अमिताभ सिन्हा, एक्सप्रेस वृत्त

नवी दिल्ली : देशाने आपले स्वत:चे विज्ञान आणि तंत्रज्ञान विकसित केल्याशिवाय १० ते १२ टक्के आर्थिक विकास दरवाढ साध्य करता येणार नाही, असे प्रतिपादन सरकारचे प्रमुख विज्ञान सल्लागार अजय कुमार सूद यांनी दिला आहे.

‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत सूद म्हणाले, की भूतकाळात भारताला काही महत्त्वाचे तंत्रज्ञान विकसित करण्यात अपयश आले आणि ती परिस्थिती पुन्हा उद्भवू देता कामा नये. कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स), पुंज तंत्रज्ञान (क्वांटम फिजिक्स), स्वच्छ ऊर्जा उपाय  किंवा सेमीकंडक्टरसारख्या क्षेत्रांचा अजूनही विकास होत आहे, भारताने ही संधी गमावता कामा नये. 

सूद म्हणाले की, ‘‘विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सुधारणा आपल्या आर्थिक विकासाशी निगडीत आहेत. देश २०४७पर्यंत विकसित करण्याच्या  आपल्या ध्येयासाठी सुधारणा अत्यावश्यक आहेत. ८ ते १० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त आर्थिक विकास दरवाढ साधणे तंत्रज्ञानाचा विकास किंवा संशोधनाशिवाय शक्य नाही. या तंत्रज्ञानांमुळेच आगामी दशकांमध्ये आपल्या आर्थिक वाढीला चालना मिळेल. यापैकी बहुतेक तंत्रज्ञान अजूनही विकसित होत आहे आणि या क्षेत्रांमध्ये मूलभूत योगदान देण्याची भारताला संधी आहे. विकसित भारत हा विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्राचे ‘नेतृत्व’ भारताकडे असेल.’’

हेही वाचा >>> मोदींना फक्त श्रीमंतांची चिंता; राहुल गांधी यांचा आरोप

भारताकडे चांगल्या वैज्ञानिक परंपरा 

भारताला विज्ञानाचा मजबूत पाया आणि चांगल्या वैज्ञानिक परंपरा आहेत. पण आपले वैज्ञानिक योगदान हे आपला आकार किंवा आपल्या क्षमतांच्या तुलनेत फारसे दखलपात्र ठरत नाही. नेहमी वापरल्या जाणाऱ्या वैज्ञानिक सूचकांमधून ही बाब स्पष्ट होते. खरे तर आपण पहिल्या तीन किंवा पाचमध्ये असायला हवे. पण केवळ संख्यात्मक सुधारणांचा उपयोग नाही तर आपण दर्जात्मक काम केले पाहिजे, अशी अपेक्षा सूद यांनी व्यक्त केली.

विज्ञान-तंत्रज्ञानाला आर्थिक ध्येयाशी जोडणे आवश्यक!

विज्ञान आणि तंत्रज्ञानाला व्यवसायाशी, आर्थिक घडामोडींशी जोडले पाहिजे. आपल्या आर्थिक प्रारूपाशी, आर्थिक ध्येयाशी विज्ञान-तंत्रज्ञान जोडले गेले पाहिजे. तंत्रज्ञानाचे देशीकरण होणे आवश्यक आहे. आपल्याला नव्या तंत्रज्ञानाची गरज आहे, अन्यथा आपण फक्त इतरांचे अनुकरण करत राहू. आपण स्वत:चे विज्ञान आणि तंत्रज्ञान तयार केले नाही तर आपण कधीही १०-१२ टक्के आर्थिक विकास दर साध्य करू शकणार नाही. असेही अजय कुमार सूद यांनी नमूद केले