गतविजेते अ‍ॅटलेटिको माद्रिद संघाला ला लिगा फुटबॉल स्पर्धेत अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले. रिअल सोसिदादने अ‍ॅटलेटिकोवर २-१ असा विजय मिळवला. व्यवस्थापकांशिवायच खेळणाऱ्या सोसिदाद संघाने अ‍ॅटलेटिकोला धक्का देत खळबळजनक विजय नोंदवला.
येत्या काही दिवसांत सोसिदाद संघ व्यवस्थापकपदी मँचेस्टर युनायटेडचे माजी व्यवस्थापक डेव्हिड मोयस यांची नियुक्ती करणार आहे. मात्र त्याबाबत अद्याप अंतिम घोषणा न झाल्याने व्यवस्थापकांविनाच सोसिदादचा संघ या सामन्यात उतरला.
मारिओ मंडझुकिकने दहाव्या मिनिटालाच गोल करीत अ‍ॅटलेटिकोचे खाते उघडले. रौल गार्सिआच्या क्रॉसवर गोल करीत मंडझुकिकने हा गोल केला. मात्र पाच मिनिटांत १५व्या मिनिटाला कालरेस वेलाने गोल करीत सोसिदादला बरोबरी करून दिली. मात्र थोडय़ाच वेळात पंचांनी त्याला पिवळे कार्ड दाखवले. दमदार सुरुवातीनंतर खेळाचा वेग मंदावला. दोन्ही संघांनी गोलसाठी आक्रमण केले, मात्र बचाव मजबूत असल्याने त्यांना यश मिळाले नाही. सामना संपण्यासाठी काही मिनिटे असताना इमॅन्ओल अगिरटेक्सने हेडरद्वारे गोल करत सोसिदादसाठी निर्णायक गोल केला.
अन्य लढतीत इस्पॅनयोल आणि व्हिलारिअल यांच्यातील लढत १-१ अशी बरोबरीत सुटली. सेव्हिला आणि लेव्हान्टे यांच्यातील लढतही १-१ अशा अवस्थेत संपली. अ‍ॅथलेटिक क्लबने व्हॅलेन्सिआ यांच्यातील लढत गोलशून्य स्थितीत संपली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Real sociedad beat atletico in la liga football