नगर : शहरातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चौथ्या मजल्यावरील लेखापरीक्षण विभाग आज, शुक्रवारी सायंकाळी लागलेल्या आगीत जळून खाक झाला. या लगत असलेले राज्य सरकारच्या सहकार खात्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालय मात्र आगीतून बचावले. दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. सुदैवाने आगीमुळे कोणास इजा झाली नाही. मात्र बँकेचे मोठे नुकसान झाले. आगीबद्दल बँकेचे ज्येष्ठ संचालक तथा माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी संशय व्यक्त केला असून याबाबत सविस्तर चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. मात्र जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला. या परस्परविरोधी विधानांमुळे आगीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
आग सायंकाळी साडेसहा-पावणेसातच्या सुमारास लागली. बँकेच्या मागील बाजूस चौथ्या मजल्यावर बँकेचा अंतर्गत लेखापरीक्षण विभाग तसेच राज्य सरकारचे जिल्हा उपनिबंधक कार्यालय आहे. लेखापरीक्षण विभागात कोणीही उपस्थित नव्हते. मात्र जिल्हा उपनिबंधक कार्यालयात काही कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सहकारी अधिकारी श्रीमती एम. एस. ठोकळ या घरी जाण्यास निघाल्या असताना त्यांना वरील मजल्यावरून धूर निघत असल्याचे निदर्शनास आले. त्या पुन्हा वरील मजल्यावर, कार्यालयात गेल्या व त्यांनी सहकारी कर्मचाऱ्यांच्या ही बाब निदर्शनास आणली. त्यानंतर जिल्हा बँकेचे कर्मचारीही तेथे धावले. त्यांनी बादल्यांच्या साह्याने पाणी मारून आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला. माहिती मिळताच संचालक शिवाजी कर्डिले, आमदार संग्राम जगताप घटनास्थळी धावले. महापालिकेचे अग्निशमन दलही तेथे आले. तोपर्यंत बँकेचे कर्मचारी बादल्याने पाणी मारून आग विझविण्याचा प्रयत्न करत होते. एमआयडीसी अग्निशमन दलाचा बंबही पाचारण करण्यात आला. दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. सध्या विविध कार्यकारी सेवा संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकांचे दप्तर जिल्हा उपनिबंधक कार्यालयात होते, ते बचावले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire destroyed audit department district cooperative bank district deputy registrar office co operation department rescued amy