मानसिक अवस्था बिघडण्याचे अनेक क्षण दैनंदिन आयुष्यात येतात. आजकाल रात्र-रात्र झोपच येत नाही, भूकच लागत नाही, आत्मविश्वासच हरवला आहे, सतत असुरक्षित वाटते. या समस्यांनी ग्रासलेल्यांच्या मदतीसाठी एक आधार गट कार्यरत आहे, ‘समतोल बायपोलर मूड डिसऑर्डर’. ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ डाॅ. उल्हास लुकतुके, डॉ. विद्याधर वाटवे आणि डॉ. सुजल वाटवे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षापासून या गटाचे काम विनामूल्य सुरू आहे. या गटाविषयी डॉ. सुजल वाटवे यांच्याशी ‘लोकसत्ता’चे प्रतिनिधी श्रीराम ओक यांनी साधलेला संवाद.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१. ‘बायपोलर मूड डिसऑर्डर’ म्हणजे काय ? त्याची लक्षणे काय असतात ?

– नैराश्य आणि अतिउत्साह अशी भावनांची आंदोलने हे महत्त्वाचे लक्षण असले, तरी उगीचच रडू येणे, भूक न लागणे, रात्रीची झोप उडणे किंवा उगीचच खूप झोप येणे, गळून जाणे, निरुत्साह, थकवा, अपराधी भावना, आत्मविश्वासाचा अभाव, आपण कोणाला नकोसे आहोत असे वाटणे, नातेवाइक आणि मित्रांपासून अलिप्त वाटणे, भीती, असुरक्षितता वाटणे आणि आत्महत्येचे विचार, अशी काही औदासीन्याची, नैराश्याची किंवा ‘अवसादा’ची (Depression) ठळक चिन्हे आहेत. तर, अतिउत्साहाच्या स्थितीत मनातल्या भरकटलेल्या विचारांवर, भावनांवर आणि कल्पनांवर निर्बंध न राहणे, एकाग्रतेचा अभाव, योग्य निर्णय घेता न येणे, प्रचंड उत्साह व चिडचिडेपणा, रागाचा उद्रेक, अति खाणे, झोपेचा अभाव, अनावश्यक धाडस, पैशांचा अपव्यय, अशासारखी लक्षणे ही अतिरेकी उत्साहाची किंवा ‘उन्मादा’ची (Mania) चिन्हे असतात. या दोन्ही भावावस्था ज्या आजारात अनुभवल्या जातात, असा आजार म्हणजेच उन्माद-अवसाद द्विध्रुवी भावावस्था विकृती (Manic-Depressive Bipolar Mood Disorder). कधी एकच तीव्र प्रकारचा, कमीत कमी एक आठवडाभर येणारा आणि रुग्णालयात भरती करण्याइतका भावनांचा अतिरेक यात जाणवतो.

हेही वाचा >>> उद्योगांमध्ये पुण्याचे पाऊल पडते पुढे…!

२. ‘बायपोलर मूड डिसऑर्डर’ कोणत्या वयोगटामध्ये सर्वाधिक दिसतो? त्यावर उपाययोजना कशा प्रकारे केल्या जातात?

– हा आजार १७ ते ३० वर्षे या वयात होताना दिसतो. तो आयुष्यभर उपचारांनी सांभाळावा लागतो, हे कटू सत्य आहे. पण, हे लोक मोठ्या पदांवर कामे करतात. याच्या अनेक प्रकारच्या लक्षणांतून व्यावहारिक घोटाळे होण्याची शक्यता असते. म्हणूनच प्रामुख्याने वैद्यकीय सल्ल्याने उपचार, औषधे, विद्युत-धक्का तंत्र, रुग्णालयात भरती करणे, सतत पाठराखण आणि मदत याची गरज असते. त्याचबरोबर रुग्णाचे आणि कुटुंबीयांचे किंवा काळजी घेणाऱ्यांचे समुपदेशन, मार्गदर्शन करणे आवश्यक असते. काहीसे नियंत्रणात असल्यावर शिथिलीकरण, ध्यानधारणा, योग, व्यायाम, श्रद्धापूर्वक काम करणे, नियमित दिनक्रम व औषधे, कुटुंबीयांबरोबर संवाद आदी गोष्टी आवर्जून सांभाळल्या पाहिजेत.

हेही वाचा >>> देशात विकास दरात घसरण होत असताना पुण्यातील उद्योगांचे आश्वासक चित्र! एमसीसीआयएच्या सर्वेक्षणातील निष्कर्ष

३. या आधारगटाचे उद्दिष्ट काय ?

शुभार्थींना आणि शुभंकरांना इतर शुभार्थी व शुभंकरांशी स्वत:चे उपचार, त्यांचे काही ‘साइड इफेक्ट्स’ याविषयीचे अनुभव, याविषयी बोलण्यासाठी, सुरक्षित गट आणि संधी उपलब्ध करून देणे, गट सदस्यांना आजाराविषयी असणारे प्रश्न, त्याविषयी हवी असलेली मदत त्यावर चर्चा करण्यासाठी आणि परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी मार्ग शोधण्यासाठी मदत करणे. भावावस्थेचे आजार असलेले प्रथितयश कलाकार, लेखक, कवी, नट-नाट्य, राजकारणी आणि खेळाडूही आहेत. म्हणजेच या प्रकारचा त्रास होणारे विविध प्रकारची प्रज्ञा असलेले लोक आपल्या आजारावर मात करून कितीतरी विलक्षण योगदान देऊ शकतात. पण अशा संधी न मिळाल्यास ते तसेच दुर्लक्षित राहतात. योग्य ती औषधे, शॉक उपचार यांसह समुपदेशन, कौटुंबिक समुपदेशन मिळाल्यास हा प्रश्न कमी होऊ शकतो. अशा रुग्णांची काळजी घेणाऱ्यांनाही आधार आणि प्रोत्साहन देणे गरजेचे असते. यासाठी विशेष स्व-मदत गट आणि आधार गट मदत करू शकतात. आंदोलनात्मक भावावस्था व भावावस्थांचे आजार, घ्यावयाची काळजी याविषयी माहिती देणे, माहितीचे स्त्रोत सुचविणे. त्यामध्ये परस्परांशी संवाद, एकमेकांशी माहितीची देवाण-घेवाण, परस्परांना आधार देणे, कायदे, विशेष संधी, स्वतंत्र विचार यासाठी काही तज्ज्ञांची भाषणे योजणे, कृतीसत्रे घेणे, अशी कामे हा गट करीत आहे. संपर्क : ९६३७५२६५३७ (वीरेन रजपूत) किंवा ८७९३२७८९६७ (मीना रजपूत), दुपारी चार ते सायंकाळी सहा या वेळेत संवाद साधता येईल.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta representative shriram oak conversation with dr sujala watve pune print news sso 25 zws