चतु:सूत्र  (गांधीवाद) : आपल्या मनाच्या सफाईचे काय?

आजच्या आधुनिक कचरा व्यवस्थापनातील ‘रिडय़ूस, रीयूज, रिसायकल’ हे सूत्र हे गांधींच्या विचाराशी सुसंगतच आहे.

चतु:सूत्र  (गांधीवाद) : आपल्या मनाच्या सफाईचे काय?
(संग्रहित छायाचित्र)

तारक काटे

विश्वगुरू होण्याच्या वल्गना केल्या, तरीही जगात आपली प्रतिमा ‘अस्वच्छ लोक’ अशीच आहे. ती बदलण्यासाठी गांधीजी आग्रही होते. पण ‘आम्ही अस्वच्छता पसरवत राहू, सफाई मात्र विशिष्ट वर्गाने करावी’ ही वृत्ती अद्यापही बदललेली नाही.

गांधीजी वैयक्तिक तसेच सार्वजनिक सफाईच्या संदर्भात सदैव सजग होते. दक्षिण आफ्रिकेतील आपले कार्य पूर्ण करून ते १९१५ साली कायमचे भारतात परतले. त्यांचे राजकीय गुरू गोपाळ कृष्ण गोखले यांच्या सूचनेवरून त्यांनी त्या काळची देशातील राजकीय-सामाजिक परिस्थिती समजून घेण्यासाठी भारतभर दौरा केला. त्यात त्यांना ब्रिटिश शासनाच्या दमनकारी वृत्तीचे, जमीनदार करीत असलेल्या वेठबिगार शेतकरी व शेतमजुरांच्या शोषणाचे, शेतकऱ्यांच्या दैन्याचे आणि देशातील एकूणच आत्यंतिक गरिबीचे दर्शन झाले. या दौऱ्यातच देशातील खेडी व शहरांत सार्वजनिक ठिकाणी आढळणारा गलिच्छपणा आणि त्यामुळे उद्भवणारी रोगराईदेखील त्यांच्या निदर्शनास आली.

गांधीजी सफाईबाबत अतिशय संवेदनशील होते. १९१७ साली अ‍ॅनी बेझंट यांच्या अध्यक्षतेखाली कलकत्ता येथे झालेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात कार्यकर्त्यांसाठी तात्पुरती शौचालये उभारण्यात आली होती. या शौचालयांच्या परिसरातील अस्वच्छता पाहून गांधीजी अस्वस्थ झाले आणि त्यांनी कामकाजात सहभागी होण्याऐवजी सफाईचे काम हाती घेतले. पुढे स्वातंत्र्यसंग्रामाचे नेतृत्व त्यांच्याकडे आले तेव्हा त्यांनी कार्यकर्त्यांना दिलेल्या १० रचनात्मक कार्यक्रमांत सफाईचा प्रामुख्याने अंतर्भाव केला.

भारतीयांत आणि विशेषत: उच्चवर्गात सार्वजनिक स्वच्छतेच्या बाबतीत विलक्षण उदासीनता आणि सफाईचे काम करणाऱ्यांविषयी (‘भंगी’ या जातिवाचक शब्दाचा वापर करण्यावर आता बंदी आहे) तुच्छता आढळत असे.  ‘आपल्या देशात वैयक्तिक जीवनात अतिरेकी शुचिता तर सार्वजनिक जीवनात मात्र घाणीची सफाई करण्याऐवजी तिरस्कारच, असा जनसामान्यांचा स्थायिभाव राहिला आहे; विशेषत: त्या काळी सोवळेओवळे पाळणाऱ्या उच्चवर्णीयांमध्ये हे जास्त तीव्रतेने दिसून येत होते. त्यामुळे आत्यंतिक स्तरावर शुचिता पाळण्याच्या आणि किमान पातळीवर आवश्यक असलेली सार्वजनिक स्वच्छताही न राखण्याच्या लोकांच्या वागणुकीमुळे प्लेग, कॉलरा, देवी यांसारख्या अनेक प्रकारच्या साथीच्या रोगांना बळी पडणारा जर्जर समाज डोळय़ासमोर दिसत असतानाही त्याचे खापर मात्र अस्पृश्य जातींवर फोडले जात होते,’ अशा शब्दांत अरुण ठाकूर व महम्मद खडस यांनी ‘नरक सफाईची गोष्ट’ या पुस्तकात तत्कालीन परिस्थितीचे वर्णन  केले आहे. या पार्श्वभूमीवर गांधीजींचे सफाईच्या क्षेत्रातील कार्य उठून दिसते. आपल्या अनुयायांमार्फत लोकांमध्ये व्यापक प्रमाणावर जनजागृती करण्याचे काम त्या काळात तरी देशात सर्वप्रथम त्यांनीच हाती घेतलेले दिसते. 

गांधीजींचे सफाई क्षेत्रातील योगदान मुख्यत: तीन प्रकारचे राहिले आहे. सफाईचे काम लादले गेलेल्या जातीतील व्यक्तींच्या समस्या सोडविणे, त्यांना या जोखडातून मुक्त करणे या विषयांकडे त्यांनी जातिभेद निर्मूलनाच्या दृष्टीने पाहिले व त्याप्रमाणे १९२० पासून आपल्या कामाचे स्वरूप ठरविले. आश्रमात मैला सफाईला महत्त्व देण्यात आले. हे काम केवळ एका विशिष्ट जातीपुरते मर्यादित राहू नये म्हणून सगळय़ा आश्रमवासीयांनीच ते आळीपाळीने करावे यावर त्यांनी भर दिला. उच्चवर्णीयांच्या मनातील या कामाविषयीची घृणा नष्ट व्हावी आणि या कामामागील श्रमप्रतिष्ठेची जाणीव व्हावी, म्हणून आश्रमात नव्याने वास्तव्याला आलेल्या व्यक्तीला दिले जाणारे पहिले काम म्हणजे शौचालयाची सफाई, हेच असे. सफाई कामगार हा प्राथमिक आरोग्य विषयातील तज्ज्ञ समजला जावा व त्या संदर्भात त्याचे योग्य प्रशिक्षण व्हावे असे गांधीजींचे मत होते. त्या जातीतील लोकांविषयीची त्यांची तळमळ इतकी तीव्र होती की आपल्या आयुष्याच्या शेवटच्या काळात जिथे जिथे ते जात तिथे त्यांचे वास्तव्य बहुधा याच जातीच्या वस्तीत असे. गांधीजींच्या प्रेरणेने देशात या जातीतील व्यक्तींना या जोखडातून मुक्त करण्याची चळवळच उभी राहिली आणि पुढे डोक्यावरून मैला वाहून नेण्याचे काम आणि प्रत्यक्ष मैला हटविण्याचे काम कायद्याने का होईना बंद झाले.

गांधीजींचे दुसरे योगदान आहे ते त्यांची सफाईमागील वैज्ञानिक दृष्टी. मानवी विष्ठेसह सर्व प्रकारच्या कचऱ्यापासून उत्तम प्रकारचे खत निर्माण करता आले पाहिजे व त्याचा शेतजमिनीत वापर करून जमिनीची सुपीकता आणि पिकांचे उत्पादन वाढले पाहिजे यावर त्यांचा भर होता. एक प्रकारे आरोग्य आणि पुनरुपयोग असा समन्वय साधायचा त्यांनी प्रयत्न केला. त्यामुळे शौचालयाची रचना या विचाराशी सुसंगत असावी, अशी त्यांची इच्छा होती.

तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जीवनशैली! जास्त सुखसोयी मिळविण्यासाठी माणूस जेवढय़ा गरजा वाढवतो तेवढे जास्त टाकाऊ पदार्थ तयार होतात आणि अस्वच्छतेची समस्या अधिकाधिक गंभीर होत जाते. म्हणून आपल्या गरजाच आटोक्यात ठेवणे हा त्यावरचा उपाय. निसर्ग-सुसंगत जीवनशैलीवर त्यांचा भर होता. वस्तूंच्या वापराबद्दल ते काटेकोर असत. पेन्सिली पूर्ण झिजेपर्यंत वापरत. आजच्या आधुनिक कचरा व्यवस्थापनातील ‘रिडय़ूस, रीयूज, रिसायकल’ हे सूत्र हे गांधींच्या विचाराशी सुसंगतच आहे.

गांधीजींच्या प्रेरणेने सफाई या प्रश्नाचा साकल्याने विचार करून प्रत्यक्ष संशोधन आणि कृतीतून हे काम पुढे नेणारे अनेक बुद्धिमान व ध्येयवादी कार्यकर्ते तयार झाले. महाराष्ट्रातील यापैकी काही महत्त्वाची नावे म्हणजे अप्पासाहेब पटवर्धन, बी. एच. मेहता, मोरेश्वर ऊर्फ भाऊ नावरेकर, कृष्णदास शहा. वैज्ञानिक -वैचारिक बैठक असलेल्या अप्पासाहेब पटवर्धन आणि भाऊ नावरेकर यांनी सफाईसंबंधी प्रबोधन, प्रशिक्षण आणि प्रसार या सोबतच ग्रामीण भागाशी सुसंगत अशा शौचालयांच्या प्रारूपांवर संशोधन करून अनुक्रमे ‘गोपुरी शौचालय’ नावाने आता प्रचलित असलेल्या दोन खड्डय़ांच्या चराच्या शौचालयाची आणि ‘नायगाव खतघर’ शौचालयाची निर्मिती केली. याशिवाय भाऊंनी दैनंदिन सफाईत उपयोगी पडतील अशी साधने तयार केली. त्यांनी नाशिक येथील ‘सफाई विद्यालया’त तीन वर्षे अध्यापन करून या क्षेत्रातील अनेक कार्यकर्ते घडविले. त्यांची नाशिक येथील ‘निर्मल ग्राम निर्माण केंद्र’ ही संस्था गेली चार दशके सफाईच्या क्षेत्रात मूलभूत कार्य करत आहे.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळात गांधी स्मारक निधीमार्फत हे काम गावोगावी सुरू राहिले. सरकारी पातळीवर ८०च्या दशकापर्यंत सफाईला प्राधान्य नव्हते. १९८०-१९९० या आंतरराष्ट्रीय ‘पेयजल व स्वच्छता दशकात’ भारतदेखील सहभागी झाल्यानंतर या कामाला गती आली. केंद्रात या नावाचे मंत्रालय स्थापन करण्यात आले. राष्ट्रीय स्तरावर योजना आखण्यात येऊन अंमलबजावणी सुरू झाली आणि २०१४ मध्ये स्वच्छ भारत मिशन सुरू होऊन या कार्यक्रमाला विशेष गती प्राप्त झाली. या सर्व सरकारी योजनांमध्ये शौचालयांचे बांधकाम हा प्रमुख कार्यक्रम होता. २ ऑक्टोबर २०१९ ला म्हणजे गांधीजींच्या १५० व्या जन्मदिनी भारत हागणदारीमुक्त झाल्याचे घोषित करण्यात आले. आता नव्या कार्यक्रमामध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनावर भर दिला जात आहे. 

देशात सफाईविषयी सर्वत्र सकारात्मक भाव जागा झाल्याचे दिसते. शासन, नोकरशाही, सर्वसामान्य समाज, कॉर्पोरेट क्षेत्र हेही या कामात गुंतलेले दिसतात. परंतु दर्जा आणि सातत्य याबाबत शंका आहेत. लक्ष्यपूर्तीच्या मागे लागताना लोकशिक्षणाचा मुद्दा दुर्लक्षिला जाणे आणि कार्यक्रम राबविताना लोकांना विश्वासात न घेणे हे दोष आहेतच. सर्व शौचालये तांत्रिकदृष्टय़ा निर्दोष आहेतच असे नाही, तसेच पाण्याच्या अभावामुळे त्यांचा नीट वापर होत नाही. १९९३ पासून जुन्या पद्धतीच्या शौचालयांवर बंदी असली तरी राजस्थान, उत्तर प्रदेश राज्यांच्या काही भागांत ही व्यवस्था अजूनही प्रचलित आहे. रेल्वे किंवा अन्य सार्वजनिक ठिकाणी सफाई कामगारांना ताजा मैला साफ करावा लागतो. त्यासाठी सुरक्षा व सफाई साधने सफाई कामगारांना पुरविली जाणे बंधनकारक आहे. मात्र हे काम कंत्राटदारांद्वारे केले जाते आणि ते या अटींची क्वचितच पूर्तता करतात.

अजूनही गटारे साफ करणाऱ्या कामगारांची स्थिती बिकट आहे. ज्या परिस्थितीत ते काम करतात ती जिवावर बेतणारी आहे. गेल्या पाच वर्षांत गटार सफाईचे काम करताना ३२१ कामगारांचा मृत्यू झाल्याचे लोकसभेच्या मागील अधिवेशनात सांगण्यात आले. या गटार सफाईसाठी कितीतरी आधुनिक यंत्रे उपलब्ध आहेत आणि त्यांच्या विकसित देशात चांगला उपयोग केल्या जातो. परंतु मानवी श्रमातून अशा प्रकारचे धोकादायक काम करवून घेणे हे अत्यंत बेपर्वाईचे आहे याची आपल्याकडील यंत्रणेला जराही खंत नाही.

गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या सफाईविषयक दृष्टिकोनात काहीसा सकारात्मक बदल झाला असला तरी भारतीयांच्या मूळ स्वभावातील काही दोष अजून कायमच आहेत. अजूनही आपल्याला कुठेही थुंकणे, सार्वजनिक ठिकाणी मूत्रविसर्जन करणे, कुठेही कचरा टाकणे याबद्दल काहीच विषाद वाटत नाही. आजही ‘आम्ही अस्वच्छता पसरवत राहू, सफाई मात्र विशिष्ट वर्गाने करावी’ ही वर्गवारी समाजमानसातून गेली नाही. त्यामुळे आपण विश्वगुरू होण्याच्या कितीही वल्गना केल्यात तरी जगात आपली प्रतिमा ‘घाणेरडे लोक’ अशीच आहे. एकेकाळी अस्वच्छतेच्या संदर्भात आपल्यासारखेच असलेले चीन वा दक्षिण कोरिया आपल्या कितीतरी पुढे निघून गेले आहेत. त्यामुळे जबाबदार नागरिक म्हणून आपल्यात योग्य बदल घडून येणे किती आवश्यक आहे याची जाणीव होते.

लेखक जैवशास्त्रज्ञ असून शाश्वत विकास व शाश्वत शेती या  विषयांचे अभ्यासक आहेत.

vernal.tarak@gmail.com

(या लेखासाठी सफाई विषयातील तज्ज्ञ श्रीकांत नावरेकर यांनी महत्त्वाची माहिती पुरविली.)

मराठीतील सर्व स्तंभ ( Columns ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
अन्वयार्थ : विज्ञानाला नव्हे, भावनांना धक्का..
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी