गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर हे त्यांची पत्नी आणि भाजपाच्या खासदार किरण खेर यांची काळजी घेत आहेत. किरण यांना ब्लड कॅन्सर (कर्करोग) झाल्याची माहिती समोर आली होती. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान अनुपम खेर यांनी पत्नीसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे.
अनुपम खेर हे अमेरिकन टीव्ही चॅनेल एनबीसी (NBC)वरील सीरिज ‘न्यू अॅमस्टरडॅम’ (New Amsterdam)मध्ये काम करत होते. पण आता त्यांनी सीरिजमध्ये काम करणार नसल्याचे सांगितले आहे. या सीरिजमध्ये ते डॉक्टर विजय कपूरच्या भूमिकेत दिसत होते. न्यू अॅमस्टरडॅम या सीरिजचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला असून अनुपम खेर यामध्ये महत्त्वाची भूमिका साकारत होते.
आणखी वाचा : ‘माझ्याशी पंगा घेऊ नका’, रुबिनाचा फोन नंबर लीक होताच पती संतापला
२०१८ पासून अनुपम खेर न्यू अॅमस्टरडॅम या सीरिजमध्ये काम करत आहेत. पण आता अनुपम खेर यांनी पत्नीसाठी सीरिजमध्ये काम करणार नसल्याचे सांगितले आहे.
किरण खेर या चंदीगढ लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष अरुण सूद यांनी ३१ मार्च रोजी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेला खासदार किरण खेर या अनुपस्थित होत्या. त्यावेळी अरुण यांनी किरण खेर यांना ब्लड कॅन्सर झाल्याची माहिती दिली. ६८ वर्षी खेर यांना गेल्यावर्षी या आजाराचे निदान झाले होते. सध्या त्या उपचार घेत असून मुंबईमध्ये आहेत अशी माहितीही अरुण सूद यांनी दिली. त्यानंतर आता अनुपम खेर यांनी ट्वीट करत किरण खेर यांना ब्लड कॅन्सर झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता.