नवी दिल्ली : विनेश फोगटने राजकीय आखाड्यात उतरावे की नाही यावर थेट भाष्य करण्यास भारतीय कुस्ती महासंघाचे (डब्ल्यूएफआय) अध्यक्ष संजय सिंह यांनी नकार देतानाच तिने कुस्तीत राजकारण करू नये, अशी टिप्पणी मात्र केली. ‘‘विनेश सध्या ज्या पद्धतीने राजकीय व्यासपीठावरून वावरत आहे, ते बघता भविष्यात तिला राजकारण करायचे असेल, तर ते कुस्तीत करू नये,’’ असे विधान संजय सिंह यांनी सोमवारी केले. ‘‘पॅरिसमध्ये विनेशच्या बाबतीत जे घडले, तो दुर्दैवी अपघात होता. यानंतर निराश होऊन विनेशने घेतलेला निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा. स्पर्धात्मक कुस्तीत परत यावे. आमचा तिला सदैव पाठिंबा राहील आणि नव्या पिढीला तिच्याकडून प्रेरणाही मिळेल,’’ असेही संजय सिंह म्हणाले.
हेही वाचा >>> BCCI Secretary: कोण होणार बीसीसीआय सचिव? दिवंगत भाजपा नेत्याच्या मुलाची चर्चा
२०२३ मध्ये देशातील कुस्तीपटूंनी केलेल्या आंदोलनामुळे आम्हाला मोठा धडा दिल्याचेही संजय सिंह यांनी सांगितले. ‘‘देशविरोधी शक्तींच्या कारस्थानामुळे ऑलिम्पिकपूर्वी १८ महिने देशातील कुस्तीच ठप्प झाली होती. हे घडूनही भारताला ऑलिम्पिकमध्ये एक पदक आले. हे घडले नसते, तर किमान सहा पदकांची अपेक्षा भारताला होती,’’ असे संजय सिंह म्हणाले. अम्मान (जॉर्डन) येथील १७ वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या मुलींनी पाच सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य अशी सात पदके मिळवून प्रथमच जागतिक विजेतेपदावर मोहोर उमटवली. या कामगिरीनंतर बोलताना संजय सिंह यांनी कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय ‘डब्ल्यूएफआय’ला काम करण्याची संधी दिल्यास भविष्यात भारतीय महिला कुस्तीगीर आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी प्रगती करून दाखवतील असा विश्वासही व्यक्त केला. तसेच २०२८ च्या लॉस एंजलिस ऑलिम्पिकमध्ये भारताला ४-५ पदके मिळण्याची आशा असल्याचेही संजय सिंह यांनी सांगितले.
© The Indian Express (P) Ltd