बेंगळूरु : सौरऊर्जानिर्मितीसाठी वापरात येणारी पटले आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या निर्मात्यांकडील वाढत्या मागणीमुळे भारतातील चांदीची आयात विद्यमान वर्षात दुपटीने वाढण्याची शक्यता आहे. परिणामी गुंतवणूकदारांना सोन्यापेक्षा चांदीच सरस परतावा मिळवून देईल, असा अंदाज प्रमुख आयातदारांनी शुक्रवारी व्यक्त केला.

जगातील सर्वात मोठा चांदीचा आयातदार देश असलेल्या बाजाराकडून वाढलेल्या उच्च आयातीमुळे जागतिक पातळीवर चांदीची किमत आणखी वधारण्याची शक्यता आहे. सध्या भारताकडून होत असलेली चांदीची आयात ही दशकभरातील सर्वोच्च पातळीजवळ पोहोचली आहे. देशाने गेल्या वर्षी ३,६२५ मेट्रिक टन चांदीची आयात केली होती. वाढत्या औद्योगिक मागणीमुळे यंदा आयात ६,५०० ते ७,००० टनांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे, असे आम्रपाली समूह गुजरातचे मुख्य कार्यकारी अधिकारी चिराग ठक्कर यांनी सांगितले.

हेही वाचा…अनिल अंबानींना भांडवली बाजारात व्यवहारास पाच वर्षांची बंदी; बाजार नियामक ‘सेबी’कडून २५ कोटींचा दंडही

विद्यमान २०२४ वर्षाच्या पहिल्या सहामाहीत भारताची चांदीची आयात वर्षभरापूर्वी असलेल्या ५६० टनांवरून ४,५५४ टनांवर पोहोचली आहे, असे व्यापार मंत्रालयाच्या आकडेवारीने स्पष्ट केले आहे. गेल्या महिन्यात २३ जुलै रोजी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात सोने आणि चांदीवरील आयात शुल्क कमी करण्यात आल्यामुळे, चांदीची मागणी वाढली. चांदीवरील आयात शुल्क १५ टक्क्यांवरून वरून ६ टक्क्यांपर्यंत कमी केले गेले आहे. शिवाय चांदीच्या पारंपरिक दागिन्यांच्या मागणीतदेखील वाढ झाली आहे. ग्राहक गुंतवणुकीच्या उद्देशानेही चांदीकडे आकर्षित होत आहेत, असेही ठक्कर यांनी सांगितले.

हेही वाचा…Anil Ambani : अनिल अंबानींवर सेबीची कारवाई, २५ कोटींचा दंड ठोठावत पाच वर्षांसाठी घातली बंदी

विक्रमी भाव उच्चांक

वर्षाच्या पहिल्या सहामाहीत चांदीमध्ये गुंतवणुकीसाठी मागणी अभूतपूर्व राहिली. कारण सोन्यापेक्षा अधिक परतावा मिळेल या अपेक्षेने चांदीची खरेदी करण्यात आली. देशांतर्गत बाजारात चांदीने वायदे बाजारात (फ्युचर्स) मे महिन्यात प्रति किलो ९६,४९३ रुपयांचा (१,१५१ डॉलर) विक्रमी उच्चांक नोंदवला. २०२४ या कॅलेंडर वर्षांत चांदीची किंमत सुमारे १४ टक्क्यांनी वधारली आहे तर सोन्याच्या किमतीत १३ टक्के वाढ झाली आहे. भारत प्रामुख्याने संयुक्त अरब अमिराती, ब्रिटन आणि चीनमधून चांदीची आयात करतो.