पीटीआय, नवी दिल्ली सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) कार्यकारी प्रमुख राहुल नवीन यांची बुधवारी पूर्णवेळ संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राहुल नवीन हे १९९३ च्या बॅचचे भारतीय महसूल सेवेतील (आयआरएस) अधिकारी असून, त्यांची नियुक्ती दोन वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे, असे मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (एसीसी) जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. ईडीचे संचालक पद हे केंद्र सरकारमध्ये अतिरिक्त सचिव (एएस) रँकचे पद आहे. राहुल नोव्हेंबर २०१९ मध्ये ‘ईडी’त विशेष संचालक (ओएसडी) म्हणून रुजू झाले होते. संजय कुमार मिश्रा यांचा ईडीच्या संचालकपदाचा कार्यकाळ गेल्या वर्षी १५ सप्टेंबर रोजी संपुष्टात आल्यानंतर राहुल यांची ईडीचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. हेही वाचा >>>Arun Yogiraj: रामलल्लाची मूर्ती साकारणाऱ्या अरुण योगीराज यांना अमेरिकेने व्हिसा नाकारला; योगीराज म्हणाले… केंद्रीय गृहसचिवपदी गोविंद मोहन वरिष्ठ ‘आयएएस’ अधिकारी गोविंद मोहन यांची बुधवारी अजय कुमार भल्ला यांच्यानंतर पुढील केंद्रीय गृहसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या संस्कृती मंत्रालयाचे सचिव म्हणून कार्यरत असलेले मोहन गृह मंत्रालयात विशेष कर्तव्य अधिकारी म्हणून रुजू होतील.