पीटीआय, बीजिंग : चीनमधील एकमेव कम्युनिस्ट पक्षाचे पंचवार्षिक अधिवेशन आज, रविवारपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनात राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांना पक्षाचे महासचिव आणि संरक्षण दलाचे प्रमुख म्हणून तिसरा पाच वर्षांचा कार्यकाळ मिळण्याचे जवळपास निश्चित असून त्यामुळे ते माओ झेडोंग यांच्यानंतर आजवरचे सर्वात शक्तिशाली नेते होतील.
येथील प्रसिद्ध तियानमेन चौकातील मध्यवर्ती सभागृहात ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना’चे (सीपीसी) देशभरातील २,२९६ निवडक प्रतिनिधी जमा झाले आहेत. हे सर्व प्रतिनिधी जिनपिंग यांनी आखून दिलेल्या निर्देशांनुसार निवडले आहेत, हे विशेष. आठवडाभर चालणाऱ्या या अधिवेशनात पक्षाची आणि पर्यायाने देशाची ध्येयधोरणे निश्चित केली जातील. तसेच सर्वोच्च नेतेपदी जिनपिंग यांची फेरनिवड होईल. मात्र जिनपिंग वगळता अन्य महत्त्वाच्या पदांचा खांदेपालट होईल. चीनमधील दुसऱ्या क्रमांकाचे नेते पंतप्रधान ली केकीअँग आणि परराष्ट्रमंत्री वँग यी यांच्यासह अनेक मोठे फेरबदल याच अधिवेशनात निश्चित होतील. २२ तारखेपर्यंत हे अधिवेशन सुरू राहील.
सर्वसत्ताधीश जिनपिंग
२०१८ साली चीनच्या राष्ट्रीय संसदेने कायदा बदलून राष्ट्राध्यक्षांसाठी असलेली १० वर्षांची मर्यादा हटवली. त्याचा उपयोग आता होणार आहे. या अधिवेशनात जिनपिंग यांना आणखी एक ५ वर्षांचा कार्यकाळ बहाल केला जाईल. त्यामुळे त्यांची ताकद कैक पटींनी वाढणार असल्याचे मानले जात आहे.