध्ये अनेक जण या पदार्थांचा आवडीनं आस्वाद घेताना दिसतात. या मांसाहारी पदार्थांसोबत नेहमीच आपण भाकरी, चपाती आणि भात या गोष्टी खातो. पण चिकन, मटणानंतर काय खाऊ नये, हे तुम्हाला ठाऊक आहे का? आयुर्वेदानुसार असे काही पदार्थ आहेत की, जे चिकन, मटण तसेच इतर कोणत्याही मांसाहारी पदार्थांच्या सेवनानंतर खाऊ नयेत.

आयुर्वेदानुसार आरोग्य समस्या उदभवण्यामागे अनेकदा दोन विरुद्ध पदार्थांचे सेवन कारणीभूत ठरू शकते. दोन विरुद्ध पदार्थांचे एकाच वेळी सेवन केल्याने विषबाधा, तसेच अनेक आरोग्य समस्या उदभवण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा पदार्थांचे एकत्रित किंवा लगेच सेवन कधीही करू नये.

मांसाहारानंतर चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ

दूध

तुम्ही घरातील वडीलधाऱ्यांकडून नक्कीच ऐकलं असेल की, चिकन, मटण किंवा कोणताही मांसाहार केल्यानंतर दूध पिऊ नये. कारण- मांसाहारी पदार्थांमध्ये खूप उष्णता असते आणि दुधामध्ये थंडावा असतो. त्यामुळे मांसाहार आणि दूध या दोन्ही पदार्थांचे एकत्रित सेवन तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

दही

दूधाप्रमाणे दहीदेखील एक दुग्धजन्य पदार्थ आहे. दह्याचं सेवन केल्यानं शरीराला थंडावा मिळतो; तर मांसाहारानंतर शरीरात उष्णता निर्माण होते. या दोन्ही पदार्थांचं संमिश्रणदेखील आरोग्य समस्या निर्माण करू शकतं.

फळे / फळांचा रस

चिकन, मटणानंतर फळांचे तसेच फळांच्या रसाचेही सेवन करू नये. त्यामुळे अनेक आरोग्य समस्या उदभवतात. त्यामुळे पचनक्रिया खराब होते; तसेच शरीरात विषाक्त घटक निर्माण होतात; ज्यांचा प्रभाव लगेच दिसत नसला तरी कालांतराने तो शरीरावर दिसून येतो.

हेही वाचा: अनहेल्दी सोडा; हेल्दी खा! सकाळी नाश्त्यात ‘हे’ पाच पौष्टिक पदार्थ देतील तुम्हाला सुपर एनर्जी

मध

मांसाहारी पदार्थांच्या सेवनानंतर मधदेखील खाऊ नये. तसे केल्यामुळे शरीरात विषारी घटक निर्माण होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला आरोग्य समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

बटाटा

चिकन, मटणमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते; तर बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे हे दोन्ही पदार्थ एकत्र घेतल्यास किंवा चिकन, मटणानंतर बटाटा खाल्ल्यास दोन वेगवेगळ्या गोष्टी मिळून गॅस आणि पोटफुगीची समस्या उदभवू शकते.