ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते आणि माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांनी माकपच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त करत पक्षावर टीका केली आहे. पक्षावर अजूनही प्रकाश करात यांच्या लॉबीचेच वर्चस्व असून डाव्या पक्षाच्या भवितव्यासाठी ते घातक असल्याचे स्पष्ट मत त्यांनी माध्यमांसमोर नोंदवले. दोनच दिवसांपूर्वी सीतराम येचुरी यांनी पक्षाच्या केंद्रीय समितीसमोर काँग्रेसबरोबर आघाडी करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यांचा हा प्रस्ताव केंद्रीय समितीने फेटाळल्यानंतर चॅटर्जी यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली. पक्षाच्या घसरणीस त्यांनी अप्रत्यक्षरित्या प्रकाश करात यांनाच दोषी ठरवले आहे. चॅटर्जी यांच्या वक्तव्यावरून डाव्या आघाडीत सर्व काही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माकपाचे सरचिटणीस येचुरी यांनी काँग्रेसबरोबर आघाडी करण्याचा प्रस्ताव पक्षाच्या केंद्रीय समितीसमोर ठेवला होता. भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसबरोबर आघाडी करणे गरजेचे असल्याचे त्यांनी आपल्या प्रस्तावात म्हटले होते. पॉलिट ब्यूरोचे सदस्य प्रकाश करात यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधींनी या प्रस्तावाविरोधात मतदान केले. या प्रस्तावाविरोधात ५५ तर समर्थनात ३१ जणांनी मतदान केले होते. त्यावर सोमनाथ चॅटर्जी यांनी आपली नाराजी व्यक्त केली. पक्ष वाढीसाठी हे घातक असल्याचे ते म्हणाले.

सध्याच्या घडीला डावे पक्ष दिवसेंदिवस कमकुवत होताना दिसत आहेत. डाव्यांचा गड असलेल्या पश्चिम बंगालमध्येही पक्षाची दुरवस्था झाली आहे. सीताराम येचुरी यांचा काँग्रेसबरोबर युती करण्याचा प्रस्ताव केंद्रीय समितीने नाकारला. याचाच अर्थ प्रकाश करात यांच्या लॉबीचे पक्षावर अजूनही नियंत्रण असून पक्षाच्या भवितव्यासाठी हे चांगले नसल्याचे चॅटर्जी यांनी म्हटले.

प्रकाश करात यांच्या विरोधामुळे मला राष्ट्रपतीपदावर विराजमान होता आले नाही अशी खंत सोमनाथ चॅटर्जी यांनी यापूर्वी व्यक्त केली होती. २००७ मधील निवडणुकीत जनता दल संयुक्तचे तत्कालीन अध्यक्ष आणि खासदार शरद यादव यांनी माझ्या नावाला पाठिंबा दर्शवला होता. पण प्रकाश करात यांच्या विरोधामुळे मला उमेदवारी मिळाली नाही असा दावा चॅटर्जींनी त्यांनी केला होता. ज्योती बासू यांना पंतप्रधानपदासाठी संधी न देणे ही डाव्या पक्षांची सर्वात मोठी चूक होती, असेही त्यांनी यापूर्वी म्हटले होते. तसेच यूपीए- १ च्या कार्यकाळात भारत- अमेरिका अणू करारावरुन केंद्र सरकारचा पाठिंबा काढण्याच्या डाव्या पक्षांच्या निर्णयावरही सोमनाथ चॅटर्जींनी टीका केली. लोकसभेत दहा वेळा निवडून गेलेल्या चॅटर्जींना २०१० मध्ये पक्षातून निलंबित करण्यात आले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prakash karat is responsible for left parties weaker position says somnath chatterjee