मुंबई: भांडवली बाजाराची नियंत्रक असलेल्या ‘सेबी’ने आपल्याच कर्मचाऱ्यांना चुकीचे ठरविणारे, ४ सप्टेंबरला प्रसिद्धीस दिलेले पत्रक मागे घेण्याची वेळ आली. ‘बाह्य घटकांकडून कर्मचाऱ्यांची दिशाभूल’ असा दावा केलेल्या पत्रकावरून कर्मचारी आक्रमक झाल्याने ‘सेबी’ने अखेर हे पत्रक सोमवारी मागे घेताना, कर्मचाऱ्यांशी निगडित विषय संस्थांतर्गत पातळीवर सोडविले जातील, असेही स्पष्ट केले.

‘सेबी’च्या पाचशे कर्मचाऱ्यांनी ६ ऑगस्टला केंद्रीय अर्थमंत्रालयाला पत्र लिहिले होते. त्यात संस्थेतील वरिष्ठ व्यवस्थापनाची वर्तणूक आणि संस्थेतील कार्यपद्धतीबाबत अनेक गंभीर मुद्दे उपस्थित करण्यात आले होते. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर ‘सेबी’ने ४ सप्टेंबर रोजी प्रसार माध्यमांसाठी एक निवेदन काढले होते. त्यात कर्मचाऱ्यांचे आरोप खोटे ठरविण्यात आले. यामुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी सेबीच्या मुख्यालयासमोर ५ सप्टेंबरला आंदोलन केले होते. हे निवेदन मागे घेऊन ‘सेबी’च्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांचा राजीनामा घेण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली होती.

हेही वाचा : कोहिनूर, एलटी फूड्सचे समभाग तेजीत, केंद्र सरकारने बासमती तांदळावरील निर्यात मूल्य हटविल्याचा फायदा

यानंतर आता ४ सप्टेंबरला प्रसिद्धीस दिलेले निवेदन मागे घेतले असल्याचे ‘सेबी’ने म्हटले आहे. त्या संबंधाने सोमवारी प्रसृत केलेल्या निवेदनांत, गेल्या ३६ वर्षांत ‘सेबी’साठी कर्मचाऱ्यांनी मोठे योगदान दिले आहे. भारतीय भांडवली बाजार हे जगात अतिशय उत्तम नियामक पद्धती असणारे आहेत. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे. संस्थेतील अंतर्गत मुद्दे ठराविक कालावधीत सोडविण्यात येतील, अशी ग्वाहीही त्यात देण्यात आली आहे.