रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्यातील शहरांबरोबर ग्रामीण भागातील अंगणवाडी तसेच सर्व माध्यमांच्या शाळांचे शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार ‘जिओ टॅगिंग’ करण्यात येणार आहे. या ‘जिओ टॅगिंग’ला जिल्हास्तरावर सुरुवात करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षणाचे संस्कार केंद्र असलेल्या कामकाजात अंगणवाड्यांमध्ये एकसुत्रीपणा आणण्यासाठी सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनांच्या शाळा आणि अंगणवाडी केंद्रांचे छायाचित्रासह ‘जिओ टॅगिंग ‘ करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. या माहितीचा उपयोग शालेय शिक्षण विभागाला विविध योजनांची आखणी व अंमलबजावणीसाठी मोठ्या प्रमाणावर होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शाळा व अंगणवाड्यांचे जिओ टॅगिंग सुरू करण्यात आले आहे.

राज्यातील सर्व शाळांची माहिती केंद्र शासनाच्या यूडायस या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. मात्र, यामध्ये गाव, चावड्या, वस्ती यांचे ठिकाण, लोकसंख्येची घनता, रस्ते, दोन शाळांमधील अंतर, शाळांच्या जवळ शासनाच्या इतर विभागांद्वारे उपलब्ध सोयीसुविधा याबाबतची माहिती शालेय शिक्षण विभागाकडे उपलब्ध नसल्याने या जियो टॅगिंगमुळे आता ती उपलब्ध होणार आहे. एमआरएसएसीकडे उपलब्ध विविध विभागांची माहिती व यूडायस संकेतस्थळावरील शालेय शिक्षण विभागाची माहिती यांचे एकत्रीकरण करून ती एका स्वतंत्र डॅशबोर्डवर उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे एमआरएसएसीमार्फत सर्व शाळा व अंगणवाडी केंद्रांचे मॅपिंग, अक्षांश व रेखांशासह मोबाईल अॅपद्वारे केले जाणार आहे.

जिओ टॅगिंगमध्ये फोटो, व्हिडीओ, संकेतस्थळ किंवा इतर माहितीला भौगोलिक स्थान जोडून यात अक्षांश आणि रेखांश वापरून माहितीच्या ठिकाणाची अचूक नोंद केली जाते. सरकारी योजनांच्या अंमलबजावणीत हे जिओ टॅगिंग उपयोगी ठरणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Geo tagging will bring information about all schools and anganwadi centers to a single website ssb