प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात रक्ताचे वेगवेगळे गट असतात. आतापर्यंत मुख्यतः रक्ताचे चार गट ज्ञात आहेत. परंतु, आता शास्त्रज्ञांनी आणखी एक रक्तगट शोधून काढला आहे. या रक्तगटाचा शोध लावून, शास्त्रज्ञांनी ५० वर्षांपूर्वीचे गूढ उकलले आहे. या नवीन रक्तगटाचे नाव आहे एमएएल (MLA) रक्तगट. दुर्मीळ रक्तगट असणाऱ्या व्यक्तींना याचा सर्वाधिक फायदा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. अमेरिकन सोसायटी ऑफ हेमॅटोलॉजीने प्रकाशित केलेल्या ब्लड या पीअर-रिव्ह्यू मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या संशोधन लेखात ही माहिती समोर आली आहे. शास्त्रज्ञांनी ५० वर्षांपूर्वीचे गूढ कसे उकलले? हा नवीन रक्तगट काय आहे? याचे महत्त्व काय? त्याविषयी जाणून घेऊ.

नवीन रक्तगट कसा शोधला गेला?

१९७२ साली एका गर्भवती महिलेच्या रक्ताच्या नमुन्यात एक विसंगती दिसून आली होती. ब्रिस्टल विद्यापीठाच्या सहकार्याने ब्रिटनमधील एनएचएस ब्लड अॅण्ड ट्रान्सप्लांट (NHSBT) च्या संशोधनाने ५० वर्षांनंतर हे गूढ उकलले आहे. संशोधकांनी एमएएल नावाचा नवीन रक्तगट AnWj प्रतिजन म्हणजेच अँटीजेन प्रणालीचा भाग असल्याचे सांगितले आहे, जीची ४७ वी रक्तगट प्रणाली म्हणून नोंद करण्यात आली आहे. “ही एक मोठी उपलब्धी आहे. ही नवीन रक्तगट प्रणाली दुर्मीळ रक्तगट असणाऱ्या रुग्णांसाठी फायदेशीर असणार आहे. हे अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांचे यश आहे,” असे ‘NHSBT’चे वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ लुईस टिली यांनी सांगितले आहे. एका माध्यम प्रकाशन सोहळ्यात सुमारे २० वर्षे या प्रकल्पावर काम करणाऱ्या लुईस टिली यांनी या शोधाचे महत्त्व अधोरेखित केले.

हेही वाचा : बुलेटप्रूफ ग्लास ते पॅनिक बटण; अमेरिकेत सुरक्षित मतदानासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात येत आहेत?

AnWj प्रतिजनमुळे एमएएल रक्तगट कसा तयार झाला?

AnWj प्रतिजन हा एक प्रकारे खास अँटीबॉडी किंवा प्रतिपिंड आहे. ९९.९ टक्क्यांहून अधिक लोकसंख्या AnWj-पॉझिटिव्ह आहे म्हणजे त्यांच्या रक्तात प्रतिजन आढळून येते आणि ज्या लोकांच्या रक्तात प्रतिजन आढळून येत नाही, ते AnWj-निगेटिव्ह असतात. त्यांना रक्त संक्रमणादरम्यान AnWj-पॉझिटिव्ह रक्त दिल्यास गंभीर जोखमीचा सामना करावा लागतो. या प्रतिजनाच्या कमतरतेचे सर्वांत मुख्य कारण कर्करोग किंवा विशिष्ट रक्तविकारांसारखे आजार आहेत. परंतु, संशोधकांना असे आढळून आले की, काही लोकांमध्ये आनुवंशिकदृष्ट्याही त्याची कमतरता आहे.

AnWj प्रतिजन हा एक प्रकारे खास अँटीबॉडी किंवा प्रतिपिंड आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

NHSBT मधील IBGRL रेड सेल संदर्भ प्रमुख निकोल थॉर्नटन म्हणाले, “AnWj साठी आनुवंशिक आधाराचे निराकरण करणे हे आमच्यासाठी सर्वांत मोठे आव्हान आहे. एखादे जनुक प्रत्यक्षात रक्तगटातील प्रतिजनामुळे कशी प्रतिक्रिया देते, हे सिद्ध करण्यासाठी आणखी बरेच काम करावे लागणार आहे. परंतु, जगभरातील दुर्मीळ रुग्णांच्या फायद्यासाठी हे शोधकार्य करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.” नवीन निष्कर्षांवरून असे दिसून आले आहे की, AnWj प्रतिजनमध्ये Mal प्रथिने (Myelin and Lymphocyte Protein) असतात. जे लोक AnWj-पॉझिटिव्ह असतात, त्यांच्या लाल रक्तपेशींमध्ये Mal प्रथिने असतात; तर ज्यांचे एमएलए जनुक आनुवंशिकपणे नष्ट होते, ते AnWj-निगेटिव्ह असतात.

या रक्तगटाचा शोध घेण्यासाठी कोणती प्रक्रिया वापरण्यात आली?

संशोधन संघाने AnWj प्रतिजनामागील रहस्य उलगडण्यासाठी संपूर्ण ‘एक्सोम सिक्वेन्सिंग’सह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. संपूर्ण एक्सोम सिक्वेन्सिंगमध्ये म्हणजेच आनुवंशिक चाचणीत प्रथिने एन्कोड करणाऱ्या सर्व डीएनएचे आनुवंशिक विश्लेषण समाविष्ट करण्यात आले आणि या प्रकरणात हे उघड झाले की, दुर्मीळ आनुवंशिक AnWj-निगेटिव्ह प्रकरणे एमएएल जनुकातील होमोजिगस हटविण्यामुळे झाली आहेत. “आम्ही रक्तपेशी विकसित करण्यासाठी जनुकांमध्ये प्रयोग करून AnWj रक्तगटाची ओळख करू शकलो, ही खरंच समाधानकारक बाब आहे. ५० वर्षांपासूनचे कोडे सोडवण्यात आम्हाला यश आले आहे, ” असे ब्रिस्टल विद्यापीठातील जीवशास्त्राचे प्राध्यापक अॅश टोय म्हणाले. “या रक्तगटाच्या शोधामुळे दुर्मीळ रक्तगटाच्या रुग्णांना भविष्यात मदत होईल,” असेही त्यांनी सांगितले. या संशोधनाने हेदेखील समोर आले की, Mal प्रथिने पेशींना स्थिर ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. विशेष म्हणजे AnWj प्रतिजन नवजात मुलांमध्ये दिसत नाहीत; परंतु जन्मानंतर लगेच विकसित होतात.

रुग्ण आणि भविष्यासाठी हा शोध किती महत्त्वाचा?

एमएएल रक्तगटाच्या शोधाचा केवळ AnWj-निगेटिव्ह व्यक्तींना ओळखण्यासाठीच मदत होईल. एवढेच नव्हे, तर अशा दुर्मीळ प्रकरणांचा शोध घेताना जीनोटाइपिंग चाचण्या विकसित करण्यासाठीही हा शोध महत्त्वपूर्ण ठरेल. AnWj प्रतिजन नसलेल्या रुग्णांमध्ये जीवघेण्या रक्तसंक्रमण प्रतिक्रिया टाळण्यासाठी या चाचण्या उपयुक्त ठरतील. हा शोध म्हणजे एक वैज्ञानिक उपलब्धीच नाही, तर जगातील एकूण आरोग्य सेवेसाठीही ती महत्त्वपूर्ण बाब ठरणार आहे. AnWj-निगेटिव्हसारखे दुर्मीळ रक्त प्रकार एकेकाळी शोधणे कठीण होते, ते आता प्रगत आनुवंशिक चाचणीद्वारे ओळखता येऊ शकतात; ज्यामुळे या रुग्णांमधील रक्तसंक्रमण सुरक्षित आणि प्रभावी पद्धतीने होते.

हेही वाचा : रशियन सैन्याविरोधात युद्धात उतरणाऱ्या युक्रेनच्या ‘बुचा विचेस’ कोण आहेत?

एमएएल रक्तगटाचा शोध वैद्यकीय संशोधनातील एक मैलाचा दगड आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर हजारो लोकांचे जीव वाचविणे शक्य होणार आहे. जीनोटाइपिंग चाचण्या दुर्मीळ रक्त प्रकारांवर उपचार करण्याच्या पद्धतीमध्ये क्रांती घडवून आणतील. आता जीनोटाइपिंग चाचण्या आनुवंशिकरीत्या AnWj-निगेटिव्ह रुग्ण आणि दात्यांना ओळखण्यासाठी डिझाइन केल्या जाऊ शकतात. त्यामुळे दरवर्षी जगभरातील अंदाजे ४०० रुग्णांना मोठा फायदा होईल. हे असे रुग्ण आहेत, ज्यांचे जगणे अचूक रक्त मिळण्यावर अवलंबून असते.