मृत्यू ही एक गूढ गोष्ट आहे. एखादा सजीव जन्माला येतो आणि त्याचा मृत्युदेखील होतो. हे जन्म- मृत्यूचे चक्र अनंत आहे. परंतु एखादा जीव मरतो किंवा त्याचा मृत्यू होतो म्हणजे नेमके काय होते? या प्रश्नाचे उत्तर आजही अतर्क्य आहे. जगातील विविध धर्म आपापल्या पद्धतीने या प्रश्नाचे उत्तर देतात. हे खरे असले तरी या प्रश्नावर आजही श्रद्धा- अंधश्रद्धा यावरून वाद- विवाद होताना दिसतात. मृत्युनंतरचे जग मानणारे आत्म्याचा प्रवास, पुनर्जन्म, स्वर्ग आणि नरक यांसारख्या गोष्टींवर विश्वास ठेवतात. तर या गोष्टी न मानणारे या सगळ्या अंधश्रद्धा असल्याचे सांगतात आणि ‘माणूस जन्माला येतो आणि फक्त मरतो त्याचे पुढे काहीच होत नाही’ असे ठामपणे सांगतात. हा वाद निरंतर आहे. भारतीय संस्कृतीतही अगदी प्राचीन काळापासून असे दोन प्रकारचे मतप्रवाह असल्याचे उघड दिसते. याच वादाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील पेशाने रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट असलेल्या डॉ. जेफ्री लाँग यांनी मृत्यूनंतरच्या जगाच्या अस्तित्त्वाचा दावा केला आहे. यासाठी त्यांनी ३० पेक्षा जास्त भाषांमध्ये बोलणाऱ्या तसेच सांस्कृतिक आणि धार्मिक पार्श्वभूमी असलेल्या पाच हजाराहून अधिक लोकांकडून त्यांचे अनुभव गोळा केले आहेत. हे सगळे अनुभव त्या व्यक्तींना त्यांच्या एखाद्या प्राणघातक आजारपणात किंवा अपघाताप्रसंगी आले आहेत. अगदीच सोप्या शब्दात सांगावयाचे झाले तर या सर्व व्यक्ती मृत्यूनंतरचे जग अनुभवून आल्या आहेत, असा दावा डॉ. जेफ्री लाँग यांनी केला आहे. त्यामुळे मृत्यूनंतर जीवन अस्तित्त्वात आहे याची त्यांना ‘निःशंक’ खात्री आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मृत्यूनंतर नेमके काय घडते?

आपल्यापैकी बर्‍याच जणांनी इतरांकडून पायऱ्या चढताना किंवा बोगद्याच्या शेवटी एक तेजस्वी प्रकाश पाहिल्याच्या कथा ऐकल्या आहेत. एखाद्याचा मृत्यू झाला असे घोषित केल्यानंतर काही क्षणातच ती व्यक्ती परत जिवंत होते, एखाद्याचा मृत्यू झाल्यावर अनेक संस्कृतींमध्ये मृत्यूनंतरच्या प्रवासासाठी काही विधी केले जातात, हे सर्व आपल्या आजूबाजूला घडत असते. आणि त्यावेळी मनात एकच प्रश्न निर्माण होतो, मृत्यूनंतर नेमके काय घडते?, याच प्रश्नाचे उत्तर डॉ. जेफ्री लाँग यांनी आपल्या संशोधनातून शोधण्याचा प्रयन्त केला आहे.

आणखी वाचा: श्रावण विशेष : शिवशंकराची प्रेमाची व्याख्या!

डॉ. जेफ्री लाँग यांनी या संशोधनाला सुरुवात का केली?

डॉ. जेफ्री लाँग यांनी गेली अनेक वर्षे या विषयावर संशोधन केले आहे. या विषयावर संशोधन करत असताना मृत्यूचा अनुभव ज्यांनी घेतला आहे, त्यांचा अभ्यास केल्यावर आपले मत बदल्याचा दावा डॉ. जेफ्री लाँग यांनी केला आहे. जवळपास ३७ वर्षांपूर्वी डॉ. लाँग यांनी अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या जर्नलसाठी या संदर्भात एका शोधनिबंधाचे वाचन केले होते. त्यावेळी त्यांना सर्वप्रथम मृत्यूच्या जवळच्या अनुभवांमध्ये रस निर्माण झाला होता. त्या संशोधन निबंधात त्यांनी कोणतेही क्लिनिकल किंवा वैद्यकीय संदर्भ न देता त्यांचे केवळ निष्कर्ष नोंदवले होते. त्यांनी ‘इन्सायडर’वर नमूद केल्याप्रमाणे डॉ. लाँग यांना प्रश्न पडला होता की, त्यांच्या सर्व वैद्यकीय प्रशिक्षणात शिकविले गेले की ‘तू जिवंत आहेस किंवा मृत आहेस’, या दोन्ही मधलं असं काही नसतं. पण त्याच वेळेस त्यांनी एका हृदयरोग तज्ज्ञाचा अनुभव वाचला, त्या हृदयरोग तज्ज्ञाचा एक रुग्ण मरण पावला आणि नंतर पुन्हा जिवंत झाला, हे डॉ. लाँग यांच्यासाठी अतिशय वेगळे, अविश्वसनीय होते.

निअर-डेथ एक्सपिरियन्स रिसर्च फाउंडेशन (NDE)

१९९८ साली डॉ. लाँग यांनी मृत्यू आणि त्यानंतरचे जग या अनुभवांबद्दलच्या त्यांच्या आवडीमुळे निअर-डेथ एक्सपिरियन्स रिसर्च फाउंडेशनची स्थापना केली. ‘इन्साइडर’ वरील त्यांच्या अनुभवावर आधारित लेखात, केंटकी येथील एका डॉक्टरांनी आपला NDEs कडे नमूद केलेला अनुभव दिला आहे. या अनुभवानुसार कोमातील व्यक्ती किंवा वैद्यकीयदृष्ट्या मृत, हृदयाचा ठोका नसलेली व्यक्ती दिसते, ऐकू येते असा अनुभव नोंदविला होता. किंबहुना अशा व्यक्ती इतरांशी संपर्क साधतात असेही त्यांच्याकडून नोंदविण्यात आले होते.

व्यक्तीचा धर्म कोणताही असो, मग तो ख्रिश्चन, मुस्लिम, हिंदू, ज्यू किंवा नास्तिक असो, डॉ. लाँग यांनी हजारो लोकांचे मूल्यमापन केले आहे, त्यापैकी बरेचसे अनुभव आश्चर्यकारक असून समान आहेत. म्हणजे हे तर सत्य आहे की प्रत्येक कथा वेगळी आणि असामान्य आहे. परंतु त्या घटनाक्रमांमध्ये समान दुवा असल्याचे निदर्शनास येते, असे डॉ. लाँग सांगतात.

मृत्यूनंतरचे अनुभव

डॉ. लाँग यांनी त्यांच्या संशोधनात अनेक उदाहरणांचा समावेश केला आहे, जसे की, एका व्यक्तीला एका बुरखा सदृश्य व्यक्तीने परत शरीरात जाण्यासाठी मार्गदर्शन केले होते, तो त्याला एका शेतात घेवून गेला जेथे त्याचे प्रियजन तो जेथे मरण पावला तेथे बसले होते.

याशिवाय त्यांनी दुसरे उदाहरण दिले होते, त्यात एका व्यक्तीने आपल्या शरीरातून प्रकाशाची आकृती बाहेर पडताना पहिली जी काही सेकंदासाठी मोठी झाली आणि त्यानंतर लहान होत शरीरात प्रवेशली.
ज्यांना मृत्यूनंतरचा अनुभव आला त्यांच्यापैकी बहुतेकांनी सांगितले की, त्यांना त्यांच्यावर असलेल्या प्रचंड प्रेम आणि आनंदामुळे नंतरच्या आयुष्यात राहायचे होते, म्हणून ते परत आले. त्यांच्यापैकी एक चतुर्थांश लोक म्हणतात की, ते ज्यावेळी मृत म्हणून घोषित झाले त्यावेळी प्रकाश किंवा धुक्याने वेढलेले होते आणि अर्ध्याहून अधिक लोक म्हणतात की, त्यांनी स्वर्ग पाहिला. जवळजवळ या प्रत्येकाचा मृत्यूशी जवळचा सामना झाला आहे, त्यामुळे त्यांना मृत्यूची भीती वाटत नाही.

आणखी वाचा: तृतीयपंथीयांचे संदर्भ सांगणाऱ्या पौराणिक कथा !

डॉ. लाँग यांच्या म्हणण्यानुसार, NDE ने नोंदविलेल्या ४५ टक्क्यांहून अधिक व्यक्तींनी शरीराबाहेर पडण्याचा अनुभव घेतला आहे. लोकांनी नोंदविलेल्या अनुभवानुसार त्यांच्या आजूबाजूला काय घडत आहे ते पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी, “त्यांची चेतना (त्यांच्या) भौतिक शरीरापासून विभक्त होते, सामान्यत: शरीराच्या वरती फिरत राहते.
डॉ. लाँग यांनी नमूद केले की, “शरीराच्या बाहेर पडल्याचा अनुभवानंतर, लोक म्हणतात की त्यांना दुसर्‍या जगात नेले जाते. अनेकजण बोगद्यातून जातात आणि तेजस्वी प्रकाशाचा अनुभव घेतात. त्यानंतर, त्यांच्या जीवनात महत्त्वाचे असलेले पाळीव प्राणी किंवा मृत प्रियजनांद्वारे त्यांचे स्वागत केले जाते. बहुतेक लोक प्रेम आणि शांतीची जबरदस्त अनुभूती नोंदवतात. त्यांना असे वाटते की हे दुसरे जग त्यांचे खरे घरचं आहे.”

यानंतर डॉ. लाँग यांनी आणखी एक उदाहरण दिले आहे. “एक महिला घोडा चालवत असताना पायवाटेवरच बेशुद्ध पडली. परंतु तिचे शरीर जरी त्याच पायवाटेवर असले तरी तिची चेतना घोड्यासोबतच होती. घोडा खेचला जात असल्याचे लोकांनी पाहिले, घोडा खेचत जावून तो तबेल्यात त्याच्या जागी गेला. जेंव्हा शुद्धीवर आली त्यावेळेस तबेल्यात काय काय घडले हे तिने इत्थंभूत सांगितले. काहींनी तिला तबेल्यात पाहिल्याची पुष्टीही दिली. परंतु असे कसे घडले याचे आजतागायत वैज्ञानिक स्पष्टीकरण देता आले नाही, असे डॉक्टरांनी कबूल केले आहे. यासाठी डॉ. लाँग यांनी मेंदूविषयी झालेल्या संशोधनाविषयी अभ्यास करण्यास सुरुवात केली. परंतु हवे ते समाधानकारक उत्तर त्यांना मिळाले नाही. त्या संबंधित वैद्यकीय तज्ज्ञांशीही त्यांनी संवाद साधला, त्यांनीही डॉ लाँग यांच्या मताशी सहमत असल्याचे दर्शविले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is there really life after death what does the new research say svs
First published on: 06-09-2023 at 09:13 IST