पुढील वर्षी होणारी जेईई मुख्य परीक्षा आता आणखी काही प्रादेशिक भाषांमध्ये घेण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली. संयुक्त प्रवेश मंडळाने (जेएबी) नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार (एनईपी) हा निर्णय घेतला आहे. अभियांत्रिकीसाठीची जेईई मुख्य परीक्षा (प्रवेश परीक्षा) सध्या इंग्रजी, हिंदी आणि गुजराती या तीन भाषांमध्येच घेतली जाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपल्या ट्विटर अकाउंटवरुन माहिती देताना पोखरियाल म्हणाले, “राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा हा निर्णय सरकारने आणलेल्या नव्या शिक्षण धोरणाला पुढे घेऊन जाईल. ज्या राज्यांमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी प्रादेशिक भाषांना प्राधान्य दिले जाते तिथे जेईई परीक्षा प्रादेशिक भाषेत घेण्यात येईल.”

शिक्षण मंत्री म्हणाले, “सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना जेईई मुख्य परीक्षेत आणखी जास्त गुण मिळवण्यास मदत होईल. प्रादेशिक भाषांमध्ये जेईई परीक्षा घेतल्याने मेरिटमध्ये वाढ होईल. तसेच भाषेच्या अडचणीमुळे जे विद्यार्थी चांगले गुण मिळवू शकत नव्हते ते आणखी चांगले गुण मिळवण्यात सक्षम होतील.”

या निर्णयाचे दूरगामी परिणाम होणार आहेत कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी असे निदर्शनास आणून दिले आहे की, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी मूल्यांकनसाठीच्या (पीआयएसए) परीक्षेत उच्च स्थान मिळवणारे देश मातृभाषेला शिक्षणाचे माध्यम म्हणून वापरतात. संयुक्त प्रवेश मंडळाच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना प्रश्न अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास आणि उच्चांक मिळविण्यात मदत होईल, असेही पोखरियाल यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jee main 2021 in line with nep jee exam to be conducted in more regional languages says education minister pokhariyal aau