हमास-इस्रायल संघर्षाबाबत सोशल मीडियावर पोस्ट केल्याप्रकरणी मुंबईतील सोमय्या शाळेच्या प्रशासनाने मंगळवारी मुख्याध्यापिका परवीन शेख यांना निलंबित केलं आहे. परवीन शेख यांनी हमासच्या समर्थनार्थ पोस्ट लिहिली होती. त्यामुळे शाळा प्रशासनाने त्यांच्यावर ही कारवाई केली.

मंगळवारी संध्याकाळी जारी केलेल्या निवेदनात शाळा प्रशासनाने म्हटलं आहे, “आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं समर्थन करतो. पण शाळेच्या मुख्याध्यापिका परवीन शेख यांनी त्यांच्या खासगी सोशल मीडिया खात्यावरून मूल्यांविरोधात पोस्ट्स केल्या आहेत. त्यामुळे विचारांती आम्ही हा निर्णय घेतला आहे. शाळा व्यवस्थापनाने परवीन शेख यांचे सोमय्या शाळेशी असलेले संबंध तोडले आहेत; जेणेकरून आमची एकात्मता आणि सर्वसमावेशकतेच्या मूल्यांशी तडजोड होणार नाही.”

हेही वाचा >> “मुस्लिम समुदायाला पहिल्यांदाच सांगतोय, त्यांनी आता…”, आरक्षणाबाबत पंतप्रधान मोदींकडून भूमिका स्पष्ट

परवीन शेख यांनी त्यांच्या एक्स प्लॅटफॉर्मवर हमास आणि इस्रायल युद्धाबाबत पोस्ट लिहिली होती. यामध्ये त्यांनी हमासचं समर्थन केलं होतं. परवीन शेख या हमास समर्थक, हिंदू विरोधी आणि इस्लामवादी उमर खालिदचे समर्थक असल्याचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले होते. परवीन शेख यांनी सांगितलं की २६ एप्रिलला झालेल्या बैठकीनुसार शाळा प्रशासनाने मला राजीनामा द्यायला सांगितला होता. तरीही मी काम करणं सुरूच ठेवलं होतं. पण व्यवस्थापनाने माझ्यावर दबाव टाकायला सुरुवात केली.

मुख्याध्यापिकेने काय म्हटलंय?

त्या पुढे म्हणाल्या की, मी लोकशाही असलेल्या भारतात राहते, त्यामुळे मला माझं मत मांडण्याचा अधिकार आहे. माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे लोकांच्या भावना दुखावतील आणि माझ्याविरोधात अजेंडा अॅक्टिव्ह होतील असं मला कधीही वाटलं नव्हतं. मला मुख्याध्यापिका पदावरून दूर करीत नोकरीवरून काढल्याची बातमी कळल्यावर धक्का बसला. या संदर्भात मला दिलेली नोटीस ही संपूर्णत: बेकायदा आहे. ही कारवाई माझ्याविरुद्ध केल्या गेलेल्या खोट्या आरोपांवर आधारित आणि बदनामीकारक आहे. गेली १२ वर्षे मी सोमय्या शालेसाठी अथक परिश्रम घेतले आणि शाळेच्या विकासासाठी योगदान दिले. परंतु, माझ्याविरुद्ध चालविलेल्या गेलेल्या या अतिशय विचित्र मोहिमेत माझ्यामागे उभे न राहता संस्थेने कारवाईचा निर्णय घेतला. ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे दिसून येते.