दत्ता जाधव
केंद्रात हिंदुत्त्ववादी विचाराचे भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर भाजपशासित राज्यांनी गोवंश हत्याबंदी कायदे करण्याचा सपाटाच लावला होता. मात्र, हे कायदे करताना वस्तुस्थिती, शेती, शेतकऱ्यांची गरज आणि स्थानिक शेती आधारित पर्यावरणात झालेल्या बदलांकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्याचा परिणाम म्हणून हे गोवंश हत्याबंदी कायदे केवळ ‘कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ’ ठरले आहेत. अस्सल भारतीय गायींची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली असून त्याबद्दल चिंता करण्याचे तर कुणाच्या लक्षातही येताना दिसत नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विसाव्या पशुगणनेत गायींची स्थिती काय?

२०१३ मध्ये झालेल्या १९व्या पशुगणना अहवालात देशातील एकूण पशुंमध्ये गायींची संख्या ३७.२८ टक्के इतकी होती. २०२०च्या पशुगणनेत ती ३६.०४ टक्के इतकी झाली. म्हणजेच गायींच्या एकूण संख्येत सुमारे सव्वा टक्क्यांची घटच झाली आहे. त्यातही देशी गायींच्या संख्येत अधिक प्रमाणात घट झाली आहे. २०१३मध्ये एकूण गायींपैकी ७९ टक्के गायी देशी होत्या. त्यात शुद्ध देशी गोवंश ३७ टक्के आणि देशी गायीत देशी आणि विदेशी संकर होऊन तयार झालेल्या गायींची संख्या ४२ टक्क्यांहून अधिक होती. २०२०मध्ये एकूण गायीत विदेशी संकरीत गायी २६ टक्के, देशी शुद्ध गोवंश २२ टक्के आणि विविध प्रकारच्या संकरातून तयार झालेल्या आणि भिन्न वैशिष्ट्य असलेल्या, ठोस ओळख नसलेल्या गायींची संख्या ५२ टक्के इतकी आहे.

देशी गोवंशाची स्थिती काय?

२०१३च्या तुलनेत २०२०च्या जातीनिहाय पशुगणनेची तुलना करता देशभरात गीर, साहिवाल, बाचारु, लाल सिंधी, अमृतमहल, बारगूर, कृष्णा व्हॅली या गायींच्या जाती वगळता बाकी बहुतेक सर्व गायींच्या संख्येत मोठी घट झाली आहे. त्यात शुद्ध गोवंशांच्या संख्येत झालेली घट चिंताजनक आहे. हरिणा, कंकरेज, कोसाली, राठी, मालावी, हल्लिकर, मालन गिड्डा, गंगातिरी, थारपरकार, निमारी, नागोरी, मोटू, मेवाती, लखिमी, बाडिरी, ओंगोल, कंगायम, पनवार, खिरारी, सिरी आदी २३ देशी गोवंशाच्या गायींच्या संख्येत घट झाली आहे. यापैकी अनेक जाती लहान भौगोलिक प्रदेशात दुग्ध उत्पादन आणि शेतीच्या कामांसाठी उपयुक्त आहेत. बहुतेक ठिकाणी स्थानिक पातळीवर या जातींच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न करण्यात आलेले नाहीत, त्याचा परिणाम म्हणून शुद्ध देशी गोवंशाच्या संख्येत घट झालेली दिसून येते. देशातील एकूण देशी गोवंशांची संख्या १४ कोटी २१ लाख ६ हजार ४६६ इतकी आहे. त्यात शुद्ध गोवंश, देशी संकरीत गोवंशाचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील देशी गोवंशाची स्थिती काय?

राज्यात खिल्लार, गवळाऊ, लाल कंधारी, देवणी, कोकण गिड्डा या देशी जातींच्या गायी आढळून येतात. त्यापैकी कोकण गिड्डा या कोकण पट्ट्यातील गायींची वेगळी जात म्हणून नुकतीच नोंदणी झालेली आहे. मात्र, या पशुगणेत कोकण गिड्डा जातीचा वेगळा उल्लेख नाही. त्यामुळे त्यांच्या संख्येबाबत ठोस माहिती मिळत नाही. उर्वरित सर्व देशी गोवंशाच्या संख्येत घट झाली आहे. खिल्लार या प्रसिद्ध जातीची २०१३ मधील एकूण संख्या  २० लाख १४ हजार ३५२ होती. २०२१-२२मध्ये ती १२ लाख ९९ हजार १९६ झाली आहे, तर देवणीची संख्या दहा वर्षांत साडेतीन लाखावरून  २ लाख ८४ हजार इतकी कमी झाली आहे. विदर्भातील गवळाऊ गोवंशाच्या संख्येत तर पन्नास टक्यांहून अधिक घट झालेली दिसते. डांगी गायींची २०१३मधील संख्या १ लाख ९३ हजार ७८० होती, ती आता १ लाख ९१ हजार ६९५ झाली आहे. लाल कंधारीची संख्या साडेचार लाखावरून दीड लाखावर घसरली आहे. २०१३ मध्ये ४ लाख ५८ हजार ४० होती, ती आता १ लाख ४९ हजार २२१ झाली आहे.

कोणत्या जातींच्या गायी सर्वाधिक?

देशात गीर, लखिमी आणि साहिवाल या जातींच्या गायीची संख्या सर्वाधिक आहे. गीरची संख्या ६८ लाख ५७ हजार ७८४ असून एकूण गायींच्या संख्येतील वाटा ४.८ टक्के आहे. गीर हा मूळचा गुजरातमधील गोवंश असूनही सर्वाधिक म्हणजे ३४.७ टक्के वाटा पश्चिम बंगालचा आहे. त्या खालोखाल गुजरात २५.६ टक्के, राजस्थानात १५.२ टक्के, मध्य प्रदेशात ८.८ टक्के, छत्तीसगडमध्ये ६ टक्के, उत्तर प्रदेशात २.९ टक्के, झारखंडमध्ये २.६ टक्के, महाराष्ट्रात २.३ टक्के आणि इतर राज्यात १.८ टक्के आहे. लखिमी जातींच्या गायींची संख्या ६८ लाख २९ हजार ४८४ असून, एकूण गायींच्या संख्येतील वाटा ४.८ टक्के आहे. त्यानंतर साहिवालचा नंबर लागतो. साहिवालची देशातील एकूण संख्या ५९ लाख ४९ हजार ६७४ असून, एकूण गायींपैकी त्यांचा वाटा ४.२ टक्के आहे. दरम्यान देशात विदेशी, संकरीत जर्सी, होलिस्टिन फिर्जियन या विदेशी जातींची शु्द्ध, संकरीत गोवंशाची संख्या ५ कोटी १३ लाख ५६ हजार ४०५ इतकी आहे. या गायींचे संगोपन दुग्ध उत्पादनासाठी केले जाते.

देशी गोवंश अडचणीत का आला?

गीर, साहिवाल, लाल सिंधी अशा काही मोजक्या गोवंशाचे दुग्ध उत्पादनासाठी संगोपन केले जाते. इतर गोवंश दुग्ध उत्पादन आणि शेतीसाठी वापरला जातो. देशात जो गोवंश दुधाळ आहे, त्यावर ब्राझील सारख्या देशांत संशोधन झाले. पण, देशातील दुधाळ जनावरांवर संशोधन करून दुग्ध उत्पादनात वाढ होईल, असे प्रयत्न कोणत्याच पातळीवर झाले नाहीत. उलट विदेशी जर्सी, होस्टिन फ्रिजियन जातींच्या गायींची संख्या वाढली. देशी गायींच्या संकरीकरणावर भर दिली गेला. त्यामुळे शुद्ध देशी गोवंश कमी होत गेला आणि मिश्र गोवंश वाढला. यांत्रिकीकरणामुळे शेतीच्या कामांसाठी असणारी बैलांची गरज कमी झाली. गोवंश हत्याबंदी कायद्याने गोवंशाच्या खरेदी-विक्रीवर निर्बंध आले. उपयोगिता कमी झाल्यामुळे आणि निर्बंध वाढल्यामुळे देशी गोवंश वेगाने कमी होत आहे. अनेक गोवंशाच्या जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

dattatray.jadhav@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained decline in the number of desi cattle is worrisome print exp 0522 abn