“हाय स्पृहा, कशी आहेस?” स्पृहाने सागरकडे बघितलं, पण तिला विश्वासच बसेना. बऱ्याच वर्षांनी ती सागरला भेटली होती. त्यानं हाक मारली नसती तर तिनं त्याला ओळ्खलंच नसतं. कॉलेजमध्ये असताना,‘उडे जब जब जुल्फे तेरी’ अशी कॉमेंट मिळणाऱ्या सागरच्या डोक्यावरचे केस जाऊन टक्कल पडलं होतं. नियमित व्यायाम करून सिक्स पॅक कमावणाऱ्या सागरच्या पोटाचा घेर आता चांगलाच वाढला होता. इस्त्रीची घडीही मोडली जाणार नाही याची काळजी घेऊन कपडे वापरणारा सागर अत्यंत गबाळ्या वेशात तिच्या समोर उभा होता. हा असा कसा झाला? वयानुसार शरीर रचनेत नक्कीच बदल होतो, पण त्याच्या वागण्या बोलण्यातील बदल खटकणारा होता. डेअरींगबाज, बिनधास्त वाघाचा भित्रा ससा कसा झाला? हे स्पृहाला जाणून घ्यायचं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

थोड्याशा अवांतर गप्पा झाल्यानंतर सागरनं बोलायला सुरुवात केली. “स्पृहा, तू एक समुपदेशक आणि मानसोपचारतज्ञ आहेस म्हणून तुला विचारायचं होतं, आईवडील आपल्याच मुलांशी एवढं वाईट वागू शकतात? माझा संसार सुखाचा चाललेला त्यांना बघवत नसेल? माझी बहीण माझ्यावर करणी करून मला का त्रास देत असेल? माझा भाऊ माझ्या बायकोवर वाईट नजर का ठेवत असेल? ते सर्वजण माझ्याशी वाईट का वागतात? माझी आई वारंवार फोन करून मला घरी बोलावते. मी जातं नाही म्हणून रडते. हे सर्व नाटक असेल का? मी खरंच त्यांच्याशी कायमस्वरूपी संबंध तोडावेत का? मला काहीच समजत नाही, प्लीज, मला गाईड कर.”
“सागर, अरे, पण ते हे सगळं करतात, हे तुला कोणी सांगितलं?”

आणखी वाचा-World No Tobacco Day 2024: धूम्रपानाचा गर्भवती महिलांवर कसा परिणाम होतो? जाणून घ्या…

“हे सगळं बऱ्याच दिवसांपासून चालू आहे, पण हे मला माहिती नव्हतं. माझी बायको, अवंतिका हिला त्यांचे खूप अनुभव आले आहेत. तिनं बऱ्याच गोष्टी सहन केल्या मलाही कळू दिलं नव्हतं. माझ्यावरील प्रेमापोटी ती सतत सहन करीत आली आहे. आता मला तिला दुखवायचं नाहीये.”
“ती हे सगळं खरं सांगते आहे याची खात्री तू करून घेतली आहेस का?”
“अगं, ती कशाला माझ्याशी खोटे बोलेल? ती माझ्यावर जिवापाड प्रेम करते. माझ्या नातेवाईकांशी माझे संबंध चांगले राहावेत, म्हणून तर ती माझ्यापासून दूर व्हायलाही तयार आहे, पण मी तिच्यापासून दूर होऊ शकत नाही.”
“सागर, समजा तू तुझ्या नातेवाईकांशी संबंध तोडले नाहीत, तर काय होईल?”
“अगं ती मला सोडून कायमची निघून जाईल. माझी मुलं पोरकी होतील. मी तिच्याशिवाय जगू शकत नाही.”
स्पृहाने सर्व ऐकून घेतलं. ती सागरच्या घरातील सर्वांनाच चांगली ओळखत होती. त्याचे आईवडील, बहीण-भाऊ अशा पद्धतीने त्याच्याशी वागणं शक्यच नव्हतं. अवंतिकाला सासरच्या कोणत्याही व्यक्तीशी संबंध ठेवायचेच नाहीत आणि सागरनेही सर्वांशी नातं तोडावं अशी तिची इच्छा असल्यानं ती त्याला गॅसलायटिंग करून सर्वांपासून दूर करत आहे हे तिच्या लक्षात आलं. सागरला या सर्वांपासून वाचवणं गरजेचं होतं.

आणखी वाचा-Pune Porsche Accident Open Letter: लाडोबाची आई, डोळ्यातून टिपूसही न ढाळता रडण्याचं नाटक कशाला?

“सागर, ती काही तुला सोडून बिडून जाणार नाही. अरे ती तुझं गॅसलायटिंग करते आहे.”
“गॅसलायटिंग? म्हणजे काय?”
“सागर, तुझं अवंतिकावर प्रेम आहे. तिचंही तुझ्यावर आहे, पण तू सर्व तिच्या इच्छेप्रमाणे वागावंस, म्हणून ती तुझ्या मनात अशा गोष्टी भरवून देते आणि त्या तुला खऱ्या वाटतात.”
“ स्पृहा, म्हणजे ती मला इमोशनल ब्लॅकमेल करते असं तुला म्हणायचं आहे का?”
“सागर, इमोशनल ब्लॅकमेल करणं आणि गॅसलाइटिंग यामध्ये थोडा फरक आहे. भावनिक कमकुवतपणाचा फायदा घेऊन आपल्या इच्छेप्रमाणे कृती करवून घेणे याला इमोशनल ब्लॅकमेल म्हणता येईल, पण तू चुकलास किंवा चुकलीस हे पटवून देऊन एखाद्याच्या स्वतःच्या विचारावरील आत्मविश्वास कमी करून, कोणत्याही चुका घडल्या तरी त्याला तोच कसा जबाबदार आहे याबाबत त्याच्या मनात मानसिक त्रास आणि गोंधळ निर्माण करणं म्हणजे गॅसलायटिंग. सागर, या गोष्टींचा सतत विचार करून त्याचा परिणाम तुझ्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर झाला आहे. अवंतिकाचं तुझ्यावरील प्रेम खरं असलं तरी तिनं अशा पद्धतीने काही सांगून तुझ्या नातेवाईकांबद्दलचा तुझा विश्वास कमी करून त्यांच्याबद्दल आत्मशंका निर्माण करणं योग्य नाही. स्वतः वरचा आत्मविश्वास डळमळीत न करता विचारपूर्वक निर्णय घे.”

स्पृहा बराच वेळ त्याला समजावत होती आणि ती जे जे सांगत होती ते सागर लक्षपूर्वक ऐकत होता. यापुढे तरी आपण गॅसलायटिंगचा बळी व्हायचं नाही आणि कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्यायचा हे सागरला पटत होतं.

(लेखिका कौटुंबिक न्यायालयात समुपदेशक आहेत.)

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is gaslighting in a relationship are you a victim of thoughts mrj