तब्बल ३६ वर्षांच्या भारतीय नौदलातील सेवेनंतर ‘आयएनएस रणजित’ या क्षेपणास्त्र विनाशिकेने (मिसाईल डिस्ट्रॉयर) सोमवारी नौदलातून निवृत्ती घेतली. विशाखापट्टणम येथील नाविक तळावर या विनाशिकेला अखेरची मानवंदना देण्यात आली. १९८३ साली ‘आयएनएस रणजित’ ही विनाशिका भारतीय नौदलाच्या सेवेत रुजू झाली होती.
सोव्हिएत महासंघाने तयार केलेल्या काशीन श्रेणीतील पाच विनाशिकांमधील ही तिसरी विनाशिका आहे. युक्रेनमधील कोमुनारा शिपबिल्डींग प्रकल्पात ‘आयएनएस रणजित’ची उभारणी करण्यात आली होती. त्यानंतर प्रोजेक्ट ‘६१ एमझेड’ अंतर्गत या विनाशिकेला ‘पोराझायुश्ची’ हे नाव देण्यात आले. ‘नाटो’च्या यादीमध्ये या विनाशिकेला काशिन क्लास असे संबोधले गेले आहे. १६ जून १९७९ रोजी ही विनाशिका लॉन्च करण्यात आली आणि त्यानंतर ३० ऑक्टोबर १९८१ साली सोव्हिएत महासंघाच्या नौदलात या विनाशिकेला सामील करून घेण्यात आले होते. त्यानंतर ही विनाशिका भारतीय नौदलाला देण्यात आली. भारतीय नौदलात सामील झाल्यानंतर या विनाशिकेचे नामांतरण ‘आयएनएस रणजित’ असे करण्यात आले.
Have a look at some of the solemn moments from the decommissioning ceremony of INS Ranjit, held at sunset this evening. H.E. Admiral DK Joshi (Retd) Hon'ble LG of Andaman & Nicobar was the Chief Guest for the occasion. He also was the commissioning crew of the ship in 1983. pic.twitter.com/TE2oZxOEt8
— SpokespersonNavy (@indiannavy) May 6, 2019
‘आयएनएस रणजित’ या विनाशिकेचे वजन ३९५० टन असून गाईडेड मिसाईल डिस्ट्रॉयर ही तिची खासियत होती. ४ गॅस टर्बाइन इंजिन आणि यात लावण्यात आलेले दोन शेफ्टमुळे या विनाशिकेला ७२ हजार हॉर्स पॉवरची ताकद मिळत होती. नौदलात सामिल झाल्यानंतर ही विनाशिकेने जगाच्या ३५ फेऱ्या होतील इतक्या म्हणजेच ७ लाख ४३ हजार समुद्री मैलांचा प्रवास केला आहे.
सध्या भारतीय नौदलाच्या ताफ्यात असलेल्या विनाशिकेतील दिल्ली श्रेणीतील विनाशिकेची निर्मिती भारतातच करण्यात आली आहे. त्यानंतर नौदलात सामिल झालेल्या ‘आयएनएस कोलकाता’ची निर्मितीदेखील भारतातच करण्यात आली आहे. २०१४ ते २०१६ या कालावधीत या विनाशिकांना भारतीय नौदलाच्या सेवेत रुजू करण्यात आले. त्यानंतर २०१८ साली ‘आयएनएस विशाखापट्टणम’ देखील नौदलात सामिल करण्यात आली. तसेच गेल्या महिन्यात ‘आयएनएस इम्फाळ’ ही विशाखापट्टणम श्रेणीतील विनाशिका लॉन्च करण्यात आली. प्रोजेक्ट ‘१५ बी’ अंतर्गत तयार केलेली ही तिसरी विनाशिका आहे. सध्या या युद्धनौकेचे परीक्षण सुरू असून पुढील काही वर्षांमध्ये ही नौदलाच्या सेवेत रूजू होईल.