बॉलिवूड अभिनेता सुनिल शेट्टी त्याच्या अभिनयासोबतच फिटनेससाठी ओळखला जातो. पण सध्या तो रुपेरी पडद्यापासून लांब असून सोशल मीडियावर देखील फारसा सक्रिय नसल्याचे पाहायला मिळते. पण नुकताच सुनिल शेट्टीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या थ्रोबॅक व्हिडीओमध्ये सुनिल शेट्टी चाहत्याचा मोबाईल खेचून घेत असल्याचे दिसत आहे.
सुनिल शेट्टीच्या एका फॅनक्लब पेजने हा व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये एक चाहता सुनिल शेट्टीसोबत फोटो काढण्यासाठी जवळ येतो. मात्र सुनिल शेट्टी त्या चाहत्यासोबत फोटो न काढता त्याचा फोन खेचून घेतो आणि स्वत:च्या खिशात टाकत असल्याचे पहायला मिळते. सुनिल शेट्टीचा हा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
लवकरच सुनिल बॉलिवूडमधून नव्हे तर चक्क हॉलिवूड सिनेसृष्टीतून पुनरागमन करण्याची तयारी करत आहे. तो एका हॉलिवूडपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या आगामी चित्रपटाचे नाव ‘कॉल सेंटर’ असे आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी प्रसिद्ध दिग्दर्शक Jeffery Chin याने स्विकारली आहे. सुनिल शेट्टीचा हा आगामी चित्रपट इंग्रजीसोबतच हिंदी आणि तेलुगु या भाषांमध्ये देखील प्रदर्शित केला जाणार आहे.
या चित्रपटात सुनिल एका शीख पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. भारतातील एका कॉल सेंटर कंपनीने तब्बल ३८१ दशलक्ष अमेरिकी डॉलर्सचा घोटाळा केला होता. हे कॉल सेंटर फोनच्या माध्यमातून अमेरिकन नागरिकांना फसवत होते. हा घोटाळा एका शीख पोलिस अधिकाऱ्याने उघडकीस आणला होता. याच प्रकरणावर कॉल सेंटर या चित्रपटाची पटकथा आधारित आहे.