‘तुला पाहते रे’ ही वय विसरायला लावणारी जगावेगळी प्रेम कहाणी झी मराठी वाहिनी प्रेक्षकांसाठी घेऊन आली आहे. या मालिकेतून अभिनेता सुबोध भावे आता पुन्हा एकदा ‘झी मराठी’वर पुनरागमन करत छोटय़ा पडद्यावर आपली जादू दाखवणार आहे. तब्बल दोन वर्षांनंतर तो छोटय़ा पडद्यावर पररतो आहे. तुझं माझं ब्रेकअप या मालिकेची जागा ‘तुला पाहते रे’ ही नवी मालिका घेणार आहे.
वय विसरायला लावतं ते खरं प्रेम असं म्हणणारी ‘तुला पाहते रे’ ही मालिका आहे ईशा आणि विक्रम सरंजामे यांच्या प्रेमाची. विक्रम सरंजामे म्हणजे शहरातील एक मोठा व्यावसायिक. खूप श्रीमंत, आलिशान घर असलेला विक्रम आणि दुसरीकडे चाळीत, मध्यमवर्गीय कुटुंबात राहणारी इशा निमकर जी अतिशय सामान्य घरात वाढली आहे. हे दोघे कसे भेटतात, त्यांची मैत्री कशी होते आणि त्या मैत्रीचं प्रेमात कसं रुपांतर होतं, हे पाहणं प्रेक्षकांसाठी रंजक ठरेल. या मालिकेतून गायत्री दातार ही नवोदित अभिनेत्री छोटय़ा पडद्यावर पदार्पण करत आहे. सुबोध भावेसोबत काम करण्याच्या अनुभवाविषयी ती म्हणाली, सुबोध भावे एक कलाकार म्हणून आणि माणूस म्हणून देखील खूप उत्तम आहेत. या क्षेत्रात जरी मी नवीन असली तरी त्यांनी पावलोपावली मला मार्गदर्शन केलं.
शूटिंगच्या दरम्यानही त्यांच्याकडून बरंच काही शिकायला मिळतं. त्यांच्या अभिनयातील बारकावे आणि त्यांचा अनुभव यातून मी खूप काही शिकत आहे. त्यामुळे आता दडपण नसून त्यांच्याकडून जितकं काही शिकता येईल तितकं शिकण्याचा मी प्रयत्न करत आहे. या मालिकेत सुबोध भावेसह नामवंत कलाकारांची मांदियाळी आहे.