मासिक पाळी ही अनेक स्त्रियांना त्रासदायक वाटते. काही मुली आणि स्त्रियांना या पाळीचा इतका त्रास होतो की ती कधी एकदा संपते असे होऊन जाते. पाळीच्या आधी ५ ते ७ दिवसांपासून दुखणारी कंबर आणि पाय यांमुळे स्त्रिया फारच थकून जातात. स्त्रीची ताकद असणारी ही पाळी कधी एकदा बंद होते असेही अनेकींना वाटून जाते. मग हा त्रास कमी व्हावा यासाठी कधी पेन किलर घेतल्या जातात तर कधी इतका त्रास होतो की डॉक्टरांकडेच जाण्याची वेळ येते. पण मासिक पाळीदरम्यान काही योगासने केल्यास हा त्रास कमी होण्याची शक्यता असते. आपल्यातील अनेकांना योगासनांबाबत माहीती असली तरी पाळीचा त्रास कमी होणारी विशिष्ट आसने माहीत नसतात, अशा महिलांसाठी अविनव वर्मा यांनी सांगितलेली काही खास आसने पाहूयात….

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मार्जरासन

आपण लहान मुलांना घोडा घोडा करतो त्या स्थितीत या. हात आणि गुडघे जमिनीला टेकलेले आणि एकमेकांना समांतर राहतील असे बघा. त्यानंतर श्वास घेऊन चेहरा वरच्या दिशेला नेण्याचा प्रयत्न करा. मग श्वास सोडत हनुवटी खाली नेत छातीला टेकवण्याचा प्रयत्न करा. यामध्ये एकदा कंबर खाली जाईल आणि एकदा वरच्या बाजूला जाईल. हे आसन किमान १० वेळा केल्यास तुमचा मासिक पाळीतील त्रास काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.

वक्रासन

पाय पसरुन खाली बसा. उजवा पाय गुडघ्यातून दुमडून डाव्या पायाच्या पलिकडे गुडघ्यापाशी नेण्याचा प्रयत्न करा. जो पाय दुमडला आहे त्याच्या दुसऱ्या बाजूला हात नेण्याचा प्रयत्न करा. दुसरा हात मागच्या बाजूला जमिनीला समांतर ठेवा. यामुळे मासिक पाळीतील कंबरदुखी कमी होण्यास मदत होईल.

ब्रिज पोझ

पाठीवर झोपा. पायाचे तळवे पार्श्वभागाजवळ घ्या. हाताने टाचा धरा. श्वास घेत शरीर कंबरेतून वर उचलण्याचा प्रयत्न करा. शक्य तितक्या वेळ या स्थितीत राहील्यानंतर श्वास सोडत शरीर पुन्हा जमिनीवर ठेवा. हे आसन १० वेळा करा. त्यामुळे पाठदुखीपासून आराम मिळेल.

अर्ध पवनमुक्तासन

पाठीवर झोपा. उजवा पाय गुडघ्यात वाकवून गुडघा दोन्ही हातांनी धरुन छातीजवळ आणायचा प्रयत्न करा. तुम्हाला आरामदायी वाटत असेल तर डावा पाय ताणण्याचा प्रयत्न करा. हेच दोन्ही पायाने करा. यामुळे पायात येणाऱ्या गोळ्यांपासून आराम मिळण्यास मदत होईल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yoga poses helpful from relief during periods