महेश सरलष्कर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘एनडीटीव्ही’चे संस्थापक- प्रवर्तक प्रणव रॉय आणि राधिका रॉय यांच्यापाठोपाठ रवीश कुमार यांच्या राजीनाम्यांची सर्व पातळ्यांवरून चर्चा होते आहे. आजघडीला बहुचर्चित असलेल्या या घटनांचे माध्यमविश्वावर काही परिणाम होऊ शकतात का, कोणते याची चर्चा-

प्रणव आणि राधिका रॉय यांच्या राजीनाम्याची पार्श्वभूमी काय आहे?

‘एनडीटीव्ही’चे संस्थापक व प्रवर्तक असलेले प्रणय रॉय आणि राधिका रॉय यांनी ‘आरआरपीआर’ या मूळ कंपनीच्या माध्यमातून ‘एनडीटीव्ही’ वृत्तवाहिन्यांच्या विस्ताराच्या हेतूने विश्वप्रधान कमर्शिअल कंपनीकडून (व्हीसीपीएल) कर्ज घेतले होते. या कर्जाचे समभागांत रूपांतर करण्याची मुभाही रॉय दाम्पत्याने दिली होती. ‘व्हीसीपीएल’ ही कंपनी अदानी समूहाने विकत घेतली, त्यानंतर अदानींच्या ‘व्हीसीपीएल’ने ‘आरआरपीआर’च्या कर्जाचे रूपांतर समभागांमध्ये केले. त्यामुळे अदानी समूहाचे ‘आरआरपीआर’ कंपनीवर वर्चस्व निर्माण झाले. तसेच ‘एनडीटीव्ही’मधील २९.२ टक्के हिस्सेदारीही मिळाली. या घडामोडीमुळे रॉय दाम्पत्याने ‘आरआरपीआर’च्या संचालक मंडळाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. अदानी समूहाने ‘एनडीटीव्ही’ कंपनीवर पूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी आणखी २६ टक्के समभाग विकत घेण्याचे ठरवले व समभाग विक्रीचे समभागधारकांना खुले निमंत्रण दिले. ही मुदत ४ डिसेंबरला संपेल, त्याद्वारे अदानी समूहाची ‘एनडीटीव्ही’मध्ये ५५.१८ टक्के हिस्सेदारी होईल. तसे झाले तर अदानी समूहाची ‘एनडीटीव्ही’ कंपनीवर मक्तेदारी निर्माण होईल. त्याद्वारे, अदानी समूहाच्या संभाव्य नव्या व्यवस्थापनाला ‘एनडीटीव्ही’ समूहातील सर्व वृत्तवाहिन्यांचे धोरण ठरवण्याचे अधिकार मिळू शकतील. ‘आरआरपीआर’ कंपनीच्या संचालक मंडळावर सुदिप्ता भट्टाचार्य, संजय पुगलिया आणि सेन्थिल चेंगलवरायन या तीन नव्या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 ‘एनडीटीव्हीवृत्तवाहिन्यांच्या वृत्तधोरणांमध्ये बदल होऊ शकतो का?

‘एनडीटीव्ही’ कंपनीमध्ये ‘आरआरपीआर’ कंपनीची २९.१८ टक्के हिस्सेदारी असून प्रणव रॉय व राधिका रॉय यांची अनुक्रमे १५.९४ टक्के व १६.३२ टक्के हिस्सेदारी आहे. त्यामुळे रॉय दाम्पत्य ‘एनडीटीव्ही’ कंपनीच्या संचालक मंडळाचे सदस्य राहू शकते. मात्र, अदानी समूहाने ‘एनडीटीव्ही’ कंपनी ताब्यात घेतली तर ‘एनडीटीव्ही’च्या धोरणांवरील रॉय दाम्पत्याचे नियंत्रणही संपुष्टात येईल. वृत्तवाहिन्यांसंदर्भात रॉय दाम्पत्याने ठरवलेल्या धोरणांमध्ये नवे व्यवस्थापन बदल करू शकते. या वृत्तवाहिन्यांची तटस्थ राहण्याची राजकीय भूमिकादेखील बदलू शकते. देशातील अनेक वृत्तवाहिन्यांच्या राजकीय वृत्तांकनामुळे वृत्तवाहिन्यांच्या विश्वासार्हतेचा मुद्दा सातत्याने चर्चामध्ये राहिला आहे.

रॉय दाम्पत्याच्या राजीनाम्याची इतकी चर्चा का होत आहे?

‘एनडीटीव्ही’च्या माध्यमातून रॉय दाम्पत्याने सरकारधार्जिणे न राहता निष्पक्ष पत्रकारितेचा धडा देशातील अनेक पत्रकारांना घालून दिला होता. सरकारची तळी न उचलता वास्तव व सत्यावर आधारित वृत्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खासगी वृत्तवाहिन्यांची गरज का होती, हे ‘एनडीटीव्ही’च्या वृत्तवाहिन्यांनी दाखवून दिले होते. प्रणव रॉय यांनी ‘वल्र्ड धिस वीक’ नावाचा साप्ताहिक वृत्तकार्यक्रम सुरू केल्यावर स्वतंत्र व निष्पक्ष पत्रकारिता म्हणजे नेमके काय, हे देशातील लोकांना समजू लागले. त्यापूर्वी दूरदर्शनवर सरकारकडून दिल्या जाणाऱ्या माहितीच्या आधारे एकतर्फी वृत्त दिले जात असल्याचा आरोप होत असे. देशातील स्वतंत्र, तटस्थ आणि पारदर्शी पत्रकारितेचा पायंडा प्रणव रॉय यांनी कायम ठेवला व हीच परंपरा ‘एनडीटीव्ही’च्या माध्यमातूनही  सुरू ठेवली. आता या कंपनीचे धोरण ठरवण्याचा अधिकार रॉय दाम्पत्याकडून काढून घेतला जाऊ शकतो. सरकारची तळी उचलणे म्हणजे पत्रकारिता नव्हे, अशी ठाम भूमिका घेऊन रॉय दाम्पत्याने रवीश कुमार यांच्यासह ‘एनडीटीव्ही’च्या वृत्तवाहिन्यांमधील अन्य पत्रकारांची वृत्तांकने प्रसारित केली होती.

रवीश कुमार यांनी एनडीटीव्हीचा राजीनामा का दिला?

‘एनडीटीव्ही’मध्ये ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनी २७ वर्षे काम केले. रॉय दाम्पत्याच्या ‘आरआरपीआर’मधील राजीनाम्यानंतर रवीश कुमार यांनी ‘एनडीटीव्ही’तून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. ‘एनडीटीव्ही’च्या मालकीहक्कामध्ये बदल होत असल्याने त्यांच्या राजीनाम्याची शक्यता आधीच व्यक्त होत होती. रवीश कुमार यांनी सातत्याने विविध सरकारांची धोरणे, राजकीय-सामाजिक भूमिकेबाबत प्रश्न विचारले होते. त्यामुळे त्यांची पत्रकारिता केंद्रातील विद्यमान सत्ताधाऱ्यांना आव्हान देणारी असल्याचेही मानले गेले. रवीश कुमार यांनी सत्ताधाऱ्यांची एकतर्फी भूमिका मांडणाऱ्या पत्रकारांना व त्यांच्या माध्यम संस्थांना उघडपणे विरोध केला व त्यासाठी विशिष्ट शब्दप्रयोगाचाही उल्लेख केला. त्यामुळे रवीश कुमार सातत्याने चर्चेत राहिले होते. रवीश कुमार यांना मेगॅसेसे पुरस्कार देऊन त्यांच्या पत्रकारितेचा जागतिक स्तरावर सन्मान करण्यात आला. ‘एनडीटीव्ही’तील संभाव्य व्यवस्थापन व धोरणबदलांच्या शक्यतेमुळे रवीश कुमार यांनी कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मी कंपनीतून का बाहेर पडलो, याची कारणे त्यांनी यूटय़ूब चॅनेलवरील २० मिनिटांच्या चित्रफितीद्वारे स्पष्ट केली आहेत. सत्ता अनेकांची मुस्कटदाबी करत असताना लोक पाठीशी उभे राहिले, असेही रवीश कुमार यांनी म्हटले आहे. रवीश कुमार यांनी ‘यूटय़ूब’वरील चॅनलवरून राजीनाम्याची घोषणा केली.

रॉय दाम्पत्याची चूक झाली का?

‘आरआरपीआर’ कंपनीवर अदानी समूहाच्या वर्चस्वाची शक्यता आणि रॉय दाम्पत्याच्या राजीनाम्यानंतर, ‘एनडीटीव्ही’च्या समभागांच्या किमतीने सलग पाच दिवस उसळी घेतली. या वाढत्या किमतीमुळे गुंतवणूकदारांचा या कंपनीमध्ये आता ‘विश्वास’ निर्माण झाला असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. ‘एनडीटीव्ही’ कंपनीचा ताबा अदानी समूहाकडे आल्यानंतर गुंतवणूकदारांसाठी पोषक धोरण अवलंबले जाऊ शकेल असा संदेश मिळू लागला आहे. ही कंपनी ताब्यात घेण्याची संधी बडय़ा उद्योग समूहाला मिळू शकेल याचा अंदाज न आल्यामुळे कर्जविषयक निर्णय कंपनीने घेतले. ही कंपनी हातातून जाऊ न देण्याची दक्षता न घेतल्याने ‘आरआरपीआर’मधील हिस्सेदारीमध्ये बदल झाला असून पर्यायाने ‘एनडीटीव्ही’वर अदानी समूहाची मक्तेदारी निर्माण होऊ शकेल.

mahesh.sarlashkar@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prannoy roy and radhika roy resign from ndtv promoter group print exp 2211 zws
First published on: 02-12-2022 at 05:12 IST