X

“परमबीर सिंग यांना मुख्य आरोपी करणं केंद्र सरकारला मान्य नसावं”

"अंबानी प्रकरणातील तपास प्रमुखांच्या तडकाफडकी बदलीची चौकशी झाली पाहिजे"

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेलं वाहन तसंच व्यावसायिक मनसुख हिरेन हत्या प्रकरणाच्या तपास पथकाचे प्रमुख पोलीस महानिरीक्षक अनिल शुक्ला यांचा राष्ट्रीय तपास यंत्रणेतील (एनआयए) कार्यकाळ सोमवारी संपुष्टात आला. दरम्यान इतक्या मोठ्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अनिल शुक्ला यांच्या बदलीचं कारण काय? अशी विचारणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे.

“मुकेश अंबानींच्या घरासमोर स्फोटकं का ठेवली? कोणी ठेवली? हा तपास करण्याची आवश्यकता होती. दरम्यान परमबीर सिंग यांनी पत्र लिहिलं त्याचवेळी मी ते या कटात सहभागी असल्याचं म्हटलं होतं. ते माफीचे साक्षीदार होऊ इच्छित आहेत. मला या प्रकरणात वेगळा वास येत आहे असं सांगितलं होतं,” असं हसन मुश्रीफ यांनी सांगितलं. “अनिल शुक्ला यांनी परमबीर सिंग यांना मुख्य आरोपी केलं असावं आणि हे केंद्र सरकारला मान्य नसावं,” अशी शंका हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली आहे.

“परमबीर सिंग, वाझे या प्रकरणात सहभागी असावेत. तपास अजून का होत नाही. वाझेंची रवानगी कोठजीत झाली आहे तरीदेखील चौकशी झालेली नाही. इतका मोठा तपास सुरु असतानाही बदली कशासाठी? काहीतरी शिजत असून त्याची चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी हसन मुश्रीफ यांनी केली आहे.

अनिल शुक्ला यांचा ‘एनआयए’तील कार्यकाळ संपुष्टात
अनिल शुक्ला केंद्रशासित प्रदेशातील आयपीएस अधिकारी असून त्यांची पाच वर्षांसाठी ‘एनआयए’मध्ये प्रतिनियुक्ती करण्यात आली होती. शुक्ला यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर रिक्त होणारे महानिरीक्षकपद भरण्यासाठी उपमहानिरीक्षक ज्ञानेंद्रकुमार वर्मा यांना बढती देण्यात आली होती. त्यामुळे अंबानी धमकी तसेच मनसुख हत्येच्या तपासाची जबाबदारी वर्मा यांच्याकडे दिली जाईल, असे ‘एनआयए’तील वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’ला सांगितलं. ‘एनआयए’मध्ये संपूर्ण देशासाठी चार महानिरीक्षक दर्जाचे अधिकारी आहेत. या पदासाठीचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. अधिकाऱ्याची इच्छा असल्यास आणखी एक वर्षाचा कार्यकाळ वाढवून दिला जातो. शुक्ला यांच्यावर कोणती जबाबदारी द्यावी, हा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालय घेईल, असंही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

 

20
READ IN APP
X