Home Remedies: पावसाळ्यात घराच्या भिंती ओल धरतायत? ‘या’ सवयी आजच थांबवा

पावसाळ्यात चाळ असो वा मोठ्या बिल्डिंग मधलं घर भिंतीला ओल लागायची समस्या सगळीकडेच सारखी आहे.

Home Remedies: पावसाळ्यात घराच्या भिंती ओल धरतायत? ‘या’ सवयी आजच थांबवा
ओल्या भिंतीवर घरगुती उपाय (फोटो : Unsplash)

आल्हाददायक पावसाच्या मौसमात बाल्कनीत निवांत बसून वाफाळती कॉफी घेत मस्त एन्जॉय करावं असं प्रत्येकाच्या मनात असतं. पण खऱ्या आयुष्यात त्याउलट छ्ताला ओल लागतेय का? कपडे सुकवायचे कसे? भिंतीमधून पाणी झिरपतंय अशा समस्यांना अधिक तोंड द्यावं लागतं. पण चिंता करायची गरज नाही, समस्या आहे तर त्यावर उत्तरही आपणच तयार करू शकतो. आणि यामध्ये भारतीय जुगाड तर १००% कामी येतात. पावसाळ्यात चाळ असो वा मोठ्या बिल्डिंग मधलं घर भिंतीला ओल लागायची समस्या सगळीकडेच सारखी आहे. यावर काही सोपे घरगुती उपाय आज आपण पाहणार आहोत तसेच ही समस्या टाळण्यासाठी काही खबरदारीच्या गोष्टी सुद्धा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत चला तर मग…

तत्पूर्वी आपण हे जाणून घेऊयात की भिंतींना ओल लागल्याचं ओळखायचं कसं? अर्थात बघून अंदाज येईल हे योग्य आहे पण काही वेळेला आपल्या फर्निचरमुळे भिंती झाकलेल्या असतात अशावेळी पटकन लक्षात येत नाही. त्यामुळे निदान पावसाळ्यात भिंतीला हात लावून तपासून पहा. भिंत फार थंड लागल्यास, त्यावरील रंगाचे पापुद्रे निघत असल्यास, पाण्याचे थेंब दिसत असल्यास ही सर्व भिंतीला ओल लागण्याची लक्षणे आहेत.

ओल धरलेल्या भिंतीवर उपाय

  1. आपण या भिंती सरळ सुक्या कापडाने पुसून घेऊ शकता.
  2. घरातील फर्निचर भिंतीपासून काही अंतरावर ठेवा जेणेकरून निदान पंख्याची हवा तरी भिंतींना लागेल.
  3. घरातील वस्तू सुटसुटीत ठेवता येतील असे पहा ज्यामुळे कोंदट वातावरण तयार होणार नाही
  4. exhaust फॅन लावून घ्या ज्यामुळे घरातील दमट हवा बाहेर जाण्यास मदत होईल
  5. भिंतींना लागून असणारे पाईप आवर्जून तपासून घ्या. जर या पाईप मध्ये काही अडकले तर पाणी साचून आसपासच्या जागेला ओल लागू शकते.
  6. घराला बाहेरून जाड प्लॅस्टिक कव्हर लावा. घराच्या छप्परावर सुद्धा हे कव्हर टाकल्यास उत्तम.
  7. पूर्णतः ओले कपडे घरात सुकवणे टाळा. काहीच पर्याय नसल्यास निदान कपडे घट्ट पिळून वाळत टाका
  8. जेवण बनवताना शक्य होईल तेव्हा भांड्यावर झाकण ठेवा ज्यामुळे शिजताना येणाऱ्या वाफेतून भिंती ओल्या होणार नाहीत.
  9. भिंतीच्या तळाला किंवा जमिनीला भेगा असतील तर पहिले बुजवून घ्या. यातून पाणी झिरपण्याचे प्रमाण अधिक असते.
  10. आपल्याला लादी पुसल्यावर घर स्वच्छ होते असे वाटते पण यामुळे पुन्हा घरातील दमटपणा वाढतो त्याऐवजी कचरा काढून किंवा धूळ झाडून स्वच्छता करा. वारंवार लादी पुसू नका.

तसेच घरात कुबट वास येत असल्यास, भिंतीच्या खालच्या बाजूला अधिक ओल लागून बुरशी झाली आहे का हे सुद्धा तपासून पहा. अनेकदा पावसाळ्याच्या आधी जय्यत तयारी करून सुद्धा हे सर्व त्रास सहन करावे लागतातच. पण निदान थोडे बदल करून आपण आपला त्रास कमी करू शकता.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
ऑनलाइन शॉपिंग करताना ‘या’ पाच गोष्टी लक्षात ठेवा; हे मुद्दे तुम्हाला Amazon-Flipkart वर तोट्यापासून वाचवतील
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी