Vishleshan Magnus Carlson Of fraud Accusation true chess print exp 1022 ysh 95 | Loksatta

विश्लेषण : कार्लसनच्या ‘फसवणुकी’चे आरोप खरे?

बुद्धिबळ जगताला गेल्या महिन्यात हादरवून सोडलेल्या हान्स नीमन फसवणूक प्रकरणाला गेल्या काही दिवसांत नाटय़मय कलाटणी मिळाली.

विश्लेषण : कार्लसनच्या ‘फसवणुकी’चे आरोप खरे?
विश्लेषण : कार्लसनच्या ‘फसवणुकी’चे आरोप खरे?

सिद्धार्थ खांडेकर

बुद्धिबळ जगताला गेल्या महिन्यात हादरवून सोडलेल्या हान्स नीमन फसवणूक प्रकरणाला गेल्या काही दिवसांत नाटय़मय कलाटणी मिळाली. माजी बुद्धिबळ जगज्जेता आणि या खेळाच्या इतिहासातील सर्वात शक्तिशाली बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनने सुरुवातीस अप्रत्यक्षपणे आणि नंतर थेट केलेल्या फसवणुकीच्या आरोपांमुळे हान्स नीमन हा युवा अमेरिकन बुद्धिबळपटू माहितीझोताच्या केंद्रस्थानी आला. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटनेने (फिडे) या प्रकाराची दखल घेऊन चौकशी समिती नियुक्त केली आहे. पण चेस डॉट कॉम या संकेतस्थळाने सविस्तर अहवाल सादर करून नीमन ऑनलाइन बुद्धिबळ प्रकारात सातत्याने फसवणूक करत असल्याचा आरोप केला आहे. हे प्रकरण संपण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत.

मॅग्नस कार्लसनचा आरोप काय होता?

जवळपास महिन्याभरापूर्वी अमेरिकेतील सिंकेफील्ड बुद्धिबळ स्पर्धेत (प्रत्यक्ष पटावर समोरासमोर) कार्लसन पांढऱ्या मोहऱ्यांनिशी खेळत असताना, नीमनविरुद्ध पराभूत झाला. दोघांच्या एलो मानांकनात दीडशेहून अधिक गुणांचा फरक होता. तरीदेखील कार्लसन टिकाव धरू शकला नाही. हा निकाल धक्कादायक होता. पण या पराभवाच्या दुसऱ्याच दिवशी कार्लसनने स्पर्धेतून माघार घेऊन आणखी एक धक्का दिला. मग १९ सप्टेंबर रोजी आणखी एका स्पर्धेत (ऑनलाइन डाव) कार्लसनने एक चाल खेळून डाव सोडला. नीमन हा फसवणूक करत असल्याचा संशय आल्यामुळे कार्लसन असे करत असल्याची चर्चा त्यामुळे सुरू झाली. लवकरच अधिकृत निवेदन जारी करून कार्लसनने चर्चा-अंदाजांना अधिकृत दुजोरा दिला. सिंकेफील्ड स्पर्धेत नीमन ज्या सहजतेने आणि त्वरेने चाली खेळत होता, ते संशयास्पद होते. इतक्या झटपट अचूक चाली माझ्याविरुद्ध खेळण्याची क्षमता मोजक्याच बुद्धिबळपटूंमध्ये आहे आणि त्यांपैकी नीमन नाही. त्याने पूर्वी दोन वेळा ऑनलाइन डावांमध्ये फसवणूक केल्याची कबुली दिलेली असली, तरी तो सातत्याने गैरमार्गाचा अवलंब करतो, असे कार्लसनचे म्हणणे.

नीमनचा बचाव काय?

वयाच्या १२व्या आणि १६व्या वर्षी आपण ऑनलाइन डावांदरम्यान दोन वेळा फसवणूक केली होती याची कबुली नीमनने हा संपूर्ण वाद सुरू झाल्यानंतर दिली. त्याचे ऑनलाइन खाते चेस डॉट कॉमने या दोन प्रकारांनंतर बंद केले. याच संकेतस्थळाने त्याच्यावर फसवणुकीच्या आरोपांपुष्टय़र्थ सखोल अहवाल सादर करावा हा योगायोग नाही. आपल्या खेळामध्ये गेल्या काही वर्षांत सुधारणा झाली आहे. हे वास्तव पचवता न आलेल्यांनी आरोपसत्र सुरू केल्याची नीमनची भूमिका आहे.

नीमनच्या एलो मानांकनातील सुधारणा अवास्तव आहे?

ती अवास्तव वाटल्यामुळेच नीमनविषयी कायमच संशय व्यक्त केला गेला. सप्टेंबर २०२०मध्ये नीमनचे मानांकन २४६५ होते. सप्टेंबर २०२२मध्ये ते २६८८ इतको नोंदवले गेले, म्हणजे २२३ गुणांची वाढ. ती ‘अ-सामान्य’ असल्याचे बहुतेक सर्व बुद्धिबळपटू, प्रशिक्षक आणि विश्लेषकांचे मत आहे. परंतु अशा प्रकारे नाटय़मय वाढ नोंदवला गेलेला तो एकमेव नाही. मूळ आर्मेनियाचा आणि सध्या अमेरिकेकडून खेळू लागलेल्या लेव्हॉन अरोनियानच्या मानांकनातही तशी ती नोंदवली गेली. भारताचे सध्याचे तीन प्रमुख युवा बुद्धिबळपटू डी. गुकेश, अर्जुन एरिगेसी आणि आर. प्रज्ञानंद यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये नेत्रदीपक प्रगती केली. परंतु अरोनियान किंवा या तिघांच्या बाबतीत तीळभरही संशय व्यक्त झालेला नाही.

मग नीमनच्या फसवणुकीचा पुरावा काय?

सध्या तरी त्याच्या असामान्य चाली हाच पुरावा आहे. तो कशा प्रकारे फसवणूक करतो – उदा. वस्त्रांमध्ये एखादे उपकरण लपवून,किंवा ऑनलाइन खेळताना अदर्शनी भागात इतर सॉफ्टवेअरचा वापर करून वगैरे – याबद्दलही ठोस हाती काही लागलेले नाही. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, सध्या तरी त्याच्यावरील आरोपांचे स्वरूप ऑनलाइन बुद्धिबळापुरते मर्यादित आहे. प्रत्यक्ष पटावर सदेह खेळण्यापासून त्याला सध्या तरी कोणत्याही नियमांच्या आधारे रोखता येऊ शकत नाही. पण त्याच्या एलो गुणांमध्ये झालेली वाढ आणि त्याच्या काही चालींमधील थक्क करणारी संगणकीय अचूकता त्याच्याविषयी संशय वाढवणारी ठरते. नीमनचे मानांकन आज जवळपास २७००पर्यंत पोहोचले आहे. पण कोणत्याही डावानंतर त्याचे विश्लेषण नीमन करतो, त्या वेळी ते एखाद्या निष्णात बुद्धिबळपटूचे वाटत नाही, असे निरीक्षण त्याचे समर्थन करणारेही व्यक्त करतात. नुकतेच एका विजयी डावाबद्दल नीमन उद्गारला, की इतक्या सुंदर डावाचे विश्लेषण करण्याची गरजच काय!

पण एवढा तर्क पुरेसा आहे?

ब्राझिलियन स्ट्रीमर आणि विश्लेषक राफेलायते आणखी एका रंजक मुद्दय़ाकडे लक्ष वेधतात. एखाद्या बुद्धिबळपटूंच्या सर्वसाधारण चालींची संगणकीय अचूकतेशी असलेली तफावत आणि अशा सदोष चालींचे सातत्य, यांचे एकत्रित प्रमाण असा बुद्धिबळपटू जेव्हा प्रगती करतो तेव्हा कमी होणे अपेक्षित असते. या संदर्भात राफेलायते यांनी गुकेश, प्रज्ञानंद, एरिगेसी यांच्याबरोबरच कार्लसन, करुआनासारख्या मातब्बरांचेही उदाहरण सप्रमाण दिले. नीमनच्या बाबतीत मात्र हे प्रमाण तितके कमी झालेले नाही. याचा अर्थ त्याच्या चाली आजही २५०० एलो मानांकनाच्या बुद्धिबळपटूच्या प्रमाणात सदोष आहेत. मग त्याचे मानांकन वाढले कसे? याचे साधे उत्तर कार्लसनने पुरवले आहे. तो म्हणतो, की पूर्णत: अपराजित राहण्यासाठी मला केवळ दोन किंवा तीनच चाली अवैध प्रकारे खेळणे पुरेसे ठरते. नीमन सध्या हेच करत असल्याचा त्याच्यावर आरोप करणाऱ्यांचा सूर आहे. पण सिद्ध अजूनही काहीच झालेले नाही ही(च) नीमनच्या दृष्टीने जमेची बाजू.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
विश्लेषण : २०२० या एका वर्षात सात कोटी लोक गरिबीच्या गर्तेत ढकलले गेले; जागतिक बँकेची आकडेवारी, पण कारण काय ठरलं?

संबंधित बातम्या

विश्लेषण: गुरुग्राममध्ये ११ परदेशी कुत्र्यांच्या जातींवर का बंदी घालण्यात आली? हल्ल्यात जखमी झालेल्यांना नुकसान भरपाई मिळते का?
विश्लेषण : सारस पक्षी त्याचे अस्तित्व टिकवेल?
विश्लेषण : बालकांमधील तंबाखू आणि धूम्रपानाचे वाढते व्यसन; कारणे काय आहेत?
विश्लेषण: महाविकास आघाडी सरकार कोसळलं; आता NCP आणि काँग्रेसपुढील आव्हानं काय असतील?
विश्लेषण: भारतीय नागरिक आपलं नागरिकत्व का सोडतात? देश सोडल्यावर कुठे स्थायिक होतात?

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“महाराष्ट्राचे देव संपले का?” शिंदे गटाच्या गुवाहाटी दौऱ्यावरून संजय राऊतांचे टीकास्र; म्हणाले, “मुख्यमंत्री ४० रेड्यांचे बळी…”
अपघातप्रवण श्रेत्रात उपाययोजनांसाठी धावपळ; लुकलुकणारे दिवे, वाहनांचा वेग दर्शविणारे कॅमेरे बसविणार
“ही मराठी मातीतील गद्दारी गाडायची असेल तर…”, जिजाऊंचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल
“भूमिका घेताना अभिनय न करणारा आणि अभिनय करताना भूमिका जगणारा कलावंत”… विक्रम गोखलेंना राज ठाकरेंकडून श्रद्धांजली!
अंमली पदार्थ तस्करीप्रकरणी रेल्वे पोलीस दलातील अधिकाऱ्यासह शिपाई बडतर्फ