बॉलिवूड स्टार जोडी करिना कपूर खान आणि सैफ अली खान यांच्या घरी मंगळवारी सकाळी तान्हुल्याचे आगमन झाले. सैफ आणि करिनाने अधिकृत घोषणा करत सांगितले की, आमच्या घरी बाळाचे आगमन झाले आहे. २० डिसेंबर २०१६ ला तैमुर अली खान पतौडीचा जन्म झाला. गेल्या नऊ महिन्यांपासून प्रसारमाध्यमांनी आम्हाला समजून घेतले आणि त्यांनी जो काही पाठिंबा दिला त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. तसेच, आमचे चाहते आणि शुभेच्छुक यांनी आम्हाला दिलेल्या प्रेमासाठी मी त्यांचे आभार मानतो. सर्वांना नाताळच्या आणि नव्या वर्षाच्या शुभेच्छा…
करिनाने मुंबईतील ब्रिच कॅन्डी रुग्णालयात आज सकाळी साडेसात वाजता बाळाला जन्म दिला. बाळ आणि आई दोघांचीही प्रकृती उत्तम असल्याचे कळते. करिनाचा (३६) हा पहिला मुलगा आहे. तर सैफला आधीच्या पत्नीपासून म्हणजे अमृता सिंगपासून सारा आणि इब्राहिम ही दोन मुलं आहेत.
तैमुर नावाचा अर्थः
सैफ, करिनाने आपल्या मुलाचे नाव तैमुर असे ठेवले. तैमुर या नावाचा खरा अर्थ लोह किंवा पोलाद असा होतो.
लाइव्ह हिंदुस्तान या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, तैमुर लंग ज्यांना तिमुर (तिमुर या शब्दाचा अर्थ लोह) या नावानेही ओळखले जायचे. १४ व्या शतकातले एक शासक होते. ज्यांनी तैमूरी राजवंशाची स्थापना केली होती. त्यांचे राज्य पश्चिम आशियापासून होत, मध्य आशियापासून ते भारतापर्यंत पसरलेले होते. त्यांचे नाव जगातल्या महान योध्यांच्या यादीत घेतले जायचे. ते बरसल येथील तुर्क कुटुंबात जन्माला आले होते. तैमुर लंग यांचा जन्म १३३६ मध्ये झालेला. तैमूर इस्लामचा कट्टर अनुयायी होता. शिवाय ते फार महत्त्वकांक्षीही होते.
जिकडे आजकालचे सेलिब्रिटी पालक आपल्या मुलांची हटके नाव ठेवण्याचा विचार करतात तिकडे करिना आणि सैफने मात्र वेगळी वाट धरली. सुरुवातीला हे नाव अनेकांना रुचणारही नाही. कारण अनेकांना हे नाव थोडे जुनाट वाटेल. शेवटी काहीही असो लोकांना सैफ आणि करिनाच्या मुलाचे नाव आवडो अथवा नाही. पण, त्यांच्यासाठी तो नेहमीच एक नवाब राहील हे मात्र खरं.