14 Years Boy Dies of GBS महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमध्ये एका १४ वर्षांच्या मुलाचा गुलियन-बॅरे सिंड्रोम (GBS) मुळे मृत्यू झाला. या आजारामुळे देशातील मृतांची संख्या २६ वर पोहोचली आहे. मृत मुलाचे नाव यश नितीन हिरवळे होते. २० जानेवारी रोजी त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. १७ मार्च रोजी त्याचा मृत्यू झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१४ वर्षीय मुलाला काय त्रास होत होता?

यश नितीन हिवराळे या १४ वर्षीय मुलाला अशक्तपणा जाणवत होता, त्याचप्रमाणे गिळण्यासाठीही त्रास होत होता. त्यानंतर तो रुग्णालयात दाखल झाला. त्याला त्यानंतर व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मागील दोन महिने त्याच्यावर उपचार सुरु होते. मात्र १७ मार्च म्हणजेच सोमवारी सकाळी त्याने अखेरचा श्वास घेतला. या घटनेमुळे हिवराळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

डॉ. मंडलेचा यांनी काय सांगितलं?

जीबीएस बाबतची लक्षणं ओळखून आम्ही त्यावर वेळीच उपचार करण्याचा सल्ला देत आहोत. छत्रपती संभाजीनगरमध्ये आत्तापर्यंत जीबीएसचे २८ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी २५ जण आजारातून बरे झाले आहेत अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली. तसंच सगळ्या खासगी आणि सरकारी रुग्णालयांना आम्ही या आजाराच्या लक्षणाबाबत माहिती पुरवली आहे. या आजाराचा रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यास तातडीने सगळ्या उपाय योजना करा अशाही सूचना आम्ही दिल्या आहेत असं मंडलेचा यांनी सांगितलं. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

यशच्या मृत्यूनंतर शिक्षक आणि मित्रांनी व्यक्त केली हळहळ

यशच्या मृत्यूनंतर त्याच्या मित्रांनी तसंच शिक्षक आणि तो ज्या भागात राहात होता त्या नागरिकांनीही दुःख व्यक्त केलं आहे. जीबीएससारख्या आजारांबाबत वेळीच निदान होऊन उपचार केले गेले पाहिजेत आणि याबाबत जागरुकता निर्माण झाली पाहिजे अशी मागणी या सगळ्यांनीच केली आहे. या घटनेमुळे जीबीएस नावाच्या दुर्मीळ आजाराबाबत गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. आरोग्य यंत्रणेने आणखी सजगपणे काम करणं आवश्यक आहे याचीही चर्चा होते आहे.

जीबीएस हा आजार नेमका काय आहे?

गुइलेन बॅरे सिंड्रोम हा एक दुर्मीळ आजार आहे. तो दर वर्षी १ लाख लोकांमध्ये एका व्यक्तीला होतो. याचे निदान गुंतागुंतीचे असते. चेतासंस्थेच्या चाचण्या आणि स्पायनल फ्लुइड चाचण्या याच्या निदानासाठी आवश्यक असतात. आयव्हीआयजी अथवा प्लाझ्मा एक्स्चेंजसारख्या उपचारांमुळे रुग्णाला लवकरात लवकर मदत मिळू शकते. या आजाराचे बहुतेक रुग्ण बरे होत असले, तरी २० टक्के रुग्णांना सहा महिन्यांनंतरही हालचालींमध्ये अडचणी येतात.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 14 years boy dies of gbs in chhatrapati sambhajinagar what health officer said scj