जवळपास एक वर्षापूर्वी टेलिव्हिजन अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीने राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या केली होती. प्रत्युषाच्या जाण्याने पूर्ण टिव्ही विश्व शोकाकूल झाले होते. अनेकांनी तिच्या आत्महत्येमागच्या मूळ कारणाचा शोध घेण्यासाठी तर्कवितर्क लावण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात अनेकांनी प्रत्युषाच्या प्रियकरावर म्हणजेच राहुल राज सिंगवर तिच्या आत्महत्येचा आरोप लावला होता. पण, या सर्व घटनेमागचा खरा सूत्रधार अद्यापही समोर आलेला नाही. टीव्ही विश्वात प्रत्युषाची सर्वात जवळची मैत्रिण असलेल्या काम्या पंजाबीने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन प्रत्युषाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ‘हम कुछ कह ना सके’ या लघुपटामध्ये प्रत्युषाची शेवटची झलक पाहायला मिळते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काम्याने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये लघुपटातील काही दृश्यांद्वारे प्रत्युषाच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आल्याचे दिसते. पण, काम्याच्या या व्हिडिओविषयी बोलताना प्रत्युषाच्या प्रियकराने हे सर्वकाही खोटे असल्याचे सांगितले. एका प्रसिद्ध दैनिकाशी बोलताना राहुलने त्याची भूमिका स्पष्ट केली. ‘या लघुपटातून काम्याला नक्की काय म्हणायचेय? प्रत्युषा या जगातून जाण्यापूर्वी जवळपास महिनाभर माझ्यासोबतच होती. तर मग काम्याने तिच्यासोबतच्या या लघुपटाचे चित्रिकरण कधी केले? प्रत्युषाच्या मृत्यूच्या काही दिवसांपूर्वी आम्ही रांचीला एका नामकरण सोहळ्यासाठी गेलो होतो. त्यानंतर आम्ही गोव्याला गेलो. तर मग काम्याने हा लघुपट कधी चित्रित केला?’, असा प्रश्न राहुलने उपस्थित केला आहे.

काम्या हे सर्व काही पैशांसाठी करत असून, एका मृत व्यक्तीच्या नावाखाली पैसे लाटण्याचे तिचे हे प्रयत्न आहेत असे सांगत राहुलने तिच्यावर निशाणा साधला. यावेळी बोलताना आपण प्रत्युषाच्या जीवनावर आधारित एक पुस्तक लिहिणार असल्याचे राहुलने सांगितले. दरम्यान, टेलिव्हिजन अभिनेत्री काम्या पंजाबी आणि राहुल राज सिंग नेहमीच एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याचे पाहायला मिळाले. प्रत्युषाच्या आत्महत्येसाठी काम्या पंजाबी आणि प्रत्युषाच्या पालकांनी राहुल राज सिंगवर तिच्या आत्महत्येचा आरोप लावला होता. पण, त्याने मात्र हे सर्व आरोप फेटाळले होते. त्यामुळे काम्याने प्रदर्शित केलेल्या लघुपटाची झलक पाहता प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येविषयीच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Late television actress pratyusha banerjee last short film kamya punjabi posts a video