१२ वर्षीय मुलाचा गळफास लागून मृत्यू ; साहसी खेळ खेळणे जीवावर बेतले

मोबाईल गेम आणि युटय़ूबवरील साहसी चित्रफित पाहून तशीच कृती करण्याचा तो सतत प्रयत्न करत होता.

(प्रतिनिधिक छायाचित्र)

अकोला : साहसी खेळ खेळताना गळफास लागून १२ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव शहरात घडली. या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली. पूर्वेश वंदेश आवटे असे मृत पावलेल्या १२ वर्षीय मुलाचे नाव आहे. पूर्वेश बाहेर खेळायला जातो, असे सांगून घराच्या मागच्या बाजूला गेला होता. येथील एका लोखंडी पाईपला त्याने रुमाल बांधला आणि त्याच्यासोबत खेळू लागला. खेळत असताना अचानक त्याला फास लागला. ही बाब त्याच्या आईच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याला तातडीने खाली उतरवले आणि घटनेची माहिती मुलाच्या वडिलांना दिली. त्याला त्वरित उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी करत पूर्वेशला मृत घोषित केले. पूर्वेशला मोबाईलवर गेम खेळण्याची आवड होती. मोबाईल गेम आणि युटय़ूबवरील साहसी चित्रफित पाहून तशीच कृती करण्याचा तो सतत प्रयत्न करत होता. त्याच्या याच छंदामुळे त्याला गळफास लागला असावा, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृत पूर्वेश हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. पूर्वेशचे वडील एका खासगी कंपनीत काम करतात, तर फावल्या वेळेत भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. दोन वर्षांपूर्वी पूर्वेशच्या बहिणीचा देखील मृत्यू झाला आहे. त्यातच १२ वर्षीय मुलाचाही मृत्यू झाल्याने आवटे दाम्पत्याला धक्का बसला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 12 year old boy dies after accidentally strangled zws

Next Story
चंद्रपुरातील सोनोग्राफी व वैद्यकीय गर्भपात केंद्रावर कारवाई ; तीस दिवसांसाठी गर्भपात केंद्र निलंबित
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी