सिंगापूरची सर्वात मोठी बँक डीबीएसने आपल्या सीईओंवर मोठी कारवाई केली आहे. डिजिटल सेवेतील सततचे व्यवहार विस्कळीत झाल्याने बँकेने अलीकडच्या काळात सीईओंच्या पगारात मोठी कपात केली आहे. सीईओबरोबरच बँकेने इतर उच्च व्यवस्थापन अधिकाऱ्यांच्या वेतनातही कपात केली आहे. डीबीएस ग्रुप होल्डिंग्ज लिमिटेडचे ​​सीईओ पीयूष गुप्ता यांना व्हेरिएबल पेमध्ये मोठा तोटा सहन करावा लागला आहे. बँकेने त्याची भरपाई ४.१ दशलक्ष सिंगापूर डॉलर्स म्हणजेच ३ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सनी कमी केली आहे. भारतीय रुपयातील ही कपात सुमारे २५ कोटी आहे. डीबीएस ग्रुपने सीईओंच्या वेतनात का कपात केली ते जाणून घेऊ यात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

DBS ही सिंगापूरची सर्वात मोठी बँक आहे, जी जगातील प्रमुख बँकांमध्ये गणली जाते. डीबीएसचे सीईओ पीयूष गुप्ता हे सर्वाधिक वेतन घेणाऱ्या अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. त्यांना २०२२ मध्ये DBS बँकेने १५.४ दशलक्ष सिंगापूर डॉलर (९५ कोटी रुपये) भरपाई म्हणून दिले होते. डीबीएस बँकेने बुधवारी आपले तिमाही निकाल जाहीर केले. याबरोबरच बँकेने सीईओंसह उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या वेतनात कपात केल्याची माहिती दिली.

बँकेने दिलेल्या माहितीनुसार, सीईओ गुप्ता यांच्या व्हेरिएबल पेमध्ये सुमारे ३० टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. तसेच सर्व उच्च व्यवस्थापन अधिकाऱ्यांची भरपाई एकत्रितपणे २१ टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे. “गेल्या वर्षीच्या डिजिटल व्यत्ययासाठी जबाबदार धरत ग्रुप व्यवस्थापन समिती आणि सीईओसह इतर कर्मचाऱ्यांचे पगार कमी करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे,” असे DBS ने सांगितले. या निर्णयावर गुप्ता म्हणाले की, संपूर्ण वरिष्ठ व्यवस्थापन या गोंधळाची जबाबदारी स्वीकारते. त्यामुळेच बँक व्यवस्थापनातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या पगारात २१ टक्के कपात करण्यात आली आहे. सिंगापूरच्या सर्वात मोठ्या बँकेच्या २०२३ मध्ये अनेक वेळा डिजिटल बँकिंग सेवा बंद पडल्या होत्या. म्हणून सिंगापूर मॉनेटरी ऑथॉरिटीने डीबीएसला सहा महिन्यांसाठी कोणतेही व्यवसाय अधिग्रहण करण्यास प्रतिबंध केला आहे. गुप्ता हे २०२२ मध्ये देश आणि राज्यातील सर्वात जास्त पगार घेणाऱ्या सीईओंपैकी एक होते, जेव्हा त्यांना १५.४ दशलक्ष डॉलर पगार मिळाला होता, त्यात १.५ दशलक्ष डॉलर पगार, ५.७७ दशलक्ष डॉलर रोख बोनस, रोखीचा मोबदला आणि ८.०४ दशलक्ष डॉलर शेअर्स यांचा समावेश होता, असंही द स्ट्रेट टाइम्सने रिपोर्टमध्ये म्हटले होते.

हेही वाचाः विश्लेषणः स्थिर विक्री अन् वाढता नफा; कंपन्यांच्या तिमाही कामगिरीतील फायदा का वाढतोय?

सीएनबीसीशी बोलताना ऑनलाइन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म IG चे मार्केट स्ट्रॅटेजिस्ट जून रोंग येप म्हणाले की, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वेतन कपातीमुळे गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळू शकतो. “कपात काही उच्च अनुपालन खर्च, उच्च परिचालन खर्च आणि यंत्रणेची प्रतिकूल परिस्थितीत झगडा करत उभे राहण्यासाठी आणि त्यांच्या कमाईवर एकूण परिणाम मर्यादित करण्यासाठी बाजूला ठेवलेल्या खर्चाची भरपाई करण्यास मदत करू शकते.”

गेल्या मार्चमध्ये बँकेच्या डिजिटल सेवांना तांत्रिक बिघाडामुळे सुमारे १० तास फटका बसला होता, ज्या दरम्यान युजर्स ऑनलाइन बँकिंग सेवांपासून वंचित राहिले किंवा ब्रोकरेजद्वारे व्यवहार करू शकले नाहीत. तेव्हा सिंगापूरच्या चलन प्राधिकरणाने आउटेजला अस्वीकार्य म्हटले होते. ऑक्टोबरमध्ये आणखी एक तांत्रिक अडचण नोंदवली गेली. गुप्ता यांनी त्यावेळी ग्राहकांची माफी मागितली होती आणि बँक अत्यंत प्राधान्याने समस्या सोडवत असल्याचे सांगितले होते.

खरं तर डीबीएस बँकेसाठी मागील वर्ष चांगले नव्हते. वर्ष २०२३ दरम्यान सिंगापूरच्या सर्वात मोठ्या बँकेला अनेक वेळा डिजिटल बँकिंग सेवांमध्ये अडथळे येण्याच्या समस्येचा सामना करावा लागला. काही प्रसंगी डीबीएस बँकेचे डिजिटल व्यवहार फक्त थांबलेच नाही, तर बँकेची एटीएम सेवाही विस्कळीत झाली. त्यानंतर सिंगापूरच्या सेंट्रल बँकेनेही डीबीएस बँकेवर ताशेरे ओढले होते. याच कारणासाठी डीबीएस बँकेने पगारासह एकूण व्हेरिएबल पे कमी केले आहे.

हेही वाचाः Uber, OLA, BluSmart, inDrive तुमच्याकडून कशा पद्धतीने शुल्क आकारतात? कर्नाटक सरकारचा नियम जाणून घ्या

वेतन कपात का महत्त्वाची?

आधी सांगितल्याप्रमाणे कंपनीकडून होणाऱ्या चुका किंवा गैरसोयींसाठी नेहमीच CEO च्या पगारात कपात करीत नाहीत. अशा प्रकारे बँकेने नफा मिळवूनही गुप्ता यांच्या बदलत्या भरपाईमध्ये केलेली कपात स्पष्ट आहे. अनेक क्षेत्रांमध्ये विशेषत: तंत्रज्ञानामुळे गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर नोकर कपात करण्यात आली आहे. या वर्षीसुद्धा नोकऱ्यांमध्ये कपात सुरू राहण्याची अपेक्षा आहे. काही जणांच्या नोकऱ्या वाचवण्यासाठी जास्त पगार असलेल्या अधिकाऱ्यांच्या वेतनात कपात का करीत नाहीत, असा प्रश्न यातून निर्माण होतो.

भारतासह जगभरातील महत्त्वाच्या सीईओंना २०२२ मध्ये ९ टक्के रिअल टर्म वेतनवाढ मिळाली, दुसरीकडे त्याच कालावधीत काही कर्मचाऱ्यांची ३ टक्के वेतन कपात करण्यात आली, असे गेल्या वर्षी प्रसिद्ध झालेल्या ऑक्सफॅमच्या अहवालात आढळून आले. बिझनेस इनसाइडरच्या अहवालानुसार, अधिकारी आर्थिक भार सहन करण्यास तयार नसतात याची अनेक कारणे आहेत. खरं तर हजारो कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यापेक्षा अधिकाऱ्यांच्या पगारात कपात केल्यास कंपनीला खर्चाच्या बाबतीत फारसा फरक पडणार नाही. शिवाय तीव्र स्पर्धेमुळे या उच्च अधिकाऱ्यांची बदली करणे कठीण आहे. कंपनीतील तोट्याचा सामना करणाऱ्या कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करून पर्याय शोधू शकतात, असे अहवालात नमूद केले आहे.

कोण आहे पीयूष गुप्ता?

पीयूष गुप्ता २००९ पासून डीबीएसचे नेतृत्व करीत आहेत. गेल्या अनेक वर्षांत बँकेने आपला व्यवसाय लक्षणीयरीत्या वाढवला आहे. बँकेचा विस्तार भारत, तैवान, चीनमध्ये झाला आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Singapore dbs bank cuts billions in ceo pay find out why vrd
First published on: 08-02-2024 at 11:24 IST