मान्सूनचे आगमन झाले असून, ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळतो आहे. मात्र, शहरांचे नियोजन सुयोग्य नसल्याने पाणी साठणे, रस्ते खचणे, विमानतळाचे छप्पर कोसळणे अशा दुर्घटना पाहायला मिळत आहेत. काही दिवसांमध्ये मुसळधार पावसामुळे देशातील महत्त्वाच्या शहरांमधील महत्त्वाचे रस्ते खचण्याचे प्रकार वाढल्याचे दिसून येत आहे. उदाहरणार्थ- मागील आठवड्यामध्येच अगदी अलीकडे जानेवारी महिन्यामध्ये अयोध्येत बांधलेल्या ‘राम पथ’बाबत असाच प्रकार पाहायला मिळाला. हा रस्ता ठिकठिकाणी खचला असून, अत्यंत निकृष्ट दर्जाच्या या कामाबाबत जनता प्रशासनाला नावे ठेवताना दिसत आहे. खुद्द अयोध्येमध्येच नव्याने बांधलेल्या रस्त्याबाबत ही परिस्थिती आहे. त्याचप्रमाणे इतर बऱ्याच ठिकाणची परिस्थितीही अशाच स्वरूपाची आहे. रविवारी (३० जून) अहमदाबादमधील एक रस्ता अशाच प्रकारे खचला आहे. या रस्त्यावर भलामोठा खड्डा पडला आहे. रस्ते अशा प्रकारे का खचतात, त्यामागची कारणे काय आहेत आणि हे प्रकार कशा प्रकारे टाळता येऊ शकतात, यावर एक नजर टाकू.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : TISS मध्ये १०० कर्मचाऱ्यांच्या नोकरकपातीचा निर्णय अखेर मागे; नावाजलेल्या शैक्षणिक संस्थेत नेमकं काय चाललंय?

रस्ते कशामुळे खचतात?

रस्ते खचणे आणि आणि जमिनीवर भलेमोठे भगदाड पडणे हा मुसळधार पावसाचा परिणाम असतो. सततच्या पावसामुळे नाले तुडुंब भरून वाहू लागतात. जमिनीखाली असलेल्या पाइपलाइन्सा गळती लागण्यास ही बाब कारणीभूत ठरते. जेव्हा जमिनीखालील पाइपलाइन्सना गळती लागते तेव्हा जमिनीखालून वाहणारे हे पाणी वाट शोधू लागते. पाइपलाइनमधून निघालेले पाणी सभोवतालच्या जमिनीच्या थरांमध्ये घुसू लागते. परिणामत: जमिनीच्या आतील थरांची झीज होऊ लागते आणि ती कमकुवत होते. मुसळधार पावसाचे प्रमाण असेच सुरू राहिले तर पाइपलाइनमधील हीच गळती जमिनीचा थरच वाहून नेण्यास कारणीभूत ठरते. याचाच परिणाम म्हणून बांधलेले रस्ते अनेकदा खचल्याचे दिसून येतात. अखेरीस धूप झाल्यामुळे त्यावरील रस्त्याचा भाग कोसळतो आणि तिथे मोठे भगदाड पडते. हे भगदाड पडण्यास किती वेळ लागेल, ही बाब पाइपलाइनच्या आकारावर आणि त्यातून होणाऱ्या गळतीवर अवलंबून असते.

भगदाड पडल्यानंतर रस्ता दुरुस्त कसा केला जातो?

अशा प्रकारची घटना घडल्यानंतर संबंधित अधिकारी सर्वांत आधी त्याखाली असलेल्या पाइपलाइनमधील पाण्याचा प्रवाह बंद करतात. या कामासाठी थोडा वेळ लागू शकतो. त्यानंतर त्या पाइपलाइनमध्ये कुठे गळती होत आहे, याचा ते शोध घेतात. ही गळती शोधल्यानंतर ती रोखण्यासाठीच्या उपाययोजना सुरू केल्या जातात. गळती रोखण्याचे हे काम पूर्णत्वास नेल्यानंतर रस्त्याला पडलेले हे भगदाड मुरूम आणि इतर आवश्यक घटकांनी भरण्यात येते. भगदाड लहान असेल, तर अशा ठिकाणी ते रेती आणि लहान दगडी मुरूम भरतात आणि मोठ्या भगदाडांमध्ये मुरूम भरतात. त्यानंतर पुन्हा रस्ता बांधला जातो.

हेही वाचा : आंध्रप्रदेशमध्ये सापडले तब्बल ४१ हजार वर्षे जुने शहामृगाचे घरटे? या शोधामुळे नेमके काय सिद्ध होणार आहे?

रस्ता खचण्याचे असे प्रकार कशा प्रकारे टाळता येऊ शकतात?

असे प्रकार टाळण्यासाठी पाइपलाइनची गुणवत्ता तपासावी लागते. पाइपलाइनमधील अशीगळती ओळखण्यासाठी आणि तिच्यावर उपाययोजना करण्यासाठीची यंत्रणा निर्माण करणे हा एक प्रमुख उपाय असू शकतो, असे अभियंते सांगतात. पाइपलाइनच्या सुरुवातीला, तसेच शेवटच्या टोकाला प्रवाहाचे मोजमाप करणारी प्रणाली स्थापन केल्यास मधे कुठे गळती होत आहे का, याचे निदान करता येऊ शकते. गळती लवकरात लवकर ओळखता आली, तर रस्ते खचण्याचे असे प्रकार टाळता येऊ शकतात.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Roads in ayodhya and ahmedabad cave in what causes road cave ins vsh
Show comments