देशाची राष्ट्रीय विमान कंपनी असलेल्या एअर इंडियाने आज (८ मार्च) महिला दिनानिमित्त एक चांगली घोषणा केली आहे. त्यानुसार, आज दिवसभरातील सर्व १२ आंतरराष्ट्रीय आणि ४० हून अधिक देशांतर्गत विमानांचे सारथ्य केवळ महिला पायलट करणार आहेत. त्याचबरोबर विमानात केवळ महिला क्रू मेंबर्स ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. याद्वारे एअर इंडियाकडून महिला शक्तीचा जागर केला जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा


एअर इंडियाच्या या निर्णयामुळे आजच्या दिवशी जगातील कानाकोपऱ्यात जाणाऱ्या विमानांची धुरा ही महिला पायलट्सच्या हाती सोपवण्यात येणार आहे. आमच्यासाठी हा अत्यंत अभिमानाचा आणि सन्मानाचा क्षण आहे कारण, एअर इंडियाच्या महिला कर्मचारी जागतीक स्तरावर एव्हिएशन क्षेत्रात आपला ठसा उमटवतील. त्यामुळे मी त्यांचे अभिनंदन करतो असे एअर इंडियाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक अश्वनी लोहानी यांनी म्हटले आहे.

त्यामुळे आज एअर इंडियाच्या दिल्ली-सिडनी, मुंबई-लंडन, दिल्ली-रोम, दिल्ली-लंडन, मुंबई-दिल्ली-शांघाई, दिल्ली-पॅरिस, मुंबई-नेवार्क, मुंबई-न्यूयॉर्क, दिल्ली-न्यूयॉर्क, दिल्ली-वॉशिंग्टन, दिल्ली-शिकागो आणि दिल्ली-सॅनफ्रान्सिस्को या विमानांची संपूर्ण धुरा ही उच्च प्रशिक्षित महिलांच्या हाती असणार आहे.

यापूर्वी नोव्हेंबर १९८५ मध्ये एअर इंडियाने असाच निर्णय घेतला होता. त्यावेळी सर्व महिला कॉकपिट क्रू मेंबर्सने विमानांचा ताबा घेतला होता. कोलकाता ते सिलचर या मार्गावरील मैत्री फ्लाईटसाठी हा निर्णय घेण्यात आला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Air india to operate 12 international 40 domestic flights with all women crew on womens day