डॉ. आशीष थत्ते ashishpthatte@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्यवस्थापनामध्ये योजना आखणे व त्या कार्यान्वित करणे याला अनन्यसाधारण महत्त्व असते. व्यवस्थापनामधील विभागात अथवा शाखेत योजना आखण्यापासूनच कामाला सुरुवात होते. नुसती योजना आखून उपयोग नसून त्याचे वेळापत्रकदेखील अत्यंत महत्त्वाचे असते. योजना आखण्यामध्ये धोरणे ठरवली जातात व कुठल्या प्रक्रिया वापराव्या लागतील याची आखणी केली जाते. तर कुठली क्रिया केल्यावर ही योजना यशस्वी होईल यांची मांडणी वेळापत्रकात केली जाते. म्हणजे खर्च, उत्पन्न, वेळ, लागणारे मनुष्यबळ वगैरे यांची मांडणी केली जाते. किंबहुना कित्येक योजना चांगल्या असतात, मात्र त्याचे वेळापत्रक चुकते आणि चांगली योजना अक्षरश: अपयशी ठरते आणि कंपन्यांना तोटा सहन करावा लागतो. म्हणजे योजना व वेळापत्रक यांची सांगड घालणे फार महत्त्वाचे असते. परत हे सगळे अतिशय औपचारिक पद्धतीनेच करावे लागते.

सोपे उदाहरण म्हणजे बांधकाम करणाऱ्या कंपन्या. अगदी छोटासा पूल बांधण्यापासून ते ९० मजल्यांची इमारत बांधणे. आधी ९० वा मजला बांधतो, नंतर १ ते ८९ बांधू असे करू शकत नाही. म्हणजेच आधी कळस मग पाया असे करून चालत नाही. म्हणजे वेळापत्रक अतिशय चोख असावे लागते. नुसती चांगली योजना असून उपयोग नसतो. उत्पादनाच्या वेळापत्रकात करोनाकाळ सोडला तर सगळे वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून करता येते. मग हे करताना ‘बॉटलनेक’ म्हणजेच कुठे कुठे संभाव्य अडथळे येऊ शकतात याची जाणीव होते आणि ते कसे पार करायचे याचेदेखील उत्तर शोधावे लागते. अत्याधुनिक संगणक प्रणालीमुळे हे काम थोडे सोपे झाले आहे. तरीही शेवटी योजना व वेळापत्रक आखण्याचे काम माणसांनाच करावे लागते. म्हणजे मे महिन्यात आइस्क्रीमचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना तसे वेळापत्रक आखावे लागते. अन्यथा आवडते आइस्क्रीम उन्हाळय़ात नाही खायला मिळाले तर काय उपयोग? आता पावसाळा आला की छत्री आणि रेनकोटच्या जाहिरातींचा आधी पूर येतो व पाऊस नंतर येतो. हे सगळे योग्य वेळापत्रक आखले तर कंपन्यांना नफा मिळवून देतात. जेव्हा संसाधनांची कमी असते त्या वेळी वेळापत्रकाचे महत्त्व अधोरेखित होते. सध्या सुरू असणाऱ्या आयपीएलचे वेळापत्रक नक्की बघा. ते अत्यंत चोख असते.

वेळापत्रकामुळे विविध विभागांमध्ये ताळमेळदेखील सुधारतो. प्रत्येक विभागाला त्यांची जबाबदारी आखून दिली जाते. ‘ई-कॉमर्स’च्या युगात तर याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अर्थात अति महत्त्वाकांक्षी वेळापत्रक आखणेदेखील महागात पडू शकते. कंपन्यांमध्ये योजना आणि वेळापत्रकाचे महत्त्व आपण बघितले. पुढील आठवडय़ात घरात आपण हे कसे वापरतो ते बघू. तुमच्याकडे याबाबत काही विचार असल्यास जरूर कळवा. लेखक कॉस्ट अँड मॅनेजमेण्ट अकाउंटंट म्हणून कार्यरत

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Importance of planning and sheduling zws
First published on: 09-05-2022 at 01:05 IST