Bird Viral Video : सध्या जगभरात खून, निघृण हत्या, जीवघेणा हल्ला, दरोडा, बलात्कार, दहशतवादी हल्ला अशा काही भयानक घटना घडतात की ज्या ऐकल्यानंतर, पाहिल्यानंतर प्रश्न पडतो की, खरंच या जगात माणुसकी शिल्लक आहे का? या घटना पाहून रक्त उसळून येते. पण, जगभरात या घटनांबरोबरच काही चांगल्या घटनाही घडत असतात, ज्यातून खऱ्या माणुसकीचे दर्शन आपल्याला घडते. एकीकडे माणूस माणसाचा जीव घेताना मागचा पुढचा विचार करत नाही. पण, याच माणसातील माणुसकीचे दर्शन घडवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात एक व्यक्ती दलदलीत अडकलेल्या गरुडाला वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालताना दिसतोय. मृत्यूशी झुंज देणाऱ्या त्या गरुडाचे तो प्राण वाचवतो. या माणसाने गरुडाप्रती दाखवलेल्या माणुसकीने लोकांची मनं जिंकली आहेत.
माणूस काही दुखलं, खुपलं, अडचणीत सापडला तर बोलू शकतो, एखाद्याकडे मदत मागू शकतो. पण प्राणी, पक्ष्यांचे तसे नाही, त्यामुळे जगताना त्यांना मोठा संघर्ष करावा लागतो. या व्हिडीओतही एका गरुडाचा जगण्यासाठीचा संघर्ष सुरू आहे. व्हिडीओत पाहू शकता, एक व्यक्ती पाणी आणि चिखलाने भरलेल्या दलदलीत मृत्यूशी झुंज देणाऱ्या गरुडाला वाचवत बाहेर काढताना दिसतोय. त्या दलदलीतील चिखलात तसं चालणं फार अवघड आहे, पण तरीही जीवाची बाजी लावत ती व्यक्ती गरुडाला कसे बसे बाहेर ओढत आणते. यावेळी ती व्यक्ती पूर्णपणे चिखलात बुडाली आहे, तरीही गरुडाला वाचवण्याचा प्रयत्न ती व्यक्ती काही सोडत नाही. यावेळी गरुडही पंख फडफडवत सुटकेसाठी याचना करतोय, पण पंख चिखलाने माखल्याने तो बाहेर पडू शकत नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते दलदलीचे ठिकाणं फारच लांबलचक असं होतं, पण तरीही ताकद लावून त्या व्यक्तीने ते पार करत गरुडाचा जीव वाचवला. यानंतर दलदलीतून बाहेर पडताच गरुडाला अंघोळ घालून स्वच्छ केले आणि खायला दिले. या व्यक्तीने गरुडाप्रती दाखवलेली माणुसकी पाहून अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे.
माणुसकीचे दर्शन घडवणारा हा व्हिडीओ @AMAZlNGNATURE नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, ज्यावर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक लोक भावूक झाले, तर अनेकांनी त्या व्यक्तीच्या धाडसाचे आणि शहाणपणाचे कौतुक केले. व्हिडीओवर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, खरंच माणुसकी जिवंत आहे. दुसऱ्याने लिहिले की – हा माणूस सुपरमॅन आहे, त्याने अखेर दलदलीत फसलेल्या गरुडाला वाचवले.