मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा येथे शनिवारी पहाटे डांबराचा डंपर व रस्त्यावर उभा असलेला कंटेनर यांच्या अपघातात आयआरबी कंपनीचे दोन कामगार ठार व कंटेनरच्या चालकासह चार जण जखमी झाले. जखमींना पुणे येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या अपघातामुळे सकाळी या मार्गावर दोन तास वाहतूक ठप्प झाली होती.
 रस्ता दुरुस्तीचे काम करणारे सचिन सयाजी पाटील व समीम अली शेख हे दोन तरुण या अपघातात जागीच ठार झाले, तर कंटेनरचा चालक राकेश पटेल व त्याचे चार सहकारी जखमी झाले.  मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सध्या रस्ता दुरुस्तीची कामे सुरूआहेत. खंडाळ्यात जाणाऱ्या मार्गावर उभ्या असणाऱ्या एका कंटेनरला डांबराने भरलेल्या डंपरने पहाटे पावणेसहा वाजता जोरदार धडक दिली. त्यामुळे रस्त्यावर डांबर टाकण्याचे काम करीत असलेले आयआरबी कंपनीचे दोन कंत्राटी कामगार जागीच ठार झाले, तर कंटेनरमध्ये बसलेले पाचजण जखमी झाले. मृत तरुणांपैकी एकजण लोणावळ्याचा रहिवासी असून शेख हा मुंबईतील जोगेश्वरी येथील राहणार आहे. लोणावळा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक संदीप भोसले या अपघाताची अधिक चौकशी करीत आहेत. या अपघाताने मार्गावर  ये-जा करणाऱ्या वाहनचालकांची चांगलीच पंचाईत झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dumper hits container on mumbai pune expressway 2 dead near khandala