मुंबई : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) हस्तांतरित करण्याचे आदेश द्या, अशी मागणी अभिषेक यांच्या पत्नी तेजस्वी यांनी उच्च न्यायालयात याचिकेद्वारे केली आहे. त्यांच्या या मागणीवर न्यायालयाने राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश सोमवारी दिले.

तपास यंत्रणेला अभिषेक यांच्या अकाली आणि अत्यंत संशयास्पद, गंभीर, निर्दयी, क्रूर, भीषण, भरदिवसा, थंड डोक्याने करण्यात आलेल्या हत्याकांडाचा कोणताही ठोस उद्देश शोधण्यात अपयश आले आहे, असा दावा तेजस्वी यांनी याचिकेत केला आहे. न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर तेजस्वी यांच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. त्यावेळी, न्यायालयाने तेजस्वी यांच्या याचिकेची दखल घेऊन सरकारला त्यावर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.

हेही वाचा – सांगलीत मैत्रीपूर्ण लढत की माघार ? दिल्लीच्या निर्णयाची काँग्रेस नेत्यांना प्रतीक्षा

हेही वाचा – निवडणूक आयोगाची कारणे दाखवा नोटीस; ‘वर्षा’वर मुख्यमंत्र्यांची राजकीय बैठक

तेजस्वी यांच्या याचिकेनुसार, अभिषेक यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला अमरेंद्र मिश्रा याच्यावर २०१९ मध्ये उत्तरप्रदेशातील स्थानिक पोलीस ठाण्यात दंगल घडवून आणणे, दुखापत करणे, प्रवृत्त करण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर अपमान करणे आणि शांतता भंग करणे या आरोपांप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. अभिषेक यांची गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या मॉरिस नोरोन्हासाठी मिश्रा याने डिसेंबर २०२३ मध्ये कोणत्याही सरकारमान्य सुरक्षा कंपनी संपर्क न करता काम करण्यास सुरुवात केली. त्याला नोरोन्हा याने वैयक्तिक अंगरक्षक म्हणून नियुक्त केले. जानेवारी आणि मे २०२२ मध्ये, नोरोन्हा याने आपल्याविरोधात बदनामीकारक आणि विनयशीलतेचा अपमान करणारी वक्तव्ये केली होती. या प्रकरणी आपण एमएचबी कॉलनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती, असेही तेजस्वी यांनी याचिकेत म्हटले आहे. ऑक्टोबर २०२३ पासून, नोरोन्हा सकारात्मक आत्मीयता मिळविण्यासाठी घोसाळकरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता आणि फेसबुक लाईव्ह सत्र आयोजित करण्याचा आग्रह धरला होता, असा दावाही तेजस्वी घोसाळकर यांनी याचिकेत केला आहे.