भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान सात जानेवारीपासून तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. भारतीय संघानं दुसरा कसोटी सामना जिंकून मालिका बरोबर केली आहे. दोन्ही कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या सलामी फलंदाजांनी नांगी टाकली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं होतं. त्यामुळे दुखापतीनंतरही डेव्हिड वॉर्नरला खेळवण्याचा निर्णय क्रिकेट ऑस्ट्रेलिया करत आहे. त्याशिवाय युवा फलंदाज पुकोवस्कीसुद्धा पदार्पण करण्यास सज्ज आहे. त्यामुळे सिडनी येथे होणाऱ्या कसोटी सामनम्यात ऑस्ट्रेलियाच्या संघात दोन बदल होण्याची शक्यता आहे. कर्णधार टिम पेन आणि प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी तसे संकेतही दिले आहेत.
आणखी वाचा- पुढील आव्हानाचा सामना करण्यासाठी नटराजन तयार, कसोटी पदार्पणाबाबत केलं महत्वाचं ट्विट
जस्टिन लँगर काय म्हणाले?
धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नर सिडनीत होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात निश्चितपणे खेळणार आहे. युवा फलंदाज विल पुकोवस्कीसुद्धा पदार्पण करू शकेल, अशी माहिती लँगर यांनी दिली. दुखापतीमुळे वॉर्नर आणि पुकोवस्की पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकले होते. ‘‘वॉर्नर हा लढवय्या फलंदाज असून, सिडनी कसोटीसाठी तो पूर्णपणे सज्ज आहे,’’ असे लँगर यांनी सांगितले.
टिम पेन काय म्हणाला ?
ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार टिम पेन यानं तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी संघात एकापेक्षा जास्त बदल होणार असल्याचे संकेत दिले. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं दिलेल्या माहितीनुसार, कर्णधार टिम पेन आणि प्रशिक्षक जस्टिंन लँगर संघात दोन बदल करण्यावर सहमत झाले आहे. डेव्हिड वॉर्नर आणि पुकोवस्की यांना संधी मिळणार आहे. जो बर्नच्या जागी डेव्हिड वॉर्नरला संघात स्थान देण्यात येणार आहे. तर ट्रेव्हिस हेडच्या जागी पुकोवस्कीला स्थान देण्यात येईल. पुकोवस्की आणि वॉर्नर सलामीला उतरतील तर मॅथ्यू वेड मधल्या फळीत फलंदाजी करेल, असं टिम पेन म्हणाला आहे.