बँकेचा मालक, भागधारक, कर्ज घेऊन पळून जाणारा ऋणको, सरकार इत्यादींनी बँक बुडवल्याची कित्येक उदाहरणे देशात आणि परदेशात सापडतील. मात्र बँकेच्या छोट्याशा कर्मचाऱ्याने बँक बुडवली असा किस्सा काही निराळाच. जशी त्याने बँक बुडवली तसेच त्याने कदाचित आपल्या जीवनावर चित्रपट बनवणाऱ्या निर्मात्यालाही बुडवले असावे, कारण तो चित्रपटदेखील फारसा चालला नाही. ही घटना तशी जुनी आहे, म्हणजे नव्वदीच्या आसपासची. त्या वेळेचे जोखीम व्यवस्थापन नाममात्रच होते. बेरिंग्स बँक असे बँकेचे नाव आणि निकोलस म्हणजे निक लिसोन असे त्या महाभागाचे नाव. वर्ष १७६२ मध्ये स्थापन झालेल्या बँकेने तब्बल २२५ वर्षे आयुष्य जगले होते म्हणजे दोन्ही जागतिक युद्धे आणि अन्य कित्येक धक्के पचवून बँक उभी होती. इंग्लंडच्या महाराणीचे खाते देखील या बँकेकडे होते.

हेही वाचा: निर्देशांकांची सलग सातव्या सत्रात वाढ; पॉवेल यांच्या भाषणापूर्वी मात्र सावध पवित्रा

वर्ष १९८७ मध्ये मॉर्गन स्टॅन्ली बँकेतून निक याने आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली आणि फ्यूचर्स आणि ऑप्शन्सच्या जगात पाऊल टाकले. दोन वर्षांनंतर त्याने बेरिंग्स बँकेत प्रवेश केला. कारण, त्याला प्रत्यक्ष बाजारात जाऊन व्यवहार करता येतील अशी आशा होती. सुरुवातीला त्याचे काम हाँगकाँगमधील बँक ऑफिसला मदत देण्याचेच होते. त्यामुळे त्याला इंडोनेशियामधील जकार्ता येथे पाठवण्यात आले. तिथे त्याने बँकेच्या सुमारे १० कोटी पौंडांच्या पैसे न भरलेल्या समभागांची वसुली बँकेसाठी केली. इथे त्याची भावी बायको लिसा सिम्स हिच्याशी भेट झाली आणि वर्ष १९९२ मध्ये तिच्याशी लग्न केले. एप्रिल १९९२ मध्येच या तशा छोट्याशा कर्मचाऱ्याची बदली सिंगापूरला झाली. इथूनच बँकेचे आणि त्याचे नशीब रसातळाला जायला सुरुवात झाली. त्याच्या कामाचे स्वरूप म्हणजे आर्बिट्राज. आजदेखील बँका आर्बिट्राजच्या माध्यमातून पैसे कमावतात. आर्बिट्राज म्हणजे एका बाजारातील समभागांची किंवा निर्देशांकाची किंमत दुसऱ्या बाजारात सारखी नसते. ही किंमत अतिशय कमी फरकाने वेगळी असते. पण ज्याला बाजाराच्या जोखमीचा अंदाज असतो तो ही किंमत बघून सांगू शकतो की, पुढे जाऊन तो उभा असलेल्या बाजारात किंमत वाढणार आहे की कमी होणार आहे. अर्थात हे सगळे अंदाजावर असते. यात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे सगळे मार्जिन मनीवर होते, याला पूर्ण किंमत सुद्धा गुंतवावी लागत नाही. सिंगापूर इंटरनॅशनल मॉनेटरी एक्सचेंजमध्ये जपानी कंपन्यांचा एक निर्देशांक होता निक्केई २२५ ज्यात दोनशे पंचवीस समभाग होते. ज्याला जपानी अर्थव्यवस्थेचा निर्देशांक म्हटले जायचे. जो आज ही अस्तितवात आहे. निकचे काम होते की, या जोखमीचा अंदाज घेऊन ३,६,९,१२ महिन्यांचे वायदे करार करायचे. म्हणजे थोडक्यात आर्बिट्राज करून बँकेला नफा मिळवून द्यायचा. प्रत्यक्ष बाजारात उतरून हे काम करणे कठीण होते. कारण त्या वेळेला आजच्यासारखे संगणक नव्हते तर एक्सचेंजच्या मजल्यावर जाऊन व्यवहार करायचे होते. हाताच्या इशाऱ्याने हे काम चालायचे. बँकेची चूक अशी झाली की, निकला प्रत्यक्ष आणि बॅक ऑफिसमध्ये कामाचा अनुभव असल्याने दोन्हीची जबाबदारी बँकेने त्याच्यावर सोपवली. व्यवहार करणारा आणि त्याचा हिशोब ठेवणारा हे दोन्ही एकच होते. चूक तशी बघायला गेली तर छोटीशी होती पण पुढे जे अघटित घडले त्यामुळे बँकेचे अस्तित्व मिटले गेले.