andaman islands named after param vir chakra recipients zws 70 | Loksatta

अंदमानच्या बेटांना ‘परमवीर चक्र’ विजेत्यांची नावे

उत्तर व मध्य अंदमानमधील ‘आयएनएएन ३७०’ क्रमांकाच्या पहिल्या निर्जन बेटाला मेजर सोमनाथ शर्माचे नाव देण्यात आले.

अंदमानच्या बेटांना ‘परमवीर चक्र’ विजेत्यांची नावे
(संग्रहित छायाचित्र)

पोर्ट ब्लेअर : केंद्र सरकारने अंदमान-निकोबार या केंद्रशासित प्रदेशातील २१ निर्मनुष्य बेटांना देशाचा सर्वोच्च युद्धकालीन शौर्य पुरस्कार असलेल्या ‘परमवीर चक्र’प्राप्त शूर सैनिकांची नावे दिली आहेत. या २१ बेटांपैकी १६ उत्तर आणि मध्य अंदमान जिल्ह्यात आहेत, तर पाच बेटे दक्षिण अंदमानमध्ये आहेत.

अंदमान-निकोबार बेटांचे खासदार कुलदीप राय शर्मा यांनी संरक्षण व स्थानिक प्रशासनाच्या सहाय्याने या शूर सैनिकांची नावे २१ बेटांना नाव देण्याच्या केंद्राच्या निर्णयाचे स्वागत केले.

उत्तर व मध्य अंदमानमधील ‘आयएनएएन ३७०’ क्रमांकाच्या पहिल्या निर्जन बेटाला मेजर सोमनाथ शर्माचे नाव देण्यात आले. आता ते ‘सोमनाथ द्वीप’ म्हणून ओळखले जाईल. त्यांना ‘परमवीर चक्रा’चा पहिला सन्मान प्राप्त झाला होता. शर्मा यांना ३ नोव्हेंबर १९४७ रोजी श्रीनगर विमानतळाजवळ पाकिस्तानी घुसखोरांशी दोन हात करताना आपला हौतात्म्य प्राप्त झाले. बडगामच्या लढाईत त्यांच्या शौर्य आणि बलिदानासाठी त्यांना मरणोत्तर परमवीरचक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १९४७ मध्ये भारत-पाकिस्तान युद्धात सुभेदार आणि मानद कॅप्टन करम सिंग यांना वीरमरण प्राप्त झाले होते. ‘आयएनएएन ३०८’ क्रमांकाच्या बेटाला ‘करमसिंग द्वीप’ असे नाव देण्यात आले. तसेच मेजर राम राघोबा राणे, नाईक जदुनाथसिंग, कंपनी हवालदार मेजर पिरूसिंग शेखावत, कॅप्टन गुरबचनसिंग सलारिया, लेफ्टनंट कर्नल धनसिंग थापा मगर, सुभेदार जोगिंदर सिंग साहनन, मेजर शैतानसिंग भाटी, कंपनी क्वार्टरमास्टर हवालदार अब्दुल हमीद, लेफ्टनंट कर्नल अर्देशीर बुजरेरजी तारापोर, लान्स नाईक अल्बर्ट एक्का, कर्नल होशियार सिंग दहिया, सेकंड लेफ्टनंट अरुण खेतरपाल, फ्लाइंग ऑफिसर निर्मल जीतसिंग सेखोन, मेजर रामस्वामी परमेश्वरन, कॅप्टन बाणा सिंग, कॅप्टन विक्रम बत्रा, कॅप्टन मनोज कुमार पांडे आणि सुभेदार मेजर संजय कुमार या सर्व परमवीर चक्राने सन्मानित योद्धय़ांची नावे या बेटांना देण्यात आली आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 05:29 IST
Next Story
श्रद्धा वालकर हत्या प्रकरण : आफताबच्या ‘नार्को’नंतरची चौकशी तिहार कारागृहात पूर्ण