X

करोनाच्या निर्बंधांमुळे दुकान बंद पडल्याने सलून चालकाची आत्महत्या!

उस्मानाबाद तालुक्यातील धक्कादायक घटना; डोक्यावर कर्जाचा डोंगर झाल्याने घेतला टोकाचा निर्णय

करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने जारी केलेल्या कडक निर्बंधांतर्गत व नियमांनुसार सलून (केश कर्तनालय) देखील बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे हा व्यवसाय करणाऱ्या अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यातूनच एका सलून चालकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उस्मानाबाद घडल्याचे समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

उस्मानाबाद तालुक्यातील सांजा गावातील मनोज झेंडे यांचे सलुनचे दुकान आहे, त्यांची घरची परिस्थिती बेताची असल्याने दैनंदिन सलून व्यवसायावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. मात्र करोना परिस्थितीमुळे काही दिवसांपासून दुकान बंद झाल्याने आणि मागीलवर्षीच एका मुलीचे लग्न केल्याने त्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर झाला होता. सरकारने सलून दुकाने बंद केल्यामुळे कुटुंबाची उपजिवीका भागत नसल्याने व आर्थिक देणी वाढल्याने आलेल्या नैराश्यातून त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याअगोदर त्यांनी एक चिठ्ठी (सुसाइड नोट) लिहून त्यामध्ये आपली सर्व व्यथा नमूद केल्याचेही समोर आले आहे.

मनोज झेंडे यांच्या पश्चात पत्नी दोन मुलं, एक मुलगी असा परिवार आहे. रोज सलून दुकानाच्या माध्यमातून मिळणाऱ्या कमाईवरच त्यांचा प्रपंच सुरू होता, मात्र करोनामुळे सर्व काही बघडत गेलं, मागील वर्षी देखील असंच होत गेलं. आता कुठे जर संसारची गाडी सुरळीत होत असताना पुन्हा एकदा व्यवसाय बंद करण्याची वेळ निर्णय सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे आल्याने, सर्व काही ठप्प झाले होते. त्यामुळे घरगाडा चालवताना आर्थिक समस्या निर्माण होत होत्या, आधीच डोक्यावर कर्जाचा ओझं अन् आता हाताला काम नसल्याने मनोज झेंडे यांनी अखेर विष प्राशन करून आत्महत्या केली. मनोज झेंडे यांच्या कुटुंबीयांना अर्थिक मदत करावी, असे आवाहन महाराष्ट्र नाभिक महामंडळ उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष लक्ष्मण माने यांनी केले आहे.

नेमकं काय लिहिलं आहे चिठ्ठीत ?
आत्महत्या करण्या अगोदर मनोज झेंडे यांनी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये लिहिले आहे की, “मी आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येला कोणालाही दोषी ठरवू नये. मी माझ्या जीवाला कंटाळून आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येमुळे माझ्या घरच्यांना त्रास देऊ नये. तसेच माझ्या घरच्या लोकांवर बायको, भावावर कोणतेही आरोप लावू नये, ही माझी कळकळीची विनंती आहे. सरकारने हातावरचे पोट असणाऱ्या सलून दुकानदारांना करोनाचे नियम अटीशर्थी लावून काम करण्याची परवानगी द्यावी अन्यथा नाभिक बांधवांना अर्थिक मदत करावी.”

22
READ IN APP
X