‘अर्था’मागील अर्थभान : योजना व वेळापत्रक (प्लॅनिंग अँड शेडय़ूलिंग) – भाग २

दिवाळी म्हणजे योजना आखणे आणि वेळापत्रक बनवणे याचे उत्तम उदाहरणच.

डॉ. आशीष थत्ते ashishpthatte@gmail.com

दैनंदिन जीवनातसुद्धा आपण योजना आखतो. वेळापत्रकसुद्धा बनवतो आणि कधी कधी फसलेल्या योजना किंवा कोलमडलेल्या वेळापत्रकाचा सामनादेखील आपल्याला करावा लागतो. घरात सण किंवा समारंभ म्हणजे योजना व वेळापत्रकाची खरी परीक्षा असते. लग्न करणे ही योजना असते तर त्यातील प्रत्येक समारंभ अगदी हल्लीच्या लग्नपूर्व फोटोशूटपासून ते हनिमूनपर्यंत सर्वाचे वेळापत्रक व्यवस्थित आखले जाते. दिवाळी म्हणजे योजना आखणे आणि वेळापत्रक बनवणे याचे उत्तम उदाहरणच. घरात दिवाळीचा प्रत्येक पदार्थ योग्य वेळापत्रक करून बनविला जातो. तथापि, कंपन्यांनी करोडो रुपये खर्चून व्यवस्थापनाचे धडे गिरवण्यापेक्षा आपल्या कर्मचाऱ्यांना त्यांचे हे व्यावहारिक अनुभव विचारले तरी चालतील!   

सुट्टय़ांचा आनंद घ्यावा असे सगळय़ांनाच वाटते. मग होते ती परदेशात जायची योजना. पण नुसती योजना असून चालत नाही तर त्याचे वेळापत्रकदेखील आखावे लागते. जे अतिशय कठीण असते. कारण प्रत्येक काम हे वेळापत्रकानुसारच व्हावे लागते. त्यात अगदी व्हिसापासून ते परतीच्या प्रवासाचे तिकीट बुकिंगपर्यंत सगळेच आले. मग हे आपण सगळे करू शकत नाही म्हणून ट्रॅव्हल कंपन्यांचा उदय झाला. ते तुम्हाला तुमच्या ट्रिपचे पूर्ण वेळापत्रक आखून देतात, मग अगदी भारतातली ट्रिपही का असेना. उन्हाळय़ातील लोणची, पापड वाळत घालणे हीसुद्धा वेळापत्रकाची कसोटीच. थोडे पुढे किंवा मागे राहून चालत नाही. आजकालच्या फ्लॅटच्या जमान्यात फार मोठे स्वयंपाकघर मिळतही नाही, तेव्हा कुठल्याही समारंभात कमीत कमी जागेत आणि कुठला पदार्थ कधी आणि कसा बनविणे याची कसोटी त्या गृहिणीच जाणतात.

हल्लीचं आपलं वेळापत्रक तंत्रज्ञानाच्या मदतीने सोपे झाले आहे जसे की, गूगल मॅप वगैरे. तरीही ते बनवावं तर लागतंच. अतिमहत्त्वाकांक्षी वेळापत्रकसुद्धा तेवढेच घातक असते. ई-कॉमर्सच्या युगात दहा मिनिटांत डिलिव्हरी किंवा अध्र्या तासात वस्तू घरी पोहोचवू अशा जाहिराती केल्या जातात आणि त्या बिचाऱ्या सामान पोहोचते करणाऱ्या डिलिव्हरी बॉयला हे वेळापत्रक पाळावे लागते. त्यामुळे वेगात गाडी चालवणे, ग्राहकाशी हुज्जत घालण्यासारखे प्रकार होतात. रोज ऑफिसला जाणे हेदेखील एक वेळापत्रकच असते. मुंबईमध्ये सध्या वेळापत्रक आखताना एसी लोकलच्या वेळा धरून वेळापत्रक आखले जाते!   

थोडक्यात काय तर योग्य वेळापत्रक आखा व आपली योजना यशस्वी करा, फक्त रोज नाही तर जीवनातदेखील व्यवस्थापनाचे हे सूत्र पाळा.

लेखक कॉस्ट अँड मॅनेजमेण्ट अकाउंटंट म्हणून कार्यरत /

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त ( Arthvrutant ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Planning and scheduling part 2 zws

Next Story
माझा पोर्टफोलियो : संकटाला धावून येई सत्वरी
फोटो गॅलरी